अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रियांनी करावयाचे ज्येष्ठा गौरी व्रत !

भाद्रपद शुक्ल पक्ष सप्तमी (५ सप्टेंबर २०१९) या दिवशी गौरी आवाहन आहे. त्यानिमित्ताने…

१. व्रत करण्याची पद्धत

अ. हे व्रत तीन दिवस चालते. प्रांतभेदानुसार हे व्रत करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये धातूची, मातीची प्रतिमा करून अथवा कागदावर श्री महालक्ष्मीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते.

आ. गौरीच्या स्थापनेनंतर दुसर्‍या दिवशी तिची पूजा करून नैवेद्य दाखवतात. तिसर्‍या दिवशी गौरीविसर्जन करतात. परत येतांना नदीतील थोडी वाळू किंवा माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.

२. अशौच असेल, तर गौरीपूजन करू नये !

भाद्रपदातील महालक्ष्मीच्या (गौरीच्या) वेळी अशौच असेल, तर गौरी आवाहन आणि पूजन करू नये. अशौचामुळे तेव्हा गौरीपूजन न करता आल्याने काही जण पुढे आश्‍विन मासात (महिन्यात) गौरीपूजन करतात; पण तसे करू नये. अशा प्रसंगी त्याचा लोप करणे (म्हणजे ते न करणे) युक्त होय.

३. ज्येष्ठा गौरीचे व्रत केल्यामुळे होणारी फलप्राप्ती !

३ अ. सौभाग्याचे रक्षण होणे

काही वेळा स्त्रिया सौभाग्याचे रक्षण होण्यासाठी महालक्ष्मीदेवीला उद्देशून हे व्रत करतात. त्यामुळे व्रत करणार्‍या स्त्रियांवर महालक्ष्मीची कृपा होऊन त्यांच्या सौभाग्याचे रक्षण होते.

३ आ. ऐहिक आणि पारमार्थिक लाभ होणे

ज्येष्ठा गौरीचे व्रत केल्याने श्री गणेशासह रिद्धी आणि सिद्धी यांचे कृपाशीर्वाद लाभून ऐहिकदृष्ट्या भरभराट होते अन् आध्यात्मिक क्षेत्रात विविध सिद्धींची प्राप्ती होते.

३ इ. गणेशतत्त्वाचा पूर्ण लाभ होणे

रिद्धी आणि सिद्धी यांसह कार्यरत असणारे गणेशतत्त्व पूर्ण असल्यामुळे ज्येष्ठा गौरीचे व्रत केल्याने उपासकाला गणेशतत्त्वाचा पूर्ण लाभ होतो. ॐ

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ श्री गणपति आणि सनातन-निर्मित श्री गणेशचतुर्थी आणि श्री गणेश उपासना हा दृकश्राव्य लघुपट)


Multi Language |Offline reading | PDF