राष्ट्रकार्य करण्याचे ध्येय उराशी बाळगून समाजोत्कर्षासाठी झटणारे भाजपचे आमदार नरेंद्र पवार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नाळ जोडलेली असल्याने श्री. नरेंद्र पवार यांना राष्ट्र आणि धर्म प्रेमाचे बाळकडू मिळाले. लहानपणीच त्यांनी राष्ट्रकार्य करण्याचे ध्येय उराशी बाळगले. संघाच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि सामाजिक कार्ये करतांना वर्ष १९९३ ते २००० मध्ये पूर्णवेळ कार्य करण्यासाठी ते घरातून बाहेर पडले. राष्ट्रकार्यासाठी महाराष्ट्रात जायचे असो वा काश्मीरमध्ये, ते नेहमी तत्पर असत. वर्ष २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत ते पहिल्यांदा कल्याण पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील विविध पदांवरील कार्य करत कल्याणमध्ये भाजपचा नगरसेवक, महापालिकेतील उपमहापौरपद ते कल्याण पश्‍चिमचे आमदारपद भूषवत त्यांनी विविध सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक कार्ये केली. मतदारसंघातील प्रचंड जनसंपर्क, प्रसंगी विरोधी पक्षाच्या उमेदवारांना भेटून त्यांची कार्ययोजना समजून त्या मतदारसंघात राबवणे, हे त्यांचे सर्वसमावेशकपणाचे लक्षण आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याच पार्श्‍वभूमीवर दैनिक सनातन प्रभातच्या वार्ताहराने त्यांच्याशी केलेल्या चर्चेत त्यांच्या कार्याचे स्वरूप विविध प्रकारे लक्षात आले. या मुलाखतीतून हे स्वरूप उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रश्‍न – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते आमदारपदापर्यंतची वाटचाल कशी झाली ?

उत्तर – लहान असतांनाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलो गेलो. देशासाठी योगदान म्हणून राष्ट्रपुननिर्माणाच्या व्यापक चळवळीत झोकून देत १९९३ ते २००० या काळात घरापासून दूर राहून विविध आंदोलने, कार्यक्रम, भाषणे करत कार्य वाढवले. वर्ष २००३ मध्ये भाजपने कल्याण शहराध्यक्ष म्हणून दायित्व दिले. २००५ ते २०१० या वर्षामध्ये भाजपकडून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून प्रचंड मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर वर्ष २००८ ते २०१० मध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उपमहापौर म्हणून कार्य केले. २०१३ ते २०१५ या काळात भाजप कल्याण जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत कल्याण पश्‍चिम विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचे १८, तर भाजपचे २ नगरसेवक, असे पक्षीय बलाबल असतांनाही आमदार म्हणून निवडून आलो. याची नोंद घेत महाराष्ट्र प्रदेश भाजपने माझी ‘महाराष्ट्र प्रदेश सचिव’पदी नेमणूक केली.

‘माझे माझ्या भारतमातेवर प्रेम आहे; म्हणून मी काश्मीरला जाणारच…!’

प्रश्‍न – तुमचे राष्ट्रीय आणि हिंदुत्वाच्या कार्यात कसे योगदान राहिले आहे ?

उत्तर – अ. ३० वर्षांपूर्वी तरुण वयात काश्मीरमधील ३७० कलमाला विरोध करण्यासाठी मी काश्मीरमध्ये जाण्याचे ठरवले होते. त्या वेळी मला घरातून विरोध होता. तेव्हा मी वडिलांना, ‘‘तुमचे माझ्यावर प्रेम आहे म्हणून तुम्ही मला जाऊ देत नाही; मात्र माझे माझ्या भारतमातेवर प्रेम आहे म्हणून मी काश्मीरला जाणारच’’, असे ठामपणे सांगून अंगावरील कपड्यानीशी घरातून निघून गेलो. काश्मीरला मी ८ दिवस होतो. त्या वेळी काश्मीरमधील ‘कलम ३७०’ रहित व्हावे यासाठी हातात तिरंगा घेऊन तेथे सत्याग्रह केला होता. ‘समान नागरी कायदा’ लागू व्हावा आणि काश्मीरमध्ये तिरंगा ध्वज जाळला जाऊ नये, अशी आमची मागणी होती. त्या वेळी मला अटक झाली होती.

आ. लातूर जिल्ह्यातील खिल्लारी गावात झालेल्या भूकंपाच्या वेळी पीडितांना साहाय्य करण्यासाठी तेथे ३ मास थांबलो होतो. तेथे प्रेत उचलण्यापासून विविध कामे आम्ही केली.

इ. हिंदु धर्मियांवर होणार्‍या आघातांसंदर्भात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना करत असलेल्या आंदोलने, मोर्चे यांना माझा नेहमीच पाठिंबा राहिला आहे. हिंदूंच्या आंदोलनाला, मोर्चे काढण्याला पोलीस अनुमती देत नसत; मात्र मी चळवळीतून आलेलो असल्याने कार्यकर्त्यांची स्थिती काय असते, हे लक्षात घेऊन त्यांना अनुमती मिळवून देत होतो.

ई. कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणावर होणारी गो-तस्करी आणि गोहत्या यांच्या विरोधात कार्य करतांना गोरक्षकांना मोठ्या प्रमाणात कठिण प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्या वेळी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून गोवंशाची रक्षा करता आली.

पोलिसांचा विरोध झुगारून शिवभक्तांसह दुर्गाडी किल्ल्यावर पालखीसह जाऊन श्री दुर्गामातेचे दर्शन घेणे !

शिवजयंतीच्या निमित्ताने दुर्गाडी किल्ल्यावर भांडुप येथील साईलीला मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी आणली होती. पोलिसांकडे रितसर अनुमती मागितली असतांनाही अनुमती नाकारण्यात आली होती. पालखी किल्ल्याच्या पायथ्याशी आली असता १५० सशस्त्र पोलिसांच्या ताफ्याने पालखीला किल्ल्यावर नेण्यास मज्जाव केला. तसेच शिवरायांच्या घोषणा देऊ नये, ५-५ जणांनाच किल्ल्यावर प्रवेश देण्यात येईल, अधिक काळ किल्ल्यावर थांबता येणार नाही, असे अनेक निर्बंध पोलिसांनी घातले होते. हे जेव्हा कळले, तेव्हा महाराष्ट्रात शिवभक्तांवर हा अन्याय होता कामा नये; म्हणून पोलिसांचा विरोध झुगारून निषेध करत शिवभक्तांसह पालखी घेऊन किल्ल्यावर असलेल्या श्री दुर्गामातेचे दर्शन घेतले.

दुर्गाडी किल्ल्याची डागडुजी आणि टिटवाळा येथील श्री गणेश मंदिर विकासासाठी कोट्यवधीचा निधी !

प्रश्‍न – गेल्या ५ वर्षांत आपण मतदारसंघात केलेल्या महत्त्वपूर्ण कामांविषयी काय सांगाल ?

उत्तर – अ. श्रीक्षेत्र टिटवाळा श्री गणेश मंदिराच्या परिसर विकासासाठी अनुमाने २.५ कोटी रुपयांचा निधी आणला. त्यातून तेथे विविध पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

आ. लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याचे काही बुरूज कालांतराने ढासळले होते. त्यांच्या डागडुजीसाठी शासनाकडून १ कोटी ७९ लाख रुपये संमत करवून घेतले आहेत.

इ. कल्याण पश्‍चिम भागात क्षेपणभूमीची (डंपिंग ग्राऊंडची) सर्वांत मोठी समस्या होती. प्रचंड दुर्गंधी, कचरा जाळल्याने निर्माण होणारा धूर, प्रदूषण, आरोग्याचे प्रश्‍न जनतेला भेडसावत होते. ते दूर करण्यासाठी कचर्‍यावर प्रक्रिया करणारा ११४ कोटी रुपयांचा  प्रकल्प आणण्यात यश मिळाले. यासह कचर्‍याची समस्या लक्षात घेऊन ३७ लाख ५३ सहस्र रुपयांच्या घंटागाड्या खरेदी करून पालिकेला दिल्या आहेत.

ई. गणेशघाट रुंदीकरण चालू आहे. विविध उद्यान विकासासाठी १२ कोटी रुपयांच्या निधीला संमती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र बांधणीकरता ८.०१ कोटी, खाडीकिनारा जेटीसाठी ९ कोटी, कामगार भवनसाठी ५ कोटी, पायाभूत सुविधांसाठी ३५ कोटी रुपयांचा विशेष निधी आणला आहे.

सामाजिक भावनेतून गरीब रुग्णांसह विविध स्तरांतील लोकांसाठी पुढाकार !

प्रश्‍न – सामाजिक जाणीवेतून मतदारसंघात कोणती कामे केली आहेत ?

उत्तर – अ. राजकारण हे समाजसेवेचे माध्यम आहे; म्हणून मी राजकारणात आहे. सकाळी मॉर्निंग वॉकपासून ते चहा पिण्यासाठी आणि अन्य निमित्ताने १००-१५० हून अधिक लोकांच्या भेटी घेतो. कल्याणमध्ये अतीवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाल्यावर पाण्याच्या पातळीचा विचार न करता लोकांच्या साहाय्यासाठी उतरलो.

आ. हृदयरोग, कर्करोग आदी विविध गंभीर व्याधींनी ग्रस्त गरीब रुग्णांची होणारी परवड लक्षात घेऊन त्यांच्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून ४ कोटी ४२ लाख रुपये मिळवून दिले आहेत. आजही ही कामे सतत चालू आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गरजू रुग्णांना तात्काळ आरोग्य सेवा मिळावी; म्हणून १५ लाख रुपयांच्या रुग्णवाहिका खरेदी करून देण्यात आल्या आहेत.

इ. टिटवाळा येथील ४ सहस्र लोकसंख्या असलेले नांदप गाव दत्तक घेऊन त्याच्या विकासासाठी दीड कोटी रुपयांचा निधी आणला. त्या माध्यमातून गावात विविध पायाभूत सुविधा निर्माण केल्या.

ई. जालना जिल्ह्यातील ५५१ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींची सामुदायिक सोहळ्याद्वारे विवाह करून देण्यात आले. तसेच ६ तालुक्यांत जलयुक्त शिवार योजना राबवण्यात आली.

उ. ‘घर तेथे रांगोळी’ या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून मतदारसंघातील २७ सहस्र महिलांना संपर्क केला. त्यांच्या घरात आणि परिसरात सुव्यवस्था यावी; म्हणून स्वच्छता, वीज, पिण्याचे पाणी आदी समस्या समजून त्याचे निवारण केले.

ऊ. वृक्षलागवडीसाठी ७ कोटी रुपयांचा निधी आणून त्या माध्यमांतून ५६ सहस्र वृक्षांची लागवड केली आहे.

ए. वालधुनी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सध्या माझा प्रयत्न चालू आहे.

ऐ. घरगुती गणपति दर्शनाच्या निमित्ताने दरवर्षी गणेशोत्सवात १ सहस्र घरांना थेट संपर्क केला आहे.

प्रश्‍न – भविष्यातील योजना काय असणार आहेत ?

उत्तर – अ. देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी या कल्याणमधील रहिवासी होत्या. त्याविषयी येणार्‍या पिढीलाही माहिती मिळावी या उद्देशाने त्यांचे मोठे स्मारक उभारण्याचा मानस आहे.

आ. कल्याण शहरातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या रुक्मिणीबाई रुग्णालयाला जिल्हा दर्जा देण्याचा प्रस्ताव सिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे या रुग्णालयातच विविध सुविधा उपलब्ध होऊन रुग्णांना त्याचा लाभ होणार आहे. याच ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचाही प्रयत्न आहे.

इ. ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या माध्यमातून कल्याणचा विकास करायचा आहे. शहरातील सर्व समाजघटकांचा विचार करत कामगार कल्याण केंद्र भवन, विज्ञान पार्क, कौशल्य विकास केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, डाक घर, बस आगार अशा अनेक विकास कामांना प्रारंभ झाला आहे. मेट्रो रेल्वेचा मार्ग खडकपाडामार्गे वळवून घेण्यात यश मिळाले आहे.

ई. सुदृढ पिढी निर्माण होण्यासाठी आणि खेळाडूंसाठी सुसज्ज क्रीडांगणे आवश्यक असतात. विधानसभा क्षेत्रातील फडके मैदान आणि सुभाष मैदान यांना क्रीडांगण म्हणून विकसित करण्याला प्रारंभ केला आहे.

अखंड भारताचे निर्माण करणे हेच माझे पुढील कार्य असेल !

प्रश्‍न – राष्ट्र-धर्माच्या दृष्टीने भविष्यात तुमची वाटचाल कशी असणार आहे ?

उत्तर – केंद्रातील मा. नरेंद्र मोदी सरकारने कलम ३७० आणि ३५(अ) रहित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुढे देशात समान नागरी कायदा करण्याचे सुतोवाच केले आहे. हेच विचार आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मिळाले आहेत. त्यासाठी देशस्तरावर धर्मांतरबंदी कायदा आणि गोहत्याबंदी कायदा करणे, काँग्रेस सरकारच्या काळात झालेल्या इतिहासाचे विकृतीकरण, तसेच बांगलादेशी घुसखोरी रोखणे यांसह भारताला पूर्वीसारखे ‘अखंड भारत’ बनवणे हेच माझेही पुढील कार्य असणार आहे.

कोणतीही भीडभाड न ठेवता राष्ट्र-धर्म विषयक कार्यात सक्रीय साहाय्य करणारे आमदार नरेंद्र पवार !

१. नागपूर येथे महाराष्ट्र विधीमंडळाचे अधिवेशन चालू असतांना एका मुसलमान आमदाराने नागपूर रेल्वे स्थानकाला ‘बाबा ताजुद्दिन रेल्वेस्थानक’ असे नामकरण करण्याच्या मागणीसाठी विधान भवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन केले. त्याला वृत्तपत्रांतून अधिक प्रसिद्धी मिळाली. तेव्हा नागपूरचे संघाशी घनिष्ठ नाते आहे. नागपुरात संघ मुख्यालय आहे, तर नागपूर रेल्वेस्थानकाला ‘केशव बळीराम हेडगेवार रेल्वेस्थानक’ नाव देण्याची मागणी श्री. पवार यांनी आंदोलनाद्वारे केली. त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली आणि आधीचा विषय बाजूला पडला.

२. भोंदू बंगाली बाबा, ट्रॉम्बे (मुंबई) येथे दंगल करून पोलीस व्हॅन जाळणारे धर्मांध, उल्हासनगर येथे सिंधी बांधवांचे धर्मांतर करणारे मिशनरी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी शासनाला पत्र देणे असो वा एन्.सी.ई.आर्.टी.च्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा विस्तृत इतिहास शिकवण्याची मागणी असो, श्री. पवार स्वतःचे पत्र घेऊन मंत्र्यांच्या भेटीला येण्यासाठी तत्पर असतात. राष्ट्र-धर्माचे विषय धसास लागले पाहिजेत, अशी त्यांची तळमळ असते.

३. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध राष्ट्र-धर्म विषयक आंदोलने घेतल्यावर त्यांना अनुमती मिळवून देणे, समाजोपयोगी उपक्रमांना साहाय्य करणे, आंदोलनात सहभागी होणे, हिंदु धर्मजागृती सभांना उपस्थित राहणे, सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट देणे आदींद्वारे हिंदुत्वनिष्ठ संघटनांशी त्यांनी आपुलकीचे नाते निर्माण केले आहे. हे करत असतांना कोण काय म्हणेल ?, काय परिणाम होईल ?, याचा त्यांनी कधीही विचार केला नाही. ते हिंदुत्वाचे कार्य आहे, असे समजून ते करतात !


Multi Language |Offline reading | PDF