‘तेनालीं’ना राजाश्रय मिळावा !

भारतभूमीला अत्युच्च आध्यात्मिक आणि बौद्धिक वारसा लाभलेला आहे. शास्त्र, न्यायदान, नगररचना, स्थापत्य, कला, संगीत, राजविद्या आदी क्षेत्रांमध्ये अत्युच्च शिखरावर पोेचलेल्या कितीतरी प्राचीन विद्वानांची नावे सांगता येतील. अशा व्यक्तींना घडवणारा पाया गुरुकुलांचा होता. अर्वाचीन काळात ही व्यवस्था मोडीत निघून त्याची जागा पोटार्थी शिक्षण देणार्‍या ‘मेकॉले’ शिक्षणपद्धतीने घेतली. विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण करणार्‍या या शिक्षणपद्धतीवर अनेक अभ्यासकांनी ताशेरे ओढले असूनही या व्यवस्थेमध्ये म्हणावेसे पालट झालेले नाहीत. परिणामस्वरूप विद्वान व्यक्ती घडवण्याचे गुरुकुलरूपी जे यज्ञकुंड होते, त्याला आज केवळ एका पणतीचे स्वरूप आले आहे; पण या पणतीमधून निघणारे तेजच अनेक वाटा प्रकाशित करत आहे. प्रियव्रत पाटील हे अशा ज्ञानतेजाने तळपणार्‍या विद्वतजनांपैकी एक नाव ! वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी प्रियव्रत पाटील यांनी वैदिक ज्ञानाच्या संदर्भात अत्यंत प्रतिष्ठित असणारी ‘तेनाली’ ही परीक्षा उत्तीर्ण केली. ही परीक्षा उत्तीर्ण करणारे श्री. प्रियव्रत हे सर्वांत अल्प वयाचे विद्यार्थी ठरले आहेत. श्री. प्रियव्रत यांनी त्यांच्या वडिलांकडून वेद आणि न्याय यांचे शिक्षण घेतले, तर सर्व व्याकरण महाग्रंथांचे शिक्षण त्यांनी श्री. मोहन शर्मा यांच्याकडून घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘ट्वीट’ करून श्री. प्रियव्रत यांचे कौतुक केले. या कौतुकाच्या भावनेचे रूपांतर राजाश्रयामध्ये व्हावे आणि अशा आधुनिक ‘तेनालीं’च्या ज्ञानाचा समाज आणि राष्ट्र यांच्या उत्थानासाठी उपयोग व्हावा, ही अपेक्षा !

‘तेनाली’चा ब्रॅण्ड !

‘तेनाली’ हे एकप्रकारच्या मुक्त विद्यापिठाप्रमाणे आहे. ते सांभाळणारे आचार्य अंजनेयुलु यांनी या परीक्षापद्धतीचा दर्जा राखून ठेवला आहे. त्यामुळेच ‘तेनाली’चा आता एक ‘ब्रॅण्ड’ सिद्ध झाला असून विदेशी जिज्ञासूही ज्ञानार्जनासाठी येथे येतात. ‘श्री कांची वेद वेदांत शास्त्र सभा’ यांच्याकडून ‘तेनाली परीक्षा’ घेतली जाते आणि या परीक्षेत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी पुढे विविध विद्याशाखांमध्ये कार्यरत रहातात. ही परीक्षा कोणत्याही परीक्षाकेंद्रावर होत नाही, तर अंजनेयुलु यांच्या गोशाळा असणार्‍या घरवजा आश्रमामध्ये होते. या परीक्षेचे १४ स्तर असतात. सर्व स्तर पार केल्यानंतर कांची कामकोटी पिठामध्ये शेवटची महापरीक्षा घेतली जाते. ती तोंडी स्वरूपाची असते. प्रचलित अन्य विद्यापिठांमध्ये होणार्‍या कामचलाऊ तोंडी परीक्षांप्रमाणे ही नसते. या विद्यापिठांमध्ये तोंडी परीक्षा ही विद्यार्थ्यांना ‘वर’ ढकलण्यासाठी घेतली जाते; पण शास्त्रसभेमध्ये होणारी तोंडी परीक्षा ही विद्यार्थ्याचे ज्ञान, चिंतन, आकलन आणि विश्‍लेषण यांचा कस लावणारी असते. या गुरुकुल व्यवस्थेमागे व्यावसायिक हेतू नसल्याने ‘सरसकट उत्तीर्ण करणे’ अथवा ‘एटीकेटी’ अशा पळवाटांची ‘तेनाली’ परीक्षेला आवश्यकता नाही; किंबहुना यामुळेच अशा गुरुकुलांचा दर्जा टिकून राहिला आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना ‘रत्न’ ही उपाधी देऊन गौरवण्यात येते. या परीक्षेचे विद्यार्थी म्हणजे गुरुगृही राहून ज्ञानार्जन करणारे ज्ञानोपासक असतात. गुरूंच्या घरी राहून ६-७ वर्षे विविध विषयांचे अध्ययन करणे बंधनकारक असते. तर्क, मीमांसा, वेदांत, व्याकरण आदी प्राचीन ज्ञानशाखांमध्ये पारंगत विद्यार्थी हेच खरे राष्ट्राचे वैभव आहे.

हिंदु संस्कृतीची महानता !

‘गुरु-शिष्य परंपरा’ हे हिंदु संस्कृतीचे आणि भारताचे वैशिष्ट्य आहे. गुरुकुलांमधून या परंपरेची जोपासना होते; मात्र इंग्रजांच्या काळात या शिक्षणपद्धतीवर जाणीवपूर्वक आघात करण्यात आले. स्वातंत्र्योत्तर काँग्रेसच्या राजवटीत इंग्रजांपेक्षाही अधिक प्रमाणात शिक्षणक्षेत्रात विकृती पसरवली गेली. प्राचीन ज्ञान, विज्ञान आणि परंपरा यांच्याशी असलेली नाळ तोडून टाकण्याचे कसोशीने प्रयत्न झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिला घाव ‘संस्कृत’ या देवभाषेवर घालण्यात आला. संस्कृतची ‘मृत भाषा’ अशी हेटाळणी करून जातीवर्चस्वाच्या नावाखाली सर्वसामान्य भारतियांना संस्कृतपासून दूर ठेवले गेले. परिणामी या भाषेतील ग्रंथांमध्ये असणार्‍या अनमोल ठेव्यापासून सर्वसामान्य वंचित राहिले; मात्र त्यामुळे हिंदूंचा हा वारसा नामशेष होणारा नव्हता. तत्कालीन सरकारकडून तो कितीही दडपण्याचा प्रयत्न झाला, तरी काही भागांमध्ये गुरुकुल पद्धत, वेदपाठशाळा यांच्याद्वारे प्राचीन ज्ञानपरंपरेचा वारसा पुढे चालवण्यात आला आणि अजूनही तो चालवण्यात येत आहे. अवघ्या १६ व्या वर्षी वेद, न्याय आणि व्याकरण या क्लिष्ट विषयांमध्ये पारंगत होणार्‍या प्रियव्रत यांच्या रूपाने या परंपरेची फळे दिसत आहेत. हीच हिंदु संस्कृतीची महानता आहे. जगामध्ये विकसित झालेल्या ग्रीक, रोमन आणि इजिप्त या संस्कृती काळाच्या ओघात आटल्या; पण हिंदु संस्कृती आजही जिवंत आहे; किंबहुना या संस्कृतीचा जगभरात प्रसार होत आहे, तो त्यामध्ये असलेल्या चैतन्यामुळे !

कालचक्राची गती !

गेल्या ४-५ शतकांत हिंदु संस्कृतीचे दमन करण्याचा परकीय आक्रमक, तसेच जन्माने स्वकीय राज्यकर्ते यांच्याकडून प्रयत्न झाला, तरी त्यामुळे सनातन धर्माचे तेज संपलेले नाही. काही वर्षार्ंपूर्वीपर्यंत आयुर्वेदाकडे तुच्छतेने पाहिले जात होतेे; मात्र त्याचे सामर्थ्य लक्षात आल्यावर त्याला विश्‍वमान्यता मिळू लागली आहे. तीच गोष्ट योगाच्या संदर्भातही ! आहोटीनंतर भरती येणे अथवा अमावास्येनंतर पौर्णिमा येणे सृष्टीचक्राचा नियम आहे. तोच हिंदु धर्माच्या संदर्भातही लागू होतो. हिंदु धर्माला ग्लानी आल्यासारखी स्थिती असली, तरी कालचक्राच्या गतीमुळे ही ग्लानी जाऊन सनातन वैदिक धर्माला पुन्हा तेज प्राप्त होणार, हे निश्‍चित ! प्रियव्रत पाटील यांच्या रूपाने भारतियांच्या कुशाग्र बुद्धीमत्तेची चुणूक समोर आली आहे. ‘नव्या भारता’मध्ये असे अनेक प्रियव्रत घडवणार्‍या गुरुकुलांना ‘अच्छे दिन’ आले, तर आणखी चांगले !


Multi Language |Offline reading | PDF