पाकिस्तानने भारतावर आक्रमण केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ ! – रविशंकर प्रसाद, केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री

श्री. रविशंकर प्रसाद

नागपूर – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि अन्य नेते यांच्या चेतावणींना प्रतिसाद देणार नाही; पण पाकिस्तानने भारतावर आक्रमण केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ, असे प्रतिपादन केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना केले. ‘भारत स्वत:चे संरक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. काश्मीरमधील कलम ३७० रहित करण्याचा निर्णय काश्मिरी जनतेच्या भल्यासाठी घेण्यात आला आहे. यात देशाचेही हित आहे’, असेही त्यांनी सांगितले.

राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या २ दिवसांच्या अखिल भारतीय संमेलनाला १७ ऑगस्टपासून वर्धा रस्त्यावरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे प्रारंभ झाला. या संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. हे १७ वे संमेलन असून त्यात देशभरातील १०० हून अधिक न्यायाधीश सहभागी होत आहेत. या संमेलनाचे यजमानपद नागपूरला प्रथमच मिळाले आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती एन्.व्ही. रामना, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नांदराजोग, न्यायमूर्ती एस्.सी. धर्माधिकारी आणि नागपूर खंडपिठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवि देशपांडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF