श्रीकृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘दहीहंडी फोडणे’ यामागचा सांगितलेला सुंदर भावार्थ !

आज श्रावण कृष्ण पक्ष अष्टमी (२४.८.२०१९) या दिवशी गोपाळकाला आहे. त्यानिमित्ताने …

बालकृष्णाने गोपींच्या डोक्यावरील मडकी फोडणे, तसेच दहीहंडी फोडणे आणि घटस्थापना यांचा सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी सांगितलेला भावार्थ, तसेच सध्याच्या काळात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले योगेश्‍वर श्रीकृष्णासारखेच कार्य कसे करत आहेत ?’ याविषयी दिलेले विवेचन पुढे देत आहोत.

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

१. बालकृष्णाने गोपींच्या डोक्यावरील मडकी फोडण्यामागील लीलेचे भावार्थ – बालकृष्णाने गोपींच्या डोक्यावरील मडकी फोडून, म्हणजे त्यांच्याभोवतीचे आवरण नष्ट करून त्यांना परमात्म्याकडे जाण्याची वाट करून देणे

‘कृष्णसख्या गोपी दूध, दही आणि लोणी मडक्यांत भरून ती डोक्यावर धारण करून नेत अन् बालकृष्ण या गोपींची मडकी फोडत असे. याचा भावार्थ पुढीलप्रमाणे आहे.

अ. गोपींची आज्ञाचक्रापर्यंत आध्यात्मिक प्रगती झाली होती; मात्र त्यांची कुंडलिनी शक्ती सहस्रारात अडकून पडली होती. बालकृष्ण गोपींची मडकी फोडायचा, म्हणजे तोे गोपींच्या आत्म्याभोवतीचे किंबहुना सहस्रारचक्राचे भेदन करून त्यांच्यावरील अंतिम आवरण थोडे थोडे नष्ट करायचा.

आ. योगेश्‍वर श्रीकृष्ण गोपींच्या भोवतीचे आवरण नष्ट करून त्यांच्या आत्म्याचा परमात्म्याशी योग करून देण्याची प्रक्रिया करत असे. त्यामुळे मडकी फुटली, तरी गोपींना कृष्णाचा राग न येता त्या आनंदी व्हायच्या; कारण बाह्यतः मडकी फुटलेली दिसली, तरी प्रत्यक्षात गोपींच्या आत्म्याभोवतीचे आवरण न्यून किंवा नष्ट झाल्यामुळे त्यांना आनंदाची अनुभूती यायची.

‘बालकृष्णाने मडकी फोडणे’, यामागची हीच खरी लीला आहे.

२. मोक्षगुरु शिष्याची हंडी फोडून (त्याच्या सहस्राराचे भेदन करून) त्याला परमात्मा स्वरूपात विलीन करू शकणे आणि या काळात परात्पर गुरु डॉक्टर समष्टी स्तरावर श्रीकृष्णाचे हंडी फोडण्याचे कार्य करत असणे

आजच्या काळात ‘दहीहंडी फोडणे’ यामागचा खरा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. केवळ अवतारी किंवा मोक्ष गुरुच शिष्याची हंडी फोडून (त्याच्या सहस्राराचे भेदन करून) त्याच्या आत्मस्वरूपाला परमात्मा स्वरूपात विलीन करू शकतात. सध्याच्या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले श्रीकृष्णाचे हंडी फोडण्याचे कार्य समष्टी स्तरावर करून साधकांना दिशा देत आहेत.

३. घटस्थापना (नवरात्र) आणि हंडी फोडणे यांतील साम्य अन् त्यामागील भावार्थ !

३ अ. निर्गुणाला घटात, म्हणजे आकारात बंदिस्त करून सगुणात प्रकटीकरण करण्याची प्रक्रिया म्हणजे घटस्थापना ! : नवरात्राला ‘घटस्थापना’ असेही म्हणतात. निर्गुणाला घटात, म्हणजे आकारात बंदिस्त करून सगुणात प्रकटीकरण करण्याची प्रक्रिया म्हणजे घटस्थापना ! ती चैतन्याच्या स्तरावर होते, तेव्हा ते देवीचे नवरात्र होय. त्या वेळी चैतन्य घटाच्या आत आणि बाहेर चैतन्यस्वरूपात कार्य करत असते.

३ आ. जीवात्मारूपी घटाला विघटित करणे, म्हणजेच आत्म्याला परमात्म्यात विलीन करणे : दुसर्‍या अर्थाने घटाकाश म्हणजे जीवात्मा आणि घटाचा आकार म्हणजे मायेचे आवरण ! या आवरणामुळे घटाच्या आत असलेल्या जिवाला चैतन्याच्या जाणिवेच्या अभावी स्वतःच्या आत्मस्वरूपाचे विस्मरण होते. या घटाला विघटित करणे किंवा हंडीला (अंतिम आवरणाला) फोडून आतल्या चैतन्याची अनुभूती घेत त्याचे बाह्य चैतन्यात विलिनीकरण करणे, म्हणजेच आत्म्याला परमात्म्यात विलीन करणे होय. ही जिवाच्या प्रवासातील, म्हणजे नवरात्रातील प्रमुख आध्यात्मिक क्रिया आहे.

३ इ. साधकाच्या जीवनातील खर्‍या अर्थाने विजयादशमी किंवा दसरा साजरा होणे, म्हणजेच मोक्षप्राप्ती करून घेणे : जिवाचे जन्म-मृत्यूचे चक्र हे पुनरपी येणारे ‘नवरात्र’ असून ‘मोक्षप्राप्ती’ हेच साधकांसाठी खर्‍या अर्थाने ‘विजयादशमी किंवा दसरा साजरा करणे’ होय. यासाठी श्री गुरूंची कृपाच लागते. साधकाने नवरात्राचा खरा गूढ अर्थ समजून घेऊन आध्यात्मिक दृष्टीने स्वतःचा उत्कर्ष करून घेणे महत्त्वाचे असते. साधना न समजलेले किंवा साधना न करणारे लोक दहीहंडीविषयी बाह्य स्वरूपात आकलन करून घेऊन उंचावर हंडी टांगतात आणि ती फोडतात. त्यामुळे बाह्यांगाने अर्थ न घेता धर्मशास्त्र किंवा पुराणे यांची स्वतःच्या आंतर प्रवासाशी सांगड घालणारे जीवच साधनेत शीघ्र प्रगती करू शकतात. श्री गुरुही अशा जिवांना मार्गदर्शन करतात.

४. योगेश्‍वर श्रीकृष्णाप्रमाणे सात स्तरांच्या चक्रव्यूहात अडकून पडलेल्या जीवात्म्याचा परमात्म्याकडील प्रवास सुकर करण्याचे कार्य करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

४ अ. ‘सात मनोरे चढवून त्यावरील दहीहंडी फोडणे, म्हणजे जिवाचा षट्चक्रांचा प्रवास आणि सहस्राराचे भेदन होणे’, असे असून श्री गुरूंच्या कृपेमुळे हा प्रवास सुलभ होणे : दहीहंडीसाठी एकावर एक मनोरे रचले जातात आणि त्यावर दहीहंडी बांधून नंतर ती फोडली जाते. यातील ‘एकावर एक मनोरे रचणे’ याचा आध्यात्मिक अर्थ म्हणजे मूलाधारातून स्वाधिष्ठानात, स्वाधिष्ठानातून मणिपुरात आणि पुढे अनाहत, विशुद्ध अन् त्यानंतर आज्ञाचक्र यांद्वारे सहस्रारापर्यंत जाणे. ‘हंडी फुटणे’, म्हणजे सहस्राराचे भेदन होणेे. ज्याप्रमाणे खालच्या मनोर्‍याच्या तुलनेत वरचा प्रत्येक मनोरा चढणे कठीण असते, त्याचप्रमाणे खालच्या चक्रांच्या तुलनेत पुढील चक्रांचे भेदन करणे कठीण असते. श्री गुरु हेच मार्गदर्शक आणि कृपावंत असल्यास हा प्रवास सहज अन् सुलभ होतो.

४ आ. सात स्तरांच्या चक्रव्यूहात अडकून पडलेला अज्ञानी जीव श्री गुरूंच्या कृपेने मुक्त होणे, ही आत्म्याची परमात्म्यात विलीन होण्याची प्रक्रिया ! : जीवात्मा सप्तचक्रांच्या, म्हणजे सात स्तरांच्या चक्रव्यूहात अडकून पडलेला असतो. गुरु आपल्या चैतन्याच्या कृपेने हा मार्ग मोकळा करून अज्ञानी जिवाला सोडवतात. शेवटी तो जीवात्मा घटाला फोडून ब्रह्मरंध्रातून बाहेर पडतो, म्हणजेच मायेच्या आवरणातून मुक्त होतो. त्याचप्रमाणे तो कर्मप्रारब्ध आणि संचित यांच्या बंधनातूनही मुक्त होतो. हीच आत्म्याची परमात्म्यात विलीन होण्याची प्रक्रिया होय. ही क्रिया म्हणजे ‘योग’ असून यामुळे भगवान श्रीकृष्णाला ‘योगेश्‍वर’ म्हटले आहे.

मोक्षगुरु हेही योगेश्‍वर असतात. या दृष्टीने परात्पर गुरु डॉक्टर हे या काळातील योगेश्‍वर आहेत. अनेक साधकांना अशी अनुभूतीही येत आहे.

४ इ. संन्यासाच्या मृत्यूनंतर होणारी कपाल क्रिया आणि जिवंतपणी साधकांना ‘योग’ साधण्यास मार्गदर्शन करणारे ‘योगेश्‍वर’ परात्पर गुरु डॉ. आठवले ! : सप्तचक्रांचे भेदन होऊन जीव शिवात विलीन होतो. ‘संन्यासाच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा ब्रह्मरंध्रातून बाहेर पडतो आणि परमात्म्यात विलीन होतो’, असे म्हणतात. याला ‘कपाल क्रिया’ असे म्हणतात. संन्यासाला अग्नी दिल्यानंतर कवटी फुटल्याचा आवाज आला की, ‘अंतिम संस्कार पूर्ण झाला’, असे म्हणतात. अन्य वेळीही मनुष्याचा कवटी फुटल्याचा आवाज आल्यानंतर अंत्येष्टीला आलेले लोक परत जाऊ लागतात. जिवंतपणी सप्तचक्रांचे भेदन होण्याची आणि आत्मा-परमात्मा यांचे ऐक्य अनुभवण्याची प्रक्रिया म्हणजे खरा योग ! त्यामुळेच कृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले योगेश्‍वर आहेत. आमचे अहोभाग्य आहे की, आम्ही सर्व परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपाछत्राखाली आहोत.’

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, उत्तर भारत प्रसारसेवक, नवी देहली. (ऑगस्ट २०१८)


Multi Language |Offline reading | PDF