ऐसा जोगवा, जोगवा मी मागीन ।

कलियुगी या धर्मस्थापना होईल । अधर्माचा नाश होता, विश्‍व पावन होईल ।
भूमीचा या भार उतरता, ज्ञानगंगा वाहेल । भक्तीचे ते बीज रूजेल, देवभूमी आनंदेल ।
शरणागतभावाने ‘कृपा’ मी मागीन । ऐसा जोगवा, जोगवा मी मागीन ॥

ऐसा जोगवा, जोगवा मी मागीन ।
ओझर क्षेत्रीच्या गजानना, वंदीन मी चरणा ।
दूर्वांकुर वाहूनी ‘बुद्धीची प्रज्ञा’ मी मागीन ।
ऐसा जोगवा, जोगवा मी मागीन । । १ ॥

दूर क्षेत्री जाईन, गिरनारी मी चढीन ।
नमन पादुका करोनी, निशीगंध पुष्पे वाहूनी ।
‘वैराग्या’चा जोगवा मी मागीन ।
ऐसा जोगवा, जोगवा मी मागीन ॥ २ ॥

पंढरपुरा मी जाईन । विठ्ठला तुळस अर्पीन,
नयन भरून पाहीन ।‘प्रेम-भक्ती’चा जोगवा
मी मागीन ऐसा जोगवा, जोगवा मी मागीन ॥ ३ ॥

दूर क्षेत्री जाईन । अमरनाथा मी वंदीन ।
बेलपत्र वाहूनी, ‘शांती’चा जोगवा मी मागीन ।
ऐसा जोगवा, जोगवा मी मागीन ॥ ४ ॥

द्वारकाधिशा दंडवत घालीन । प्राजक्ताची पुष्पे वाहीन ।
‘आनंदा’चा जोगवा मी मागीन ।
ऐसा जोगवा, जोगवा मी मागीन ॥ ५ ॥

दूर क्षेत्री जाईन, ब्रह्मचैतन्य समर्था वंदीन ।
पुष्प-फळे अर्पीन । ‘रामनामा’चा जोगवा मी मागीन ।
ऐसा जोगवा, जोगवा मी मागीन ॥ ६ ॥

कोकणभूमीत जाईन, सागरतिरीचे पावस मी पाहीन ।
स्वामींना साष्टांग नमन करीन ।‘सोऽहं’चा जोगवा मी मागीन ।
ऐसा जोगवा, जोगवा मी मागीन ॥ ७ ॥

दूर क्षेत्री जाईन जाईन, अलंकापुरी पाहीन ।
ज्ञानराजा वंदीन, ज्ञानेश्‍वरी जगा सांगीन ।
‘भक्ती-ज्ञाना’चा हा जोगवा मी मागीन ।
ऐसा जोगवा, जोगवा मी मागीन ॥ ८ ॥

दूरक्षेत्री जाईन, तुळजापुरा राहीन ।
भवानीमाता वंदीन । ‘शक्ती’चा जोगवा मी मागीन ।
ऐसा जोगवा, जोगवा मी मागीन ॥ ९ ॥

शिवरायांना दिली तलवार, अधर्मावर झाला वार ।
मानीन तिचे आभार आभार ।
त्या शक्तीचरणी साष्टांग नमन करीन ।
ऐसा जोगवा, जोगवा मी मागीन ॥ १० ॥

कदंब वनात मी जाईन, रामनाथी आश्रमी राहीन ।
प.पू. गुरुदेवांना नमूनी, विनंती चरणां करूनी ।
विश्‍ववंद्य भारतभूमी मी करीन करीन ।
ऐसा जोगवा, जोगवा मी मागीन ॥ ११ ॥

कलियुगी या धर्मस्थापना होईल ।
अधर्माचा नाश होता, विश्‍व पावन होईल ।
भूमीचा या भार उतरता, ज्ञानगंगा वाहेल ।
भक्तीचे ते बीज रूजेल, देवभूमी आनंदेल ।
शरणागतभावाने ‘कृपा’ मी मागीन ।
ऐसा जोगवा, जोगवा मी मागीन ॥ १२ ॥

पुष्पांजली, बेळगाव (२४.११.२०१६, रात्री १०)


Multi Language |Offline reading | PDF