भूषण आमले याच्या अपघाती मृत्यूस उत्तरदायी असणार्‍या संबंधितांवर कारवाई करण्यात यावी

कराड (जिल्हा सातारा) येथील आमले कुटुंबियांची पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

कराड, १० सप्टेंबर (वार्ता.) – येथील श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे कार्यवाहक श्री. सागर आमले यांचे चिरंजीव भूषण सागर आमले (वय १० वर्षे) याचा नगरपालिकेच्या घंटागाडीच्या अपघातात ८ सप्टेंबरला दुर्दैवी मृत्यू झाला. आज कराड येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे भूषण याचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम झाल्यानंतर आमले कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी कराड शहर पोलीस ठाणे येथे तक्रारीचे निवेदन देण्यासाठी श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने दुचाकीवरून मोर्चा काढण्यात आला. या वेळी संबंधित चालक, ठेकेदार, नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी, तसेच मुख्याधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात यावा, या मागणीचे निवेदन कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. क्षीरसागर यांना देण्यात आले. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक श्री. रावसाहेब देसाई, महाजन गुरुजी, नगरसेवक श्री. सौरभ पाटील, भाजप युवा मोर्चाचे श्री. सुदर्शन पाटसकर तसेच सहस्रोंच्या संख्येने धारकरी उपस्थित होते.

या घटनेस तीन दिवस होऊनही नगरपालिकेचे अधिकारी, तसेच पोलीस प्रशासन यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमले कुटुंबियांची भेट घेतली नाही. याविषयी प्रशासनाचा निषेध नोंदवत धिक्कार करण्यात आला. निवेदन स्विकारल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री. क्षीरसागर यांनी गणेशोत्सव आणि मोहरम यानिमित्तच्या बंदोबस्तामुळे सागर आमले कुटुंबियांना भेटता आले नाही. याविषयी दिलगिरी व्यक्त करत आज मी त्यांना भेटणार असल्याचे सांगत दोषींवर चौकशीअंती कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.

आज कराड येथे मोर्चा

११ सप्टेंबरला संबंधित दोषी अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्यासाठी कराड नगरपालिकेवर सकाळी ११ वाजता भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF