प.पू. कै. (सौ.) मंगला उपाध्ये यांच्या गोरेगाव (मुंबई) येथील नूतन विद्या मंदिर शाळेचे देखणे झेंडावंदन

हिंदुस्थानाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कटिबद्ध रहाण्याची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ !

मुंबई – गोरेगाव येथील नूतन विद्या मंदिर संस्थेच्या महाराष्ट्र विद्यालयामध्ये (माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय, प्राथमिक इंग्लिश माध्यम यांच्या संयुक्त विद्यमाने) १५ ऑगस्ट या दिवशी ७३ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात पार पडला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प.पू. आबा उपाध्ये यांच्या मार्गदर्शनानुसार शाळेतील विद्यार्थ्यांनी हिंदुस्थानाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कटिबद्ध रहाण्याची शपथ घेतली. ‘राष्ट्रभाषा हिंदी, राज्यभाषा मराठी टिकवण्यासाठी, तसेच अखंड हिंदु राष्ट्र कसे होईल, यासाठी प्रयत्नशील राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र !’ असा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

सामाजिक बांधिलकी म्हणून स्वातंत्र्यदिनी सकाळी ७.३० वाजता प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर शाळेच्या ३० वर्षांच्या प्रथेनुसार इयत्ता दहावीमधून प्रथम आलेल्या विद्यार्थिनीच्या हस्ते म्हणजे यंदाच्या वर्षी कु. साक्षी पारावे हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ क्रीडाशिक्षक श्री. महादेव ढवळे यांनी ‘मुलांचे हक्क आणि संरक्षण’ याविषयी मार्गदर्शन केले. ‘व्यसनाचे दुष्परिणाम आणि जागरूकता’ यांविषयी श्री. अशोक कुमावत यांनी अवगत केले. विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शनही लावले होते. या वेळी संस्थेचे सचिव शशिकांत दळवी, सदस्य श्री. उदय जोशी, सहखजिनदार श्री. अमोल नळेकर, अंजली जोशी, जयश्री वाघमारे, कारेगावकर बाई, तसेच अन्य पदाधिकारी, माजी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. शाळेचे प्राचार्य श्री. विलास धस यांचा कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार होता.


Multi Language |Offline reading | PDF