जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले चि. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय १ वर्ष) सनातनचे दुसरे बालसंत घोषित !

वामन जयंतीच्या शुभदिनी गोवा येथील सनातन आश्रमात आनंददायी घोषणा

बालसंतांचे प्रत्यक्ष दर्शन घडवून ईश्‍वराने आपल्यावर केलेली मोठी कृपा !

‘जगभरात आतापर्यंत जन्मतः ५० आणि ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेली काही सहस्र बालके उच्च स्वर्गलोक, तसेच महर्लोक येथून पृथ्वीवर जन्माला आली आहेत. कर्नाटकातील मंगळुरू येथील जन्मतः ७१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले पू. भार्गवराम हे बालसंत जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आले आहेत. आता जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आले आहेत दुसरे बालसंत पू. वामन ! पुराणांत भक्त प्रल्हादसारख्या अनेक बालभक्तांच्या गोष्टी असतात. त्या आपण केवळ वाचतो. आपल्याला बालसंतांचे प्रत्यक्ष दर्शन घडवून ईश्‍वराने आपल्यावर मोठी कृपा केली आहे. त्याबद्दल आपण ईश्‍वराच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच ठरेल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सौ. मानसी राजंदेकर यांच्या कडेवर बसलेले पू. वामन यांचा सन्मान करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले. बाजूला कु. श्रीया राजंदेकर आणि श्री. अनिरुद्ध राजंदेकर

सनातन आश्रम, रामनाथी, गोवा – धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णाच्या अनेक लीलांची अनुभूती देणारा भूवैकुंठ आहे सनातनचा रामनाथी आश्रम ! अशा आश्रमातील कलामंदिर हे तर विविध ऐतिहासिक घटनांचे प्रत्यक्ष साक्षीदार ! १० सप्टेंबरला हे कलामंदिर एका दैवी बालकाच्या बाललीलांनी मोहरले. त्याचे रांगणे, मोहक हसणे, सद्गुरु आणि संत यांच्या बोलण्याला सूचक प्रतिसाद देणे आदी सर्वच त्याच्या अलौकिकत्वाची प्रचीती देत होते ! त्याच्या मोहक बाललीला पाहून सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनीही ‘तुला पाहून मी सर्व विसरले’, असे भावपूर्ण उद्गार काढले. सद्गुरु आणि संत यांनाही बाह्यजगाचा विसर पाडणारा तो बालमुकुंद आहे चि. वामन अनिरुद्ध राजंदेकर आणि सोहळा होता त्यांच्यातील संतत्वाचे दर्शन सार्‍या विश्‍वाला घडवणारा संत-सन्मान सोहळा ! या भावसोहळ्यात ‘जन्मतःच अनेक दैवी गुणांचा समुच्चय असलेले चि. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय १ वर्ष) हे जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले दुसरे बालसंत आहेत’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याचे सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घोषित केले अन् उपस्थितांचे हात या बालकाच्या चरणी आपोआपच जोडले गेले. पू. वामन यांचा वामन जयंतीच्या दिवशी, म्हणजे १० सप्टेंबर २०१९ या दिवशी पहिला वाढदिवस होता. याच दिवशी झालेल्या सोहळ्यात ही आनंदवार्ता लाभल्याने सर्वांचाच आनंद द्विगुणीत झाला. अत्यंत शारीरिक त्रास होत असूनही परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले या सोहळ्याला उपस्थित राहिले. या वेळी सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पू. वामन यांचे औक्षण केले, तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेदमंत्रांच्या घोषात पू. वामन यांचा पुष्पहार घालून अन् भेटवस्तू देऊन सन्मान केला.

या सोहळ्याला पू. वामन यांचे वडील श्री. अनिरुद्ध राजंदेकर (या सोहळ्यात यांचीही आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले.), ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या त्यांच्या आई सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर, ६५ टक्के आध्यात्मिक पातळीची त्यांची बहीण कु. श्रीया राजंदेकर (वय ८ वर्षे), नातेवाईक आणि साधक उपस्थित होते. सोहळ्याचे निवेदन श्री. विनायक शानभाग यांनी केले.

सोहळ्याला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू पू. अनंत आठवले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुनीती आठवले यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

सोेहळ्याला उपस्थित सनातनचे अन्य संत

या भावसोहळ्याला सनातनचे संत पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ, पू. पृथ्वीराज हजारे, पू. पद्माकर होनप, पू. भगवंत मेनराय, पू. सीताराम देसाई, पू. (कु.) रेखा काणकोणकर, पू. (सौ.) उमा रविचंद्रन, पू. (श्रीमती) शेऊबाई लोखंडेआजी, पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांची वंदनीय उपस्थिती होती.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी उलगडले पू. वामन यांच्या संतत्वाचे रहस्य !

कार्यक्रमाच्या प्रारंभी चि. वामन यांच्या बाललीला आणि दैवी गुणांची ओळख करून देणारी ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. ही चित्रफीत पाहून काय जाणवले, याविषयी उपस्थितांनी सांगितले. त्यानंतर जनलोकातून एका दैवी बालकाने जन्म घेण्यासाठी ज्या कुटुंबाची ईश्‍वराने निवड केली, अशा आदर्श राजंदेकर कुटुंबियांचे चि. वामनविषयी वैशिष्ट्यपूर्ण मनोगत जाणून घेण्यासाठी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्यांच्याशी संवाद साधला. हा संवाद चालू असतांना चि. वामन यांच्या बाललीलांमधून ते सर्वसाधारण बाळ नसून संतच असल्याचे रहस्य सहजपणे उलगडत गेले. सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश वाचून दाखवल्यावर चि. वामन यांच्या माध्यमातून ईश्‍वराने सनातन परिवाराला दुसरे बालसंत दिल्याचे उघड झाले.

सन्मान सोहळ्याच्या आधी सद्गुरुद्वयींना आलेली दैवी अनुभूती !

सोहळा चालू व्हायच्या काही कालावधीपूर्वीच सद्गुरुद्वयी, म्हणजेच सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या सद्गुरु (सौ.) बिंदाताई सेवा करतात, त्या खोलीत बसल्या होत्या. त्या वेळी त्यांना एका बालकाचा दैवी सुगंध आला. यासंदर्भात सद्गुरु (सौ.) बिंदाताई सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंना म्हणाल्या, ‘‘आज वामनला संत म्हणून घोषित करण्यात येईल. हा सोहळा पहाण्यासाठी जणू दैवी जीवच अवतरले असणार !’’ सद्गुरुद्वयी कार्यक्रमस्थळी गेल्यावर त्यांना समजले की, ‘पू. वामन यांच्या शरिराला नेहमी दैवी सुगंध येतो.’

पू. वामन यांना जणू परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व ज्ञात असल्याच्या दर्शवणार्‍या काही बाललीला !

पू. वामन यांनी व्यासपिठावर पडलेले एक फूल गुरुदेवांच्या चरणांवर वाहिले
आणि स्वतःची आध्यात्मिक स्थिती सर्वांना दाखवून दिली !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश करताच पू. वामन हे विविध आवाज काढून प्रतिसाद देत असल्याचे लक्षात आले. परात्पर गुरूंच्या दिशेने ते स्वत:हून झेप घेत होते.

२. सोहळा चालू असतांना पू. वामन रांगत रांगत व्यासपिठावर विराजमान परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांजवळ जात होते. तेथे खेळता खेळता त्यांनी व्यासपिठावर पडलेले एक फूल अलगदपणे गुरुदेवांच्या चरणांवर वाहिले.

३. पू. वामन हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आसंदीला पकडून उभे राहून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. यातून त्यांनी ‘आपले पूर्वजन्मीचे नाते आहे’, असे सर्वांना दर्शवल्याचे उपस्थितांना वाटले.

पू. वामन यांना काही न सांगताही विविध प्रसंगांतून जणू त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आतून ओळखले. पू. वामन हे जनलोकातील जीव असून जन्मत:च संत असल्याची आणि ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या लोककल्याणकारी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या सर्वव्यापी कार्याशी निगडित असल्याची प्रचीती या दैवी बाललीलेतून उपस्थित साधकांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवली.

भावसोहळ्यातील क्षणचित्रे

१. पू. वामन यांच्या बाललीलांविषयी त्यांची आई सौ. मानसी राजंदेकर सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांना माहिती देत असतांना अधूनमधून तेही त्याला प्रतिसाद देत होते.

२. पू. वामन यांचा सन्मान झाल्यावर त्यांना घातलेल्या हारातील फुलांशी ते खेळू लागले. व्यासपिठावर पसरलेल्या फुलांशी खेळत असतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ‘देवी-देवता सोहळ्याच्या स्थळी येऊन पू. वामन यांच्यावर पुष्पवृष्टी करत आहेत’, असे जाणवले.

३. सोहळ्यामध्ये व्यासपिठावर सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांचा राजंदेकर कुटुंबियांशी संवाद चालू असतांना उपस्थित सर्वांना तुळशीसम सुगंध आला आणि तो वाढत गेला. या वेळी ‘पू. वामन यांच्या गळ्याच्या समोरच्या आणि मागच्या बाजूने सुगंध येत आहे’, असे लक्षात आले. यासंदर्भात एक संत म्हणाले की, पू. वामनमध्ये श्रीकृष्णतत्व असल्याने तुळशीचा सुगंध येत आहे.

४. पू. वामन संत असल्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश वाचून दाखवत असतांना सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांचा भाव जागृत झाल्याने त्यांचे शब्दही भावाश्रूंनी ओथंबले होते.

५. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या ज्योतिष विभाग प्रमुख ज्योतिष फलित विशारद सौ. प्राजक्ता जोशी यांनी पू. वामन यांच्याविषयी केलेले ज्योतिषशास्त्रीय विवेचन श्री. विनायक शानभाग यांनी वाचून दाखवले. यात सौ. जोशी यांनी ‘चि. वामन हे १ वर्षात संत होतील’, असे भाकित केले होते. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे ज्योतिषपारंगत श्री. राज कर्वे यांनी पू. वामन यांच्याविषयी  सांगितले, ‘‘चि. वामन याला देवता आणि संत यांच्याप्रती ओढ असेल. त्याला संतांचा सहवास प्राप्त होईल. त्याला कीर्ती लाभेल. वामन सर्वगुणसंपन्न असून तो ‘दैवी बालक’ आहे.’’

६. ‘वामन केवळ दैवी बालक नसून तो संत आहे आणि परात्पर गुरु डॉक्टर आठवले तो संत असल्याचे लवकरच घोषित करतील’, असे विचार माझ्या मनात आले’, असे कु. मधुरा भोसले यांनी सांगितले.

७. श्री. विनायक शानभाग यांनी सोहळ्याचे सूत्रसंचालन भावपूर्ण केले. ‘ते सूत्रसंचालन करत नसून गुरुदेवांच्या चरणी आत्मनिवेदन करत आहेत’, असे वाटत होते.

८. काही आठवड्यांंपूर्वी श्री. अनिरुद्ध राजंदेकर यांचे कुटुंब पूर्णवेळ सेवा करण्यासाठी गोवा येथे वास्तव्यास आले आहे. श्री. अनिरुद्धही लवकरच पूर्णवेळ होणार आहेत. सर्व कुटुंबियांची अध्यात्माच्या दिशेने घौडदौड चालू असतांनाच ही आनंदाची भेट गुरुदेवांनी दिली त्यामुळे सोहळ्यात सर्व कुटुंबियांच्या चेहर्‍यावर पुष्कळ कृतज्ञता जाणवत होती.

९. आश्रमातील कलामंदिरात अनेक संत सोहळे झाले आहेत; परंतु अद्वितीय बालसंत पू. वामन यांच्या सोहळ्याच्या वेळी ‘आनंदी आनंद’ असल्याचे उपस्थित सद्गुरु, संत आणि साधकांनी अनुभवले.


Multi Language |Offline reading | PDF