विसर्जनातील हिडीसपणा !

नुकतेच गौरी आणि पाच-सात दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन पार पडले. यामध्ये घरगुती, तसेच सोसायटीत विराजमान केलेल्या श्री गणेशमूर्तींचे प्रमाण सर्वाधिक होते. अनंतचतुर्दशीला काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे विसर्जन मिरवणुकीत ‘बेंजो’चा उपयोग करतात. तोच भाग घरगुती, तसेच सोसायटीतील श्री गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुकांतही पहावयास मिळाला. नाचण्याची वैयक्तिक हौस पुरवण्यासाठी पैशांची उधळपट्टीच केली गेली. मुली आणि महिलावर्गही बेंजोच्या तालावर ठेका धरत होत्या आणि रस्त्यावरून ये-जा करणारे कित्येकजण त्याचे भ्रमणभाषमध्ये ध्वनीचित्रीकरण करत होते. काहीजण थांबून ते नृत्य पहात होते. भ्रमणभाषमधील व्हिडिओमध्ये मोडतोड करून सामाजिक प्रसारमाध्यमांवरून त्याचा प्रसार केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपली कृती धर्माच्या दृष्टीने अयोग्यच आहे. त्याचप्रमाणे त्याचा अपलाभही उठवला जाऊ शकतो. विसर्जनाच्या वेळी पाऊसही चालू होता. त्यामुळे नाचणार्‍या अनेकांना पावसात नाचतांना अधिक उत्साह वाटत होता. या एकंदरीत प्रकाराला ‘पावसातील नाच’ (रेन डान्स) म्हणता येईल. अशा प्रकारे काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीत भक्तीभावाचा अंशतः लवलेशही कुठे दिसत नव्हता. प्रत्येक वर्षी आदल्या वर्षीपेक्षा हिडीसपणा वाढत आहे, असे लक्षात आले. उत्तर भारतीय महिला डोक्यावर पदर घेण्याची त्यांची परंपरा काटेकोरपणे पाळतात; परंतु या मिरवणुकांत इतरांप्रमाणेच त्याही नाचत असल्याचे पहायला मिळाले.

गणपतीचे आगमन, पूजन आदी गोष्टी प्रत्येकजण आवडीने करत असतो. त्यामुळे घरातील वातावरणही गणेशमय होऊन जाते; मात्र जेव्हा विसर्जनाचे सूत्र येते, तेव्हा अनेकजण वरील प्रकारेच गणेशाला निरोप देतात. परिणामी विसर्जन स्थळापर्यंतच्या वातावरणात गोंधळच ऐकायला येत असतो. असे करून गणेशमय झालेले वातावरण शेवटच्या दिवशी आपण का बिघडवतो ?, याचा गांभीर्याने विचार व्हावा. खरेतर अनंतचतुर्दशीला गणेशाचे भजन म्हणत किंवा नामजप करत निरोप देण्यासाठी नियोजन व्हायला हवे. तरच वातावरण खर्‍या अर्थाने भक्तीमय होणार आहे. तसेच पोलीस यंत्रणेवरही विसर्जन मिरवणुकीचा ताण नसेल. हा उत्सवच भक्तीचा आहे. त्यामुळे तो भक्तीभाव पुढील वर्षभर टिकून रहाण्यासाठी पुढाकार घेणे, हे गणेशभक्तांचे आद्यकर्तव्य आहे. एवढे दिवस पूजाअर्चा करून मिळवलेली श्री गणेशाची कृपा आपल्यावर अखंड कशी राहील ?, असे पहायचे की वैयक्तिक हौस पुरवण्यासाठी विसर्जन मिरवणुकीला माध्यम बनवायचे, हे आपल्यावरच असणार आहे !

– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.


Multi Language |Offline reading | PDF