लंडनमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करणार्‍या भारतियांवर पाकिस्तानी निदर्शकांचे आक्रमण

लंडन – येथील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर भारताचा ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी भारतीय नागरिक जमले होते. त्याच वेळी येथे पाकिस्तानी आंदोलनकर्त्यांनी कलम ३७० रहित करण्याच्या निर्णयाच्या विरोधात निदर्शने केली. त्यांनी भारतीय नागरिकांवर अंडी आणि पाण्याच्या बाटल्या फेकून मारल्या. या निदर्शकांमध्ये काही खलिस्तानवादीही सहभागी झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी केवळ ४ जणांना कह्यात घेतले आहे.

भाजपचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अधिकारी विजय चौथाईवाले यांनी ट्वीट करून याविषयी माहिती देतांना सांगितले की, ‘भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी जमलेल्या महिला आणि मुले यांच्यावर पाकिस्तानी गुंडांनी अंडी आणि पाण्याच्या बाटल्या फेकल्या. भारतीय वंशाच्या नागरिकांना मोठ्या संख्येने निदर्शकांनी वेढा घातला होता. मारहाणीची धमकी दिली. उच्चायुक्तालयाच्या इमारतीवरही दगडफेक आणि तिरंग्याचा अवमान केला. या वेळी पोलीस अल्प होते. (अन्य देशांच्या उच्चायुक्तालयांच्या ठिकाणी अल्प बंदोबस्त का ठेवण्यात आला ? – संपादक)

उच्चायुक्तालयातील कर्मचार्‍यांनी सर्व भारतीय वंशाच्या नागरिकांना इमारतीत घेऊन जेवण-पाणी दिले. नंतर सुरक्षितपणे घरी पाठवले. लंडनचे महापौर सादिक खान आणि तेथील पोलीस या गुंडांच्या विरोधात कारवाई करतील, अशी अपेक्षा आहे. (महापौर सादिक खान पाक वंशाचे असल्याने ते पाकड्यांनाच साहाय्य करतील ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF