रशियाच्या विरोधात लढण्यासाठी आतंकवाद्यांना प्रशिक्षण देण्यावर पाकिस्तानने ७ लाख कोटी रुपये खर्च केले ! – पंतप्रधान इम्रान खान यांचा गौप्यस्फोट

केवळ रशियाच्या विरोधातच नव्हे, तर भारताच्या विरोधातही लढण्यासाठी पाकिस्तानने आतंकवाद्यांचा कारखाना चालू करून गेली ३ दशके आतंकवादी कारवाया केल्या आहेत आणि अजूनही करत आहे, हे इम्रान खान का बोलत नाहीत ?

इस्लामाबाद – वर्ष १९८० च्या दशकात शीतयुद्धाच्या वेळी अमेरिकेला साहाय्य म्हणून अफगाणिस्तानमध्ये रशियाच्या सैन्याशी लढण्यासाठी आम्ही जिहाद्यांना प्रशिक्षण दिले. यासाठी त्यांच्यावर ७ लाख कोटी रुपये खर्च केले. अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने आम्हाला पैसा पुरवला होता, असा गौप्यस्फोट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रशियाच्याच एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना केला. ‘इतके करूनही अमेरिका आता आमच्यावर आरोप करत आहे. या जिहाद्यांना ‘आतंकवादी’ म्हणण्यास चालू केले आहे. पाकिस्तानच्या विरोधात झालेला हा अन्याय आहे’, असा आरोपही इम्रान खान यांनी केला.

इम्रान खान म्हणाले की, अमेरिकेचे वागणे हा मोठा विरोधाभास आहे. आम्ही आमच्या ७० सहस्र लोकांना गमावले आणि देशाच्या अर्थव्यवस्थेतील ७ लाख कोटी रुपये गमावले. अखेरीस आमच्या हाती काय लागले? (आतंकवादी कारवाया केल्या तर हातात कधी काही लागणार आहे का ? चांगले कर्म केले, तर त्याचे फळ चांगले मिळते आणि वाईट कर्म केले, तर त्याचा परिणाम वाईट होणार, हे आता पाकने कायमचे लक्षात ठेवायला हवे ! – संपादक)

इम्रान खान यांच्या या आरोपांच्या एक दिवस आधी पाकिस्तानचे गृहमंत्री एजाज अहमद शाह यांनी ‘पाकिस्तानने जमात-उल-दावावर अब्जावधी रुपये खर्च केले’, असे म्हटले होते. तसेच ‘या आतंकवादी संघटनांना मुख्य प्रवाहात आणण्याचा सरकारचा प्रयत्न असून आतंकवाद्यांना नोकरी आणि पैसे पुरवण्याचे दायित्व सरकारने उचलले पाहिजे’, असेही ते म्हणाले होते. (पाकिस्तान कधीही आतंकवाद्यांना मुख्य प्रवाहात आणू शकणार नाही. ‘आतंकवाद’ हीच पाकिस्तानची खरी ओळख आहे. आतंकवाद हा आता पाकसाठी भस्मासुर झाला आहे. तो पाकला गिळंकृत करणार यात शंका नाही ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF