गणपतिबाप्पाला निरोप देतांना केलेले भावपूर्ण आत्मनिवेदन !

‘विसर्जनासाठी चाललेल्या गणपतीचे चित्र पाहिल्यावर मला पुढील ओळी सुचल्या.

श्री. सुमित सागवेकर

बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या ।
बाप्पा, तू जातांना डोळ्यांत पाणी का येते रे ।
लहान मुलांनाही कळते अन् मोठेही रडतात रे ॥ १ ॥

जातांना तुझे मुख अधिकच तेजस्वी कसे वाटते रे ।
शाडूच्या मूर्तीत तुझे तत्त्व
आल्यानेच असे होते ना रे ? ॥ २ ॥

बाप्पा, आमच्याकडून तुझी शास्त्रशुद्ध पूजाअर्चा होत नाही ।
तरीही तू आमच्या घरी अन् गणेश मंडळात येतोस ।
आम्हाला शक्ती, बुद्धी अन् भक्ती द्यायलाच तू येतोस ॥ ३ ॥

आजी म्हणते, ‘तू ‘पाहुणा’ म्हणून येतोस ।
सर्वांना एकत्र आणतोस, त्यांना गुण्या गोविंदाने नांदवतोस ।
आणि सर्वांना रडवून निघून जातोस ॥ ४ ॥

जेव्हा समजू लागले, तेव्हापासून तू जातांना
प्रतिवर्षी डोळ्यांत पाणी येते ।
गुरुदेव सांगतात, ‘देवाच्या आठवणीने रडू येणे,
म्हणजे ‘भाव जागृत होणे’ ॥ ५ ॥

तू चाललास; पण आम्हाला खूप काही देऊन अन्
शिकवून जात आहेस ।

बाप्पा, तू आनंद देतोस, चैतन्य देतोस अन्
कृपेचा वर्षावही करतोस ॥ ६ ॥

तुझ्यासाठी डोळ्यांत आलेले पाणी नित्य डोळ्यांतून वाहू दे ।
आमचा तुझ्या प्रती असलेला भाव प्रतिदिन जागृत होऊ दे ।
बाप्पा, तुझी आठवण आम्हाला सतत होऊ दे, सतत होऊ दे ॥ ७ ॥

गणपतिबाप्पा मोरया । मंगलमूर्ती मोरया । पुढच्या वर्षी लवकर या ।’

श्री गुरुचरणांचा दास,

– श्री. सुमित सागवेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.९.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF