‘वांग’मय हाँगकाँग !

साम्राज्यविस्ताराने पछाडलेला आणि त्यासाठी वाटेल ते क्रूरकृत्य करण्यास धजावणार्‍या चीनला पुरून उरलेला जोशुआ वांग याची सध्या जगभर चर्चा चालू आहे. किरकोळ शरीरयष्टीचा, चष्मा लावणारा आणि चार-चौघांसारखा दिसणारा जोशुआ वांग तसा विद्यालयात शिकणारा सामान्य विद्यार्थी. हाँगकाँगच्या रस्त्यांवरून फेरफटका मारणारा आणि अबाल, वृद्ध असा सर्वांमध्ये मिसळणारा वांग हा केवळ २२ वर्षांचा आहे. एवढ्या अल्प वयात त्याने हाँगकाँगमध्ये चीनच्या विरोधात केलेले जनसंघटन सर्वांनाच अचंबित करायला लावणारे आहे. सध्या वांग चर्चेत आहे, तो चीनने हाँगकाँगमध्ये लागू केलेल्या हस्तांतर कायद्याला होत असलेल्या विरोधामुळे. चीनला काहीही करून हाँगकाँगचे ‘लालीकरण’ करायचे आहे. त्यामुळे नवनवीन कायदे करून तो हाँगकाँगवासियांचे दमन करू इच्छितो. याच दुष्ट हेतूने चीनने हाँगकाँगमध्ये प्रत्यार्पण कायदा लागू केला. या कायद्यामुळे चीनमध्ये एखाद्या गुन्ह्यात हाँगकाँगचा नागरिक आरोपी असल्याचे आढळल्यास त्याचे प्रत्यार्पण चीनला करणे आवश्यक असेल. हाँगकाँगवासियांचा यास विरोध आहे; कारण ‘चीन खोटेनाटे आरोप करून हाँगकाँगवासियांना चीनमध्ये घेऊन जाईल’, तसेच ‘एकदा आपला नागरिक चीनमध्ये गेला की, त्याचे काय हाल होतील’, हे हाँगकाँगवासीय जाणून आहेत. म्हणून हा कायदाच रहित करण्यासाठी वांग याने हाँगकाँगवासियांना हाक दिली आणि लाखो लोक रस्त्यावर उतरले. अशी आंदोलने, निषेध मोर्चे, सभा आणि संमेलने उधळून लावणे किंवा चिरडणे, हा चीनसाठी हातचा मळ आहे; मात्र वांग याच्या जादूपुढे चीनने हात टेकले आणि हा कायदा रहित केल्याचे घोषित केले. २२ वर्षीय वांग याचा आवाज दाबण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला. त्याला अनेक वेळा कारागृहात टाकण्यात आले, त्याच्यावर प्राणघातक आक्रमण झाले; मात्र तो बधला नाही. या कायद्याच्या विरोधात मागील १० आठवडे आंदोलन चालू होते. एवढा प्रदीर्घ काळ आंदोलनकर्त्यांमध्ये उत्साह कायम ठेवून त्यांना चीनच्या विरोधात उभे करणे सोपे काम नव्हे; मात्र वांग याने ते लीलया पार पाडले. वर्ष १९९७ मध्ये लीझ करारानुसार ब्रिटनने हाँगकाँगला चीनकडे हस्तांतरित केले. ही हस्तांतराची प्रक्रिया चालू असतांना म्हणजे वर्ष १९९६ मध्ये वांग याचा जन्म झाला. ‘हाँगकाँगरूपी सोन्याची अंडी देणारी कोंबडी स्वतःच्या कह्यात येणार’, या विचाराने चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष खुश होता; मात्र ‘याच हस्तांतराच्या प्रक्रियेच्या काळात हाँगकाँगमध्ये जन्माला आलेला वांग पुढे आपल्या नाकावर मिर्‍या वाटेल’, हे बहुदा चीनच्या ध्यानीमनीही नव्हते. यालाच म्हणतात नियतीचा खेळ ! शेजारी राष्ट्रांना दरडावणार्‍या, धमकावणार्‍या आणि ‘मी सांगेन, ती पूर्व दिशा’ या मग्रुरीत वावरणार्‍या चीनला एका २२ वर्षीय मुलाने जेरीस आणल्याचे पहाणे हा चीनच्या शत्रूराष्ट्रांसाठी तरी आनंदाचा क्षण आहे !

इतिहास पालटणार !

विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्याचा चीनचा काळाकुट्ट इतिहास सर्वज्ञात आहे. वर्ष १९८९ मध्ये लोकशाहीच्या विचाराने भारित झालेले चिनी विद्यार्थी बिजिंगमधील तियानानमेन चौकात जमा झाले होते. त्या वेळी चीन सरकारने या विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडून, तसेच त्यांच्या अंगावर रणगाडे घालून सहस्रोंच्या संख्येने विद्यार्थ्यांना ठार मारले. ‘आमच्याशी वाकड्यात शिरणार्‍या लोकांचे आम्ही हेच हाल करू’, हे मग्रुर चीनने त्या वेळी दाखवून दिले होते. आज बरोबर २० वर्षांनी वांग आणि त्याचे विद्यार्थीदशेेतील सहकारी याच मार्गाने चालले आहेत. लहानपणी तियानानमेन चौकात ठार झालेल्या विद्यार्थ्यांसाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी मेणबत्ती मोर्च्यात सहभागी होणारा वांग आज त्यांचेच लोकशाही रुजवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आंदोलन उभारत आहे, हे सुखावणारे चित्र आहे. छल, बल आणि कपट यांद्वारे साम्राज्यविस्तार करून प्रजेला छळणार्‍या हुकूमशहांच्या विरोधात तेथील जनताच संघटितपणे उभी रहाते, हा इतिहास आहे. हाती कोणतेही अधिकार नसतांना, पदरी अनुभव नसतांना, ‘गॉडफादर’ नसतांना किंवा राजकारणाचा गंधही नसतांना चीनच्या साम्राज्याला हादरवणारा वांग हा त्यामुळेच कौतुकास पात्र आहे.

भारताने बोध घ्यावा !

वांग प्रथम प्रकाशझोतात आला, तो वयाच्या १४ व्या वर्षी. शाळेतील चीन प्रभावित अभ्यासक्रम पसंत न पडल्याने वांग याने स्वतःच्या मित्रांना संघटित करून ‘स्कॉलरिज्ञम’ नावाची संघटना स्थापन केली. वांग याचा साधा प्रश्‍न होता, ‘आम्ही राज्यकर्त्यांना का घाबरायचे ?’ प्रश्‍न जरी साधा असला, तरी तो हाँगकाँगवासियांना अंतर्मुख करणारा ठरला. कधीकधी असे साधे सोपे प्रश्‍नच समाजाच्या अंतर्मनाची तार छेडतात आणि विचारांती निश्‍चय करून एखाद्या मोहिमेत उतरलेला असा समाज मोठे काम करून जातो. वांग यानेही हेच केले. हाँगकाँगवासियांना चीनच्या समाजविरोधी धोरणांच्या संदर्भात विचार करायला भाग पाडले आणि त्यांना कृतीप्रवण केले. ज्या वयात खेळ, अभ्यास आणि मजा मारायची, त्या वयात वांग याने वेगळी वाट चोखाळली. ही वाट त्याच्या जिवावर बेतणारी होती; मात्र लोकशाही आणि त्यातून मिळणारे स्वातंत्र्य याचे महत्त्व पटलेल्या वांग याने त्या वाटेवर चालण्याचा दृढ निश्‍चय केला अन् ते चालण्याचे धारिष्ट्य हाँगकाँगवासियांमध्येही निर्माण केले.

जोशुआ वांग याच्या कर्तृत्वामुळे हाँगकाँग ‘वांग’मय झाले आहे. यातून अकारण चीनची भीती बाळगणार्‍यांना बरेच काही शिकण्यासारखे आहे. एक २२ वर्षीय युवक चीनला त्याची जागा दाखवून देत असेल, तर भारताला ते का शक्य नाही ? यासाठीच सहस्रो किलोमीटर लांब चालू असलेले हाँगकाँगमधील हे चीनविरोधी आंदोलन भारतालाही प्रेरणा देणारे आहे !


Multi Language |Offline reading | PDF