गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या विरोधात २१ दिवसांनंतर गुन्हा नोंद

नंदुरबार येथे अश्‍लील नृत्य करून धार्मिक भावना दुखावल्याचे प्रकरण

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर गुन्हा नोंद होण्यासह तत्परतेने कठोर कारवाईही व्हायला हवी !

नंदुरबार, ३ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील रेल्वे वसाहतीतील लोको पायलट गणेश मंडळाने गणेशोत्सव काळात आयोजित केलेल्या नृत्य कार्यक्रमात नर्तकींनी अश्‍लील हावभाव करत नृत्य करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला; परंतु ‘हा गुन्हा नोंद व्हायला २१ दिवसांचा कालावधी का लागला ?’, असा प्रश्‍न धर्मप्रेमी जनता विचारत आहे.

नंदुरबार शहरात रेल्वे कर्मचार्‍यांच्या वसाहतीत लोको पायलट गणेश मंडळाने गणेशोत्सवानिमित्त ६ सप्टेंबर २०१९ या दिवशी आयोजित केलेल्या ऑर्केस्ट्रात दोन नर्तकींनी अंगप्रदर्शन करत चित्रपटाच्या गाण्यांवर अश्‍लील हावभाव करत नृत्य केल्याचे व्हिडिओ चित्रण सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित झाले होते. यामुळे समस्त हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या असून हा देवतांचा अपमान आहे; मात्र संबंधित अधिकार्‍यांनी याला संमती दिलीच कशी ? या विषयी नागरिकांमधून संताप व्यक्त झाला होता.

प्रखर हिंदुत्वनिष्ठांकडून तक्रार प्रविष्ट

प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. जितेंद्र परशुराम राजपूत यांनी शहर पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार प्रविष्ट केली होती. या घटनेविषयी स्थानिक वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कात्रण, तसेच ‘मल्हार न्यूज’ या वृत्तवाहिनीने प्रसारित केलेल्या चलचित्रांचा दाखला देऊन श्री. राजपूत यांनी या घटनेची त्वरित नोंद घेण्याची विनंती शहर पोलीस ठाण्यात केली होती. (धर्महानी रोखण्याविषयी तत्परतेने कृती करणार्‍या श्री. जितेंद्र राजपूत यांचे अभिनंदन ! अशी जागरूकता सर्वत्रच्या हिंदूंनी ठेवायला हवी ! – संपादक) त्यानंतर गुन्हा नोंद करण्याची वरील प्रक्रिया करण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF