चंद्रोत्सव होणारच !

चंद्रापासून अवघे २.१ किलोमीटर लांब असतांना चंद्रयानातील विक्रम लँडरचा संपर्क तुटला आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांसह समस्त भारतियांचा हिरमोड झाला. ६ सप्टेंबरला सकाळपासून समस्त भारतियांचे चंद्रयानाशी निगडित घडामोडींकडे लक्ष लागून राहिले होेेते. अलीकडच्या काळात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) अंतराळ क्षेत्रात अद्वितीय कामगिरी केली आहे. त्यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडर उतरून भारत इतिहास रचेल, असेच भारतियांना वाटत होते; मात्र काही तरी गडबड झाली आणि या मोहिमेचा शेवट गोड होऊ शकला नाही. तरीही पृथ्वीपासून ३ लाख ८४ सहस्र किलोमीटर लांब असलेल्या चंद्राच्या इतक्या जवळ जाणे, हेही नसे थोडके ! त्यामुळे इस्रोच्या शास्त्रज्ञांचे विशेष अभिनंदन ! आभाळाएवढ्या संकटांशी दोन हात करून यश खेचून आणण्याचा इतिहास इस्रोला आहे. इस्रोच्या स्थापनेपासून म्हणजे वर्ष १९६९ पासूनचा इतिहास पाहिला, तर हेच दिसून येते. त्यामुळे आताही या मोहिमेचा बारकाईने अभ्यास करून इस्रोचे शास्त्रज्ञ पुन्हा चंद्रावर स्वारी करण्यासाठी सिद्ध होतील, हे निश्‍चित !

यापूर्वी इस्रोच्या मोहिमेविषयी जनतेने एवढ्या मोठ्या प्रमाणात रूची दाखवली, असे झाले नव्हते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला अपयश आल्यावर त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्याला पुन्हा जिद्दीने उभे रहाण्यासाठी धीर देण्याचे दायित्व कुटुंबियांचे असते. विक्रमचा संपर्क तुटल्यावर भारतियांनी आपल्या शास्त्रज्ञांना ज्या प्रकारे धीर दिला, त्यातून हीच कुटुंबभावना दिसून आली. चंद्रावर जाण्याचे आपले स्वप्न थोडक्यात जरी हुकले असले, तरी भारतियांनी आपल्या शास्त्रज्ञांविषयी दाखवलेला आदर आणि प्रेम हे सुखावणारे आहे. भारतभूमीसाठी कार्यरत असलेल्या अशा राष्ट्रभक्तांच्या मागे समस्त भारतीय त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहातील, हे स्पष्ट झाले. राष्ट्रोद्धारासाठी हे आवश्यक आहे !

भारतीय शास्त्रज्ञांची धडाडी !

विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर सर्वांची दृष्टी खिळली, ते रॉकेट मॅन म्हणून ओळखले जाणारे इस्रोचे प्रमुख कैलासवटिवू सिवन यांच्यावर ! विक्रमशी संपर्क तुटल्यावर अतिशय नम्र आणि साधे रहाणीमान असलेले सिवन यांचे अश्रू अनावर झाले. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धीर दिला. चंद्राला स्पर्श करण्याच्या शेवटच्या १५ मिनिटांना त्यांनी थरार असे संबोधले होते. नवजात बाळ अचानक कुणी तुमच्या हाती सोपवावे, अशीच ही स्थिती आहे. हे बाळ इकडे-तिकडे दुडदुडेल; पण तुम्हाला त्याला सांभाळायचे आहे. लँडर आमच्यासाठीही असेच बाळ आहे, असे के. सिवन म्हणाले होते. या वक्तव्यावरून चंद्रयानाशी त्यांचे असलेले नाते आणि त्याविषयीच्या भावना आपल्या लक्षात येतील. ही मोहीम सोपी नक्कीच नव्हती. त्यामागे ११ वर्षांपासूनची सिद्धता आणि ३-४ वर्षांचे अथक कष्ट लपले आहेत. या मोहिमेला वर्ष २००८ मध्ये मान्यता देण्यात आली. ती मिळाल्यावर लँडर आणि रोव्हर मिळणे, हे भारतासमोरील मोठे आव्हान होते. वर्ष २०१६ मध्ये रशियाने लँडर देण्यास असमर्थता दर्शवली. भारताने अंतराळ क्षेत्रात घेतलेली झेप अनेक दादा देशांच्या डोळ्यांत खुपते. त्यामुळे भारताच्या अशा अंतराळ मोहिमांना खो घालण्याचा आटापिटा त्यांच्याकडून चालूच असतो. या आधीही क्रायोजीनिक तंत्रज्ञान भारताला मिळू नये, यासाठी रशिया आणि अमेरिका यांनी भारताला तंगवले होते; मात्र नेहमीच अशा नकारात्मक स्थितीत सकारात्मक राहून स्वतःच्या ध्येयाच्या दिशेने पादक्रांत करण्याची किमया भारतीय शास्त्रज्ञांनी करून दाखवली आहे. रशियाकडून लँडर आणि रोव्हर मिळण्यास नकार मिळाल्यानंतर भारतीय शास्त्रज्ञांनी केवळ ३ वर्षांच्या कालावधीत संपूर्णपणे भारतीय बनावटीचे रोव्हर आणि लँडर विकसित केले. एवढेच नव्हे, तर चंद्राशी मिळतेजुळते वातावरण निर्माण करून तेथे असलेल्या मातीशी साधर्म्य असलेली माती वापरून विक्रम लँडरचे लँडिंग कसे असेल, याचा सराव केला. भारतीय शास्त्रज्ञांच्या गाठीशी कोणताही अनुभव नसतांना चंद्रयानने एवढी मोठी झेप घेणे, हे मोठेच यश आहे !

शास्त्रज्ञांना अभय द्या !

शास्त्रज्ञ नंबी नारायण आठवतात का ? वर्ष १९९४ मध्ये भारतीय अंतराळयान आणि रॉकेट यांविषयीची गोपनीय माहिती मालदीवच्या संरक्षण अधिकार्‍यांना पुरवल्याचा ठपका ठेवून त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी प्रदीर्घ लढा दिल्यानंतर वर्ष २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने केरळ सरकारला त्यांना ५० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश दिला. नंबी नारायण हे एका मोहिमेवर कार्यरत असल्यामुळे त्यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय षड्यंत्र रचल्याचे सांगण्यात आले. यावरून भारतीय शास्त्रज्ञांना कोणकोणत्या दिव्यातून जावे लागते, त्यांना कशा प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते, हे आपल्याला दिसून येते. नंबी नारायण यांच्या काळात त्यांना म्हणावे तसे समाजाकडून पाठबळ मिळाले नाही; मात्र आता परिस्थिती पालटली आहे. भारतीय शास्त्रज्ञ घेत असलेल्या कष्टाचे मोल भारतियांनाही कळू लागले आहे. त्यामुळे चंद्रयानच्या निमित्ताने भारतियांचे शास्त्रज्ञांशी जोडलेले नाते, सकारात्मक पालटाचे निदर्शक आहे.

हिरमोड झालेल्या भारतीय शास्त्रज्ञांची ज्या प्रकारे पंतप्रधान मोदी यांनी समजूत घातली, ती एका राष्ट्रनायकाला शोभणारी होती. मोहीम फसल्यामुळे निराश, हताश झालेल्या शास्त्रज्ञांमध्ये पुन्हा उभारी आणण्याचे, त्यांच्यात नवचैतन्य भरण्याचे काम मोदी यांनी सचोटीने पार पाडले. याआधीच्या शासनकर्त्यांच्या दुर्लक्षामुळे भारतीय अंतराळ कार्यक्रमाला बर्‍याचदा खिळ बसली. यापुढे असे होणार नाही, याची काळजी मोदी सरकार घेणारच, हे नक्की ! चंद्रयान मोहिमेने बरेच काही शिकवले. त्यातून बोध घेऊन भारतीय शास्त्रज्ञ पुन्हा जोमाने आणि उत्साहाने कामाला लागतील. त्यामुळे आज नाही तर उद्या चंद्रावर स्वारी केल्याचा विजयोत्सव नव्हे चंद्रोत्सव आपण आनंदाने साजरा करू, हे नक्की !


Multi Language |Offline reading | PDF