पी. चिदंबरम् यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी

नवी देहली – ३०५ कोटी रुपयांच्या आयएन्एक्स् मिडिया घोटाळ्यात अटक करण्यात आलेले काँग्रेस नेते पी. चिदंबरम् यांना न्यायालयाने २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. २२ ऑगस्टला येथील राऊज अ‍ॅव्हेन्यू येथील सीबीआय न्यायालयात न्यायाधीश अजयकुमार कुहार यांच्यासमोर उपस्थित करण्यात आले होते. या वेळी सीबीआयने त्यांना ५ दिवसांची सीबीआय कोठडी देण्याची मागणी केली. या वेळी पी. चिदंबरम् यांच्या वतीने काँग्रेस नेते अधिवक्ता कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली. त्यांनी कोठडीला विरोध केला. युक्तीवाद झाल्यानंतर सुमारे दीड घंट्यानंतर न्यायालयाने यावर त्यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचा निर्णय दिला.

(म्हणे) ‘मोदी सरकारच्या राजकीय आणि वैयक्तिक द्वेषातून केलेली कारवाई !’ – काँग्रेस

भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालणारी काँग्रेस ! काँग्रेसचे पी. चिदंबरम् गृहमंत्री होते, त्या वेळी साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित आदींना आतंकवादी ठरवून त्यांना अटक करून ९ वर्षे कारगृहात ठेवण्यात आले, तेव्हा ती हिंदुद्वेषातून केलेली कारवाई होती, हे हिंदू विसरलेले नाहीत ! हिंदूंना आतंकवादी ठरवणारे भ्रष्टाचारी काँग्रेसवाले म्हणे निष्पाप आणि निरपराधी !

२ दिवसांपासून लोकशाहीची हत्या होत असल्याचे देश पहात आहे. (काँग्रेसच्या काळात अडीच वर्षे आणीबाणी लादून विरोधी पक्षांतील सहस्रावधी राजकीय नेत्यांना विनाकारण कारागृहात डांबून लोकशाहीची हत्या करण्यात आली होती, त्याविषयी काँग्रेस का बोलत नाही ? – संपादक) भाजप सरकारने ईडी आणि सीबीआय यांचा वापर सूड उगवण्यासाठी केला आहे. (काँग्रेसने ‘एन्आयए’चा (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचा) वापर हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी केला, हे हिंदू जाणतात ! – संपादक) या आकसातूनच माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम् यांना अटक केली आहे. मोदी सरकारच्या राजकीय आणि वैयक्तिक द्वेषातून केलेली ही कारवाई आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली.

चिदंबरम् यांच्या अटकेच्या प्रकरणात भाजप किंवा केंद्र सरकार यांचा सहभाग नाही ! – केंद्र सरकार

नवी देहली – कायदा त्याचे काम करत आहे. न्यायालयाने कायद्याप्रमाणे निर्णय घेतला आहे. चिदंबरम् यांच्या अटकेत भाजप किंवा केंद्र सरकार यांचा कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना कुठे ठेवायचे ते सरकार नाही, तर न्यायालय ठरवेल, असे स्पष्टीकरण देत केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले आहेत.

(म्हणे) ‘कलम ३७० हटवल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरील लक्ष हटवण्यासाठी चिदंबरम् यांना अटक !’ – कार्ती चिदंबरम्

३०५ कोटी रुपयांच्या या घोटाळ्यापासून लक्ष हटवण्यासाठीच कार्ती असा आरोप करत आहेत, हे न समजायला जनता दूधखुळी नाही !

नवी देहली – कलम ३७० हटवल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरील लक्ष हटवण्यासाठी माझे वडील पी. चिदंबरम् यांना अटक करण्यात आली आहे, असा आरोप कार्ती चिदंबरम् यांनी केला आहे. एन्आयएक्स मीडिया घोटाळ्यामध्ये कार्ती हेही आरोपी असून त्यांना पूर्वी अटक करण्यात आली होती. आता ते जामिनावर आहेत.

आयएन्एक्स मीडिया घोटाळा !

आयएन्क्स मीडिया आस्थापन पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांचे आहे. हे दोघेही सध्या शीना बोरा हत्या प्रकरणात कारागृहात आहेत. या आस्थापनामधील परकीय गुंतवणुकीचा प्रस्ताव परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (एफ्आयपीबी) स्वीकारला होता. चिदंबरम् अर्थमंत्री असतांना अर्थ मंत्रालयानेही ४ कोटी ६४ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीला मान्यता दिली होती; मात्र या आस्थापनाने नियमांचे उल्लंघन करत ‘आयएन्एक्स न्यूज’ या नवीन आस्थापनात २६ टक्के गुंतवणूक करतांना परकीय गुंतवणूकदारांना समभागांची विक्री ८०० रुपये दराने केली. यामुळे केवळ ४ कोटी ६४ लाख रुपयांची अनुमती असतांना परकीय गुंतवणूक ३०५ कोटी रुपयांपर्यंत पोचली. त्या वेळी चिदंबरम् अर्थमंत्री होते. त्या वेळी कार्ती यांनी वडिलांच्या माध्यमातून या आस्थापनाला नव्याने अनुमती मिळवून दिली. या बदल्यात कार्ती यांना साडेतीन कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यातून मिळालेल्या पैशांतून चिदंबरम् यांनी विदेशात संपत्ती खरेदी केली असल्याचा आरोप अन्वेषण यंत्रणांनी केला आहे. यातून सरकारी अधिकाराचा थेट अपवापर झाल्याचे स्पष्ट होते.


Multi Language |Offline reading | PDF