भारतातील ७ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेश येथे हिंदू अल्पसंख्याक !

‘देशात अल्पसंख्याक कोण आहेत ?’, याची व्याख्या करण्यासाठी भाजपचे नेते अधिवक्ता अश्‍विनी उपाध्याय यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका !

स्वतंत्र भारतातील धर्मनिरपेक्ष (?) काँग्रेसच्या ६ दशकांतून अधिक सत्ताकाळात अल्पसंख्याक मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या लांगूलचालनाच्या एककलमी कार्यक्रमाचाच परिपाक म्हणजे दिवसाढवळ्या अन् बिनदिक्कतपणे हिंदूंचे मोठ्या प्रमाणात झालेले धर्मांतर!

अधिवक्ता अश्‍विनी उपाध्याय

भाजपचे नेते आणि अधिवक्ता अश्‍विनी उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. या याचिकेत त्यांनी ‘देशात अल्पसंख्याक कोण आहेत ?’, याची व्याख्या करण्याची आणि राज्याप्रमाणे त्यांना घोषित करण्याची मागणी केली आहे. या याचिकेत मांडलेली आणि याविषयी त्यांनी विविध प्रसारमाध्यमांमध्ये सांगितलेली काही सूत्रे येथे देत आहोत.

१. सात राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश येथे हिंदू अल्पसंख्य !

वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार २८ राज्यांपैकी ७ राज्ये (जम्मू-काश्मीर (विभाजन करण्यापूर्वीचे), पंजाब, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणीपूर, मिझोराम आणि मेघालय) आणि ७ केंद्रशासित प्रदेशांपैकी लक्षद्वीप येथे हिंदू अल्पसंख्य आहेत. नागालँड, मिझोराम आणि मेघालय येथे ख्रिस्ती, जम्मू-काश्मीर अन् लक्षद्वीप येथे मुसलमान, तर पंजाबमध्ये शीख बहुसंख्य आहेत. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार देशातील एकूण ६४० जिल्ह्यांपैकी ११० जिल्ह्यांमध्ये हिंदू अल्पसंख्याक आहेत.

२. धर्मनिरपेक्ष भारतातील हिंदूंच्या मोठ्या प्रमाणात चालू असलेल्या धर्मांतराचा (mass conversion चा) हा पुरावा नव्हे का ?

वर्ष १९६१ मध्ये मेघालयमध्ये ख्रिस्ती लोकसंख्या ३५.२१ टक्के होती, ती वर्ष २०११ मध्ये वाढून ७४.५९ टक्के झाली आहे. वर्ष १९७१ मध्ये अरुणाचल प्रदेशात ख्रिस्त्यांची एकूण लोकसंख्या केवळ ०.७८ टक्के होती. ती वर्ष २०११ मध्ये वाढून ३०.२६ टक्के झाली आहे. वर्ष १९५१ मध्ये मणीपूर येथे हिंदू ६०.१२ टक्के, तर ख्रिस्ती ११.८४ टक्के होते; परंतु वर्ष २०११ च्या जनगणनेमध्ये हिंदूंच्या लोकसंख्येत घट होऊन ती ४१.३८ टक्क्यांवर पोचली, तर ख्रिस्ती लोकसंख्या वाढून ती ४१.२८ टक्के झाली आहे. ख्रिस्ती लोकसंख्येमध्ये होणार्‍या या भरमसाठ वाढीमुळे नागालँड, मिझोराम आणि मेघालय यांच्यासह अरुणाचल प्रदेश अन् मणीपूर ख्रिस्तीबहुल प्रदेश बनले आहेत.

३. मुसलमान आणि ख्रिस्तीबहुल प्रांत अन् जिल्हे बनवण्याचे षड्यंत्र !

देशात मुसलमान आणि ख्रिस्तीबहुल प्रांत अन् जिल्हे बनवण्याच्या दृष्टीने षड्यंत्र चालू आहे. यामध्ये मुख्य म्हणजे हिंदूंचे नियोजनबद्धरित्या धर्मांतर घडवून आणणे, बाहेरून मुसलमान आणि ख्रिस्ती यांना येथे आणून स्थायिक करणे अन् हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडणे. हरियाणामध्ये गुरुग्राम आणि फरिदाबाद यांचा मुसलमानबहुल भाग वेगळा करून मेवात जिल्हा बनवण्यात आला. आता त्याचे नाव पालटून त्याचे ‘नूंह’ असे नामकरण झाले आहे.

४. हिंदूंना असहिष्णू म्हणणारे याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहेत, हे लक्षात घ्या ! वास्तविक असहिष्णू समाजाच्या विरोधात बोलण्याचे धाडस अशा सेक्युलरवाद्यांमध्ये नाही, हे लांच्छनास्पदच !

वर्ष १९९० मध्ये बिहारमध्ये लालूप्रसाद यादव मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मुसलमानबहुल किशनगंज तालुक्याला जिल्हा बनवून टाकले. बंगालमध्ये दिनाजपूर जिल्ह्याची उत्तर दिनाजपूर आणि दक्षिण दिनाजपूर अशी विभागणी करण्यात आली. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील मुसलमानांची लोकसंख्या ४९.९२ टक्के होती; परंतु गेल्या ८ वर्षांमध्ये हा जिल्हा मुसलमानबहुल बनला आहे. मुसलमानबहुल आणि ख्रिस्तीबहुल प्रांत अन् जिल्हा यांमध्ये हिंदूंची स्थिती कशी होते, याविषयीच्या ताज्या घटना पश्‍चिम उत्तरप्रदेशमध्ये घडतांना दिसत आहेत. मेरठमध्ये मुसलमानांच्या भीतीपोटी हिंदूंनी त्यांच्या घराच्या बाहेर ‘घर विकणे आहे’, अशा पाट्या लावल्या आहेत.

५. बहुसंख्याक हिंदूंच्या देशातील हिंदूंचीच दैनावस्था स्पष्ट करणारी आकडेवारी !

आज जे लोक काश्मीरमध्ये मानवतेच्या गप्पा मारतात, त्यांना हे ठाऊक असायला हवे की, वर्ष १९९० मध्ये काश्मीर खोर्‍यातून लाखो हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडल्यानंतर तेथील अल्पसंख्याक हिंदू आणि शीख भीतीपोटी आपल्यासमवेत घरच्या महिलांना ठेवण्याचेही धाडस करत नाहीत. वर्ष २०११ मध्ये काश्मीर खोर्‍यात एकूण हिंदूंची लोकसंख्या १ लाख ६८ सहस्र ८३३ होती. यामध्ये महिलांची संख्या केवळ १५ सहस्र ७६४ म्हणजे ९.३३ टक्के होती. वर्ष १९९० मध्ये काश्मीरमधून ज्याप्रमाणे हिंदूंना पलायन करावे लागले, त्याचप्रमाणे मुसलमानबहुल लक्षद्वीपमधूनही हिंदूंना पलायन करणे भाग पाडले गेलेे. लक्षद्वीपमध्ये वर्ष १९९१ मध्ये २ सहस्र ३३९ हिंदू होते. वर्ष २०११ मध्ये ती संख्या घटून १ सहस्र ७८८ एवढीच राहिली. या १ सहस्र ७८८ मध्ये महिलांची संख्या केवळ १८५ होती. ख्रिस्तीबहुल मिझोराममध्येही अल्पसंख्याक हिंदूंना पलायन करावे लागले. मिझोराममध्ये वर्ष १९८१ मध्ये ३५ सहस्र २४५ हिंदू होते, ते वर्ष २०११ मध्ये घटून ३० सहस्र १३६ झाले.

६. हिंदु अल्पसंख्याकांवरील अत्याचारासाठी आयोग नेमावा !

अधिवक्ता अश्‍विनी उपाध्याय यांनी वरील सविस्तर माहिती दिली असून त्यांनी सांगितले की, वर्ष १९४७ मध्ये धर्माच्या आधारावरच देशाची फाळणी झाली होती; परंतु आपले नेते त्यापासून बोध घेण्यास सिद्ध नाहीत. धर्माच्या आधारावर अल्पसंख्य आणि बहुसंख्य असा खेळ बंद करण्याची वेळ आता आली आहे किंवा जिल्हा अथवा राज्य स्तरावरील लोकसंख्या विचारात घेऊन ‘अल्पसंख्य कोण ?’ हे निश्‍चित करण्यात आले पाहिजे. भारतात ज्याप्रमाणे मुसलमानांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी सच्चर आयोगाची स्थापना करण्यात आली होती, त्याचप्रमाणे हिंदु अल्पसंख्याकांवर मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्याकडून होणार्‍या अत्याचारांची चौकशी करण्यासाठी आयोग स्थापन केला पाहिजे अन् त्याचा अहवाल प्रसिद्ध केला पाहिजे.

संदर्भ : संकेतस्थळ


Multi Language |Offline reading | PDF