‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटाच्या भित्तीपत्रकावर अभिनेत्री सोनम कपूर यांना श्री महालक्ष्मीदेवीच्या रूपात दाखवले !

हातात ‘हेल्मेट’ आणि ‘बॅट’ दाखवून देवीचे विडंबन

हिंदूंच्या देवतांच्या रूपात पालट करून त्यांना विकृत रूपात दाखवणे, हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा अवमान आहे. अशा प्रकारे चित्रपटाच्या माध्यमातून वारंवार हिंदूंच्या श्रद्धांचा अवमान करण्यात येत आहे. असा अवमान करणार्‍यांवर प्रशासनाकडून कोणतीही कठोर कारवाई होत नसल्यामुळे असे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे आता हिंदूंनीच संघटित होऊन अशा चित्रपटांवर बहिष्कार घातल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

 (हे छायाचित्र प्रसिद्ध करण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने प्रसिद्ध केले आहे. – संपादक)

मुंबई, २३ ऑगस्ट (वार्ता.) – ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटाच्या भित्तीपत्रकावर (पोस्टरवर) अभिनेत्री सोनम कपूर यांच्या गळ्यात फुलांचा हार, डोक्यावर मुकुट, गळ्यात अलंकार आणि मागे कमळ फुलतांना दाखवण्यात आले आहे. अशा प्रकारे सोनम कपूर यांना श्री महालक्ष्मीदेवीच्या रूपात दाखवण्यात आले आहे. देवीच्या रूपात दाखवलेल्या सोनम कपूर यांनी नऊवारी साडी नेसली असून यांच्या उजव्या हातात ‘हेल्मेट’ (क्रिकेटचे) डाव्या हातात ‘बॅट’ आणि पायात ‘स्पोर्ट्स शूज’ (बूट) घातलेले दाखवण्यात आले आहे. या भित्तीपत्रकामध्ये सोनम कपूर यांना ‘क्रिकेट लक्ष्मी’ अशा संकल्पनेत दाखवण्यात आले आहे. सोनम कपूर यांनी स्वत:च्या ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक प्रसारमाध्यमावरून या चित्रपटाचे भित्तीपत्रक ‘शेअर’ (प्रसारित) केले आहे. येत्या २० सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या भित्तीपत्रकावर ‘भारत का लकी चार्म’, असा उल्लेख करण्यात आला आहे. अनुजा चौहान यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. अभिषेक शर्मा हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून, बॉक्स स्टार स्टुडिओच्या पूजा शेट्टी आणि आरती शेट्टी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.      सोनम कपूर यांना या चित्रपटामध्ये एका विज्ञापनाच्या आस्थापनामध्ये एका अधिकार्‍याच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट संघासाठी त्या कशा नशीबवान ठरतात, यावर ही कथा आहे. चित्रपटात नेमके काय आहे, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल; मात्र चित्रपटाच्या अधिकृत भित्तीपत्रकावर श्री महालक्ष्मीदेवीचे विडंबनात्मक रूप दाखवण्यात आल्याने धर्मप्रेमी हिंदूंकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.


Multi Language |Offline reading | PDF