नक्षलवाद्यांनी भविष्याचा विचार न केल्यास त्यांचे नामोनिशाण रहाणार नाही !

  • अखिल भारतीय आतंकवादविरोधी आघाडीचे अध्यक्ष मनिंदरसिंह बिट्टा यांचे प्रतिपादन

  • नक्षलवाद्यांना सुधारण्याची शेवटची संधी

शिर्डी – नक्षलवाद्यांना आता सुधारण्याची संधी आहे. ते भारतीयच आहेत. त्यांनी भविष्याचा विचार करावा अन्यथा त्यांचे नामोनिशाण रहाणार नाही. त्यांना सध्याचे सरकार अरण्यातून काढून ठोकेल, अशी चेतावणी ‘अखिल भारतीय आतंकवादविरोधी आघाडी’चे अध्यक्ष मनिंदरसिंह बिट्टा यांनी २३ ऑगस्टला येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. ‘माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम् यांनी घोटाळे करून देशाला लुटले आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे धैर्य आजवर कोणी केले नव्हते. हा आजचा हिंदुस्थान आहे. जो चुकेल, घोटाळे करील, तो कारागृहात जाईल’, असेही त्यांनी सांगितले.

मनिंदरसिंह बिट्टा पुढे म्हणाले, ‘‘विंग कमांडर अभिनंदन यांना ज्याने पकडले, त्या पाकिस्तानी अधिकार्‍यालाही मारण्यात आले. यापुढे प्रत्येक गोष्टीचे उत्तर दिले जाईल. काश्मीरमधील ‘३७० कलम’ रहित झाल्याने काश्मीरला नवीन स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे एक राष्ट्र, एक ध्वज, एक राज्यघटना आणि एक राष्ट्रगीत अशी नवी ओळख काश्मीरला मिळाली आहे. आता काश्मीर नव्हे, तर ‘पाकव्याप्त काश्मीर’ हेच सूत्र शिल्लक आहे. ‘आतंकवादाला खतपाणी घालणारे आणि कर्करोगासारखे असलेले

‘३७० कलम’ कधी रहित होईल’, असे वाटत नव्हते; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या या राष्ट्रहिताच्या निर्णयाविषयी नागरिकांनी त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे.

काश्मिरात हळूहळू शांतता प्रस्थापित होईल !

मनिंदरसिंह बिट्टा म्हणाले, ‘‘एक वर्षानंतर जेव्हा काश्मीरमध्ये शिक्षण, रोजगार, व्यापार, उद्योग आदी विकास होईल, तेव्हा यापूर्वीच्या ७० वर्षांतील सरकारांना जनता जाब विचारेल. मोदी-शहा यांनी केले, ते त्यांनी आजवर का केले नाही, याचे त्यांना उत्तर द्यावे लागेल. काश्मिरमध्ये हळूहळू शांतता प्रस्थापित होईल आणि जनजीवन सामान्य होईल. त्या दृष्टीने सरकार योग्य पावले टाकत आहे.’’


Multi Language |Offline reading | PDF