देवाची मूर्ती पडल्यास किंवा पडून भग्न झाल्यास कोणत्या उपाययोजना कराव्यात ?

१. घरातील मूर्ती

१ अ. भग्न न झाल्यास : मूर्ती खाली पडली; पण भग्न झाली नाही, तर प्रायश्‍चित्त घ्यावे लागत नाही. केवळ त्या देवतेची क्षमा मागायची आणि तीलहोम, पंचामृत पूजा, दुग्धाभिषेक इत्यादी विधी अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींच्या सांगण्यानुसार करावेत.

१ आ. भग्न झाल्यास : मूर्ती पडून भग्न झाल्यास तो अपशकून समजण्यात येतो. देवतेचा मुकुट पडणे, हाही एक अपशकून असतो. आगामी संकटाची ती पूर्वसूचना असू शकते. अशा वेळी त्या मूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करून नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी.

२. देवळातील मूर्ती

२ अ. स्थिर मूर्ती : ही मूर्ती देवळात पक्की बसवलेली असल्यामुळे ती कधीच हालवता येत नाही. त्यामुळे ती पडण्याचा प्रश्‍नच येत नाही; मात्र जेव्हा ती पडते, तेव्हा ती भग्न झाल्यामुळे किंवा तिची झीज झाल्यामुळेच पडते. अशा वेळी त्या मूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करून नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी.

२ आ. चल मूर्ती : ही देवळातील उत्सवमूर्ती असल्याने ती इतरत्र हालवता येते. ती मूर्ती भग्न न होता केवळ पडली, तर वरील सूत्र १ अ. मध्ये सांगितल्याप्रमाणे विधी करावेत. त्यानंतर ती मूर्ती पूर्वीप्रमाणे पूजेत पुन्हा ठेवू शकतो; पण मूर्ती भग्न झाल्यास मात्र तिचे वहात्या पाण्यात विसर्जन करून नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी.

३. घर आणि देऊळ येथील भग्न मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसंदर्भात सूत्रे

मूर्ती भग्न होणे, हे आगामी संकटाचे सूचक असते. त्यामुळे घर आणि देऊळ यांतील भग्न मूर्तीचे विसर्जन करून नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी अघोर होम, तत्त्वोत्तारण विधी इत्यादी विधी करण्यास शास्त्रात सांगितले आहे. या विधींमुळे अनिष्टाचे निवारण होऊन शांती मिळते.

– वेदमूर्ती श्री. केतन रविकांत शहाणे


Multi Language |Offline reading | PDF