(म्हणे) ‘काश्मीरमध्ये भारताकडून नरसंहार !’

संयुक्त राष्ट्रांसमोर पाकिस्तानचा आरोप

पाकने जगाला कितीही ओरडून खोटे सांगण्याचा प्रयत्न केला, तरी जगाला सत्य काय आहे, ते ठाऊक आहे !

जिनिव्हा (स्वित्झर्लंड) – पाकिस्तानने काश्मीरच्या प्रश्‍नावरून त्याची बाजू मांडत संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेसमोर भारताच्या विरोधात ११५ पानांचे पुरावे सादर केले. यात पाकने भारतावर अनेक आरोप केले आहेत. पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी संयुक्त राष्ट्रांसमोर म्हटले की, काश्मीर भारताचे अंतर्गत सूत्र नाही. तेथे भारताकडून नरसंहार होत आहे. काश्मीरमधील परिस्थिती जाणून घेण्यासाठी संयुक्त अन्वेषण समितीची नेमणूक करावी.

कुरेशी यांनी आरोप करतांना म्हटले की, भाजपच्या घोषणापत्रात ‘काश्मीरमध्ये मुसलमानांना बलपूर्वक अल्पसंख्याक करण्यात येणार आहे’, असे म्हटले आहे. (घोषणापत्रात असा उल्लेख नसतांना आंतरराष्ट्रीय स्तरावर धादांत खोटी माहिती देणारा पाक ! अशा पाकचा निःपात आवश्यक ! – संपादक) काश्मीरमध्ये स्मशानशांतता असून तेथे भारताकडून नरसंहार केला जात आहे. (आतंकवाद्यांचा नि:पात हा पाकला नरसंहार वाटणार ! – संपादक) काश्मीरध्ये मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले जात आहे. तेथे ७ ते १० लाख सैनिक तैनात असून काश्मीर जगातील सर्वांत मोठा कैदखाना झाला आहे.

काश्मीरमध्ये ६ सहस्रांहून अधिक नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी यांना अटक करण्यात आली आहे. भारत काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य झाली असल्याचा दावा केला आहे; मग भारत काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आणि संस्था यांना जाण्याची अनुमती का देत नाही ? (पाक तो पोसत असलेल्या आतंकवादी केंद्रांना भेटण्याची मुभा आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना देतो का ? कुठल्या देशांनी कोणाला बोलवावे अथवा निमंत्रित करावे, हा भारताचा व्यक्तिगत प्रश्‍न आहे. पाकने त्यात नाक खुपसू नये ! – संपादक) त्याला ठाऊक आहे की, असे केले, तर सत्य जगासमोर येईल. काश्मीरमध्ये पॅलेट गनचा वापर बंद करण्यात यावा आणि संचारबंदी हटवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

जम्मू-काश्मीर भारताचेच राज्य ! – पाक

सत्य चुकून का होईना, पाकच्या मुखातून बाहेर पडले, हे बरेच झाले !

जम्मू-काश्मीर हे भारताचेच राज्य आहे, अशी स्पष्ट स्वीकृती शाह महमूद कुरेशी यांनी या वेळी बोलतांना दिली. कुरेशी यांनी काश्मीरचा उल्लेेख ‘इंडियन स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर’, असा केला. ७२ वर्षांनंतर पाकिस्तानने ही स्वीकृती दिली आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थानिकांकडून स्वातंत्र्याची मागणी

नवी देहली – पाकव्याप्त काश्मीरच्या तत्तापानी या भागात स्थानिकांनी पाक सैन्याच्या विरोधात निदर्शने करत स्वातंत्र्याची मागणी केली. यामुळे रावलकोट, हजिरा, तेतरी नोट या जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, तसेच अनेकांना अटक करण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF