अमेरिका, ब्रिटन आदी देशांनी चीन आणि पाक यांना फटकारले

संयुक्त राष्ट्रांच्या धार्मिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षेवरील बैठक

 न्यूयॉर्क (अमेरिका) – येथे संयुक्त राष्ट्रांमध्ये झालेल्या धार्मिक अल्पसंख्यकांच्या सुरक्षेविषयीच्या चर्चेमध्ये अमेरिका, ब्रिटन आदी देशांनी चीन आणि पाकिस्तान या देशांमध्ये अल्पसंख्यकांवर होत असलेल्या भेदभावावरून टीका केली.

१. या चर्चेमध्ये ‘ह्यूमन राइट्स फोकस पाकिस्तान’चे अध्यक्ष नवीद वाल्टर यांनी सांगितले की, पाकिस्तानमध्ये धार्मिक आधारावर अहमदिया लोकांची जी स्थिती झाली आहे, तशीच स्थिती चीनमध्येही अहे. धार्मिक भेदभावावरून अत्याचार होणार्‍या देशांची संख्या वाढत आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली धार्मिक स्वातंत्र्यावर प्रतिबंध घालण्यात येत आहेत.

२. ब्रिटनच्या पंतप्रधानांचे विशेष दूत लॉर्ड अहमन म्हणाले, ‘‘ब्रिटनने नेहमीच जगातील धार्मिक अल्पसंख्यकांच्या अधिकाराविषयी आवाज उठवला आहे. यात चीनमधील उघूर मुसलमानांपासून ते पाकमध्ये रहाणारे अहमदिया आणि ख्रिस्ती यांचा समावेश आहे.’’ (असे आहे, तर पाक, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांतील हिंदूंच्या दुःस्थितीविषयी ब्रिटन का बोलत नाही ? कि तेथील हिंदूंना मानवाधिकार नाहीत, असे त्याला म्हणायचे आहे ? – संपादक)

३. अमेरिकेचे राजदूत सॅम ब्राउनहॅक म्हणाले की, पाकिस्तानमध्ये अल्पसंख्य सातत्याने अत्याचारग्रस्त आहेत. चीनविषयी आम्ही चिंतेत आहोत. तेथील सरकारकडून धार्मिक स्वातंत्र्यावर व्यापक स्वरूपात प्रतिबंध घालण्यात आले आहेत. आम्ही चीन सरकारकडे  आग्रह करतो की, त्याने त्याच्या देशातील प्रत्येक व्यक्तीच्या मानवाधिकारचा आणि मूलभूत स्वातंत्र्याचा मान राखावा.

४. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटरेस म्हणाले की, ज्यू आणि मुसलमान विरोधी भावना, तसेच ख्रिस्ती आणि अन्य धर्मियांवरील अत्याचार बंद केले पाहिजेत. या अत्याचारग्रस्तांना आमच्या साहाय्याची आवश्यकता आहे. धर्माच्या नावावर द्वेष आणि घृणा निर्माण करणार्‍यांना वाळीत टाकले पाहिजे.


Multi Language |Offline reading | PDF