सोलापूरसह जिल्ह्यातील शाळांमध्ये सत्यनारायण पूजा आणि धार्मिक कार्यक्रम यांवर बंदी

शिक्षणाधिकार्‍यांचा जिल्ह्यातील शाळांना पत्रकाद्वारे आदेश

  • हिंदूबहुल महाराष्ट्रात शाळेतील सत्यनारायण पूजेसारख्या धार्मिक विधीवर बंदी घातली जाणे संतापजनक !
  • शाळांमध्ये पूजा केल्याने धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण झाल्याचे एक तरी प्रकरण ऐकिवात आहे का ?

सोलापूर – येथील होटगी रस्त्यावरील कै. सखाराम सुरवसे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सुरवसे हायस्कूल या नामवंत शाळेत करण्यात येणारी सत्यनारायण पूजा शिक्षणाधिकारी सुनील शिखरे यांनी पत्रकाद्वारे थांबवली, तसेच ‘सोलापूर येथील कोणत्याही शाळेत धार्मिक कार्यक्रम घेऊ नयेत’, असेही पत्रात सूचित केले आहे.

‘शाळेत विविध जाती-धर्मांचे विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल, तसेच आधुनिक युगात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम यांद्वारे होऊ शकते. त्यामुळे शाळेतील आयोजित सत्यनारायण पूजा रहित करावी’, अशी तक्रार गणेश मोरे यांनी शिक्षणाधिकार्‍यांकडे केली होती. (अनेक पोलीस ठाण्यांमध्ये इफ्तार मेजवान्या होतात, तेव्हा कोणाच्या भावना दुखावल्या जात नाहीत का ?, तेव्हा कोणी तक्रार करण्यास पुढे आलेले पहावयास मिळत नाही, हे हिंदूंनी जाणावे ! – संपादक)

यावर कारवाई करत शिक्षणाधिकार्‍यांनी २१ ऑगस्ट या दिवशी पत्रकाद्वारे शाळेवर कारवाईचा आदेश दिला. (जातीय तेढ निर्माण करणार्‍यांवर कारवाई करण्याऐवजी हिंदूंच्याच धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालणे, हा कोणता न्याय ? – संपादक)

त्यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, संबंधित शाळेने गुरुवारी शाळेमध्ये सत्यनारायण पूजा करू नये, तसेच जिल्ह्यातील एकाही शाळेत धार्मिक कार्यक्रम घेऊ नयेत, विज्ञानयुगात अशा कार्यक्रमांचे आयोजन करून अंधश्रद्धेला खतपाणी घालू नये. या पत्रकाला डावलून जर सत्यनारायणाची पूजा केली जात असेल, तर संबंधित शाळा आणि मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई करण्यात येईल.


Multi Language |Offline reading | PDF