अंबड (जिल्हा जालना) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याच्या प्रकरणी आमदारांसह ४४ जणांना अटक

अधिकृत अनुमती न घेता पुतळा बसवल्याचे कारण पुढे करत पोलिसांकडून कारवाई

शिवप्रेमींवर तत्परतेने कारवाई करणारे पोलीस मात्र न्यायालयाचा आदेश असतांनाही अनधिकृत भोंगे लावणार्‍या मशिदींवर कारवाई करत नाहीत, हे लक्षात घ्या !

जालना – भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी ४४ कार्यकर्त्यांना घेऊन अंबड शहरातील जालना रस्त्यावरील पाचोड चौकात उभारण्यात आलेल्या चौथर्‍यावर पहाटे ३.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा आणून बसवला. या प्रकरणी कुचे यांच्यासह ४४ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा बसवण्यासाठी शासनाची कोणतीही अधिकृत अनुमती न घेता हा पुतळा बसवण्यात आला. रात्रीच्या पहार्‍यावर असलेल्या पोलिसांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर पोलिसांनी पुतळा बसवण्याचे काम करत असलेल्या कुचे यांच्यासह ४४ जणांना कह्यात घेतले.

भाजपचे आमदार नारायण कुचे

पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र राज्य पुतळ्याचा पावित्र्यभंग प्रतिबंध अधिनियम कलम ११, भारतीय दंड विधान संहिता १४३, १४९, १८८, ४४७ आणि १३५ या कलमांन्वये सर्वांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेनंतर शहरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

या संदर्भात आमदार कुचे म्हणाले, ‘‘अंबड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथे बसवण्यात यावा’, असा ठराव मान्य करण्यात आला आहे. लोकांची बर्‍याच दिवसांपासून हा पुतळा बसवण्याची मागणी होती. ती आज आम्ही पूर्ण केली आहे.’’


Multi Language |Offline reading | PDF