तोंडी तलाक देणार्‍या पतीच्या विरोधात तक्रार करणार्‍या महिलेला सासरच्या लोकांनी जिवंत जाळले

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यातील गद्रा गावात २२ वर्षीय सईदा हिला तिचा पती नफीस (वय २६ वर्षे) याने दूरभाषवरून तोंडी तलाक दिला होता. या विरोधात तिने पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या रागातून १६ ऑगस्टला पती नफीस याच्यासह तिचा सासरा अझिझुल्लाह, आई हसीना, नणंद गुडिया आणि नादिरा यांनी सईदा हिला जिवंत जाळले, असा आरोप सईदाचे वडील रमजान खान यांनी केला आहे. सईदा हिची ५ वर्षांची मुलगी फातिमा हिने घडलेली घटना पोलिसांना सांगितली. यानंतर पोलिसांनी सर्वांच्या विरोधात गुन्हा नोंदवला.

पोलिसांकडून तोंडी तलाकची तक्रार नोंदवण्यास नकार

संसदेत तोंडी तलाकविरोधी कायदा होऊनही पोलीस त्यानुसार गुन्हा नोंदवण्यास नकार देत असतील, तर अशा पोलिसांना कठोरातील कठोर शिक्षा केली पाहिजे !

सईदाचे वडील खान यांच्या माहितीनुसार मुंबईत रहाणार्‍या नफीसने सईदाला ६ ऑगस्टला दूरभाषवरून तोंडी तलाक दिला होता. सईदा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेली होती; पण पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेता तिला घरी पाठवले आणि पतीसमवेत मुंबईला जाण्यास सांगितले. त्यानंतर १५ ऑगस्टला पुन्हा पोलिसांनी दोघांना बोलावून घेतले आणि नफीससमवेत रहाण्याचा सल्ला सईदा हिला दिला होता. श्रावस्तीचे पोलीस अधीक्षक आशिष श्रीवास्तव यांनी ‘पोलिसांनी तक्रार का नोंदवून घेतली नाही, याची चौकशी केली जाईल’, असे सांगितले आहे.


Multi Language |Offline reading | PDF