अनंतचतुर्दशीच्या दिवशी दादर चौपाटीवर विसर्जित केलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या शेकडो मूर्ती भग्नावस्थेत इतरत्र पडून श्री गणेशाचा अवमान

(हे छायाचित्र प्रसिद्ध करण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)

मुंबई, १३ सप्टेंबर (वार्ता.) – अनंतचतुर्दशीच्या दिवशी १२ सप्टेंबरला दादर चौपाटीवर विसर्जित करण्यात आलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या शेकडो मूर्ती आणि त्यांचे अवशेष भग्नावस्थेत इतरत्र पडले होते. भग्नावस्थेत पडलेल्या या मूर्तींपैकी काही मूर्ती मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी समुद्राच्या काठावर एका बाजूला ठेवल्या होत्या; मात्र श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी आलेले अनेक भाविक त्या मूर्तींमधूनच चालत जात होते. या वेळी दिसणारे चित्र विदारक होते, तसेच त्यामुळे श्री गणेशाचा अवमान होत होता.

या ठिकाणी सकाळी समुद्राला भरती असतांना विसर्जित करण्यात आलेल्या मूर्ती दुपारनंतर समुद्राला ओहोटी आल्यामुळे विसर्जित केलेल्या ठिकाणी तशाच होत्या. या सर्व मूर्ती प्लास्टर ऑफ परिसच्या असल्याचे दिसून येत होते.

दादर चौपाटीवर मूर्ती विसर्जित करण्यासाठी कृत्रिम तलावांचीही व्यवस्था करण्यात आली होती; मात्र बहुतांश भाविक मूर्तींचे विसर्जन समुद्रामध्ये करत होते. (प्लास्टर ऑफ पॅरिस आणि कागदी लगद्याच्या मूर्ती या प्रदूषणकारी असून त्या पाण्यात लगेच विरघळतही नाहीत. त्यामुळे मूर्तींचे अवशेष अधिक काळ भग्नावस्थेत रहातात. त्यामुळे देवतेचा अनादर होतो. शाडूच्या मातीची मूर्ती असेल, तर ती पाण्यात लगेच विरघळते. त्यामुळे पर्यावरणाची कोणती हानीही होत नाही. तसेच शाडूची मातीची मूर्ती शास्त्रसंमत आहे. त्यामुळे शाडूच्या मातीची मूर्ती हीच खर्‍या अर्थाने पर्यावरणपूरक मूर्ती होय. – संपादक)

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाविकांचे प्रबोधन

दादर चौपाटी, तसेच अन्य विसर्जनस्थळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हातात फलक घेऊन, हस्तपत्रके वितरीत करून आणि उद्घोषणा यांद्वारे भाविकांना मूर्तींचे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी भाविकांना मूर्ती वाहत्या जलाशयात विसर्जित करण्यामागील शास्त्र समजावून सांगितले. समितीच्या आवाहनाला भाविकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

समुद्रात मूर्ती विसर्जित करण्याकडे भाविकांचा कल

१२ सप्टेंबर या दिवशी घरगुती ३० सहस्र ४०३ आणि सार्वजनिक ७ सहस्र ६२७ अशा एकूण ३८ सहस्र ३० गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये केवळ ३ सहस्र ७७७ गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. अन्य मूर्तींचे समुद्र, खाडी आणि तलाव आदी नैसर्गिक जलाशयात विसर्जन करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेकडून ३२ कृत्रिम तलावांची व्यवस्था केली होती, तर ६९ ठिकाणी मूर्ती विसर्जनासाठी नैसर्गिक जलस्त्रोत होते. भाविकांनी १३ सप्टेंबरच्या सकाळी ६ वाजेपर्यंत श्री गणेशमूर्तीचे विसर्जन केले.

भाविकांच्या प्रतिक्रिया

१. राजेश सोनावणे, परळ – प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती भग्नावस्थेत समुद्र किनार्‍यावर आढळत आहेत. या मूर्ती पाण्यात लगेच विरघळत नाहीत. अशा मूर्ती पाहून भावना दुखावतात. त्यामुळे सर्व भाविकांनी शाडूच्या मातीच्या मूर्ती घ्याव्यात.

२. श्रीमती नीता कदम, मुंबई – प्लास्टर ऑफ पॅरिसच्या भग्नावस्थेतील मूर्ती पाहून पुष्कळ वाईट वाटते. अशी दुरवस्था होत असेल, तर कशासाठी देव घरी आणायचा ? मूर्ती शाडूचीच पाहिजे. आम्ही शाडूच्या मातीची मूर्तीच आणतो.

गिरगाव चौपाटी येथे विसर्जन

गिरगाव चौपाटी येथे सायंकाळी ६ वाजेपर्यंत ९ सहस्र ३६५, तर कृत्रिम तलावांत १ सहस्र २५४ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF