पूरस्थितीला पश्‍चिम घाटातील पाणी सोडण्याचे चुकीचे नियोजन उत्तरदायी ! – माधव गाडगीळ, ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ

पुणे – महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटक राज्यांत महापुराने हाहाःकार माजवला आहे. या परिस्थितीला केवळ अतीवृष्टी उत्तरदायी नसून धरणातून पाणी सोडण्याचे चुकीचे नियोजन आणि नदीपात्रात होत असलेली अनधिकृत बांधकामे कारणीभूत आहेत, असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ माधव गाडगीळ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना व्यक्त केले.

माधव गाडगीळ पुढे म्हणाले की,

१. पश्‍चिम घाटातील धरणे पूर्ण भरल्यानंतर एकाच वेळी पाणी सोडल्याने केरळमध्ये पूर आला होता. याविषयी ‘रिव्हर रिसर्च सेंटर’ या अभ्यासकांच्या गटाने, तसेच तेथील स्थानिक पंचायतींनी सरकारला जुलैपासूनच धरणांतून पाणी सोडावे, अशी मागणी केली होती; मात्र तसे झाले नाही. धरण पूर्ण भरल्यानंतर एकाच वेळेस मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेले.

२. पाण्याचे चुकीचे नियोजन या सर्व परिस्थितीस कारणीभूत आहे. पश्‍चिम घाट परिसरातील भूमीचा अत्यंत अयोग्य पद्धतीने वापर केला जात आहे.

३. या भागात असलेल्या नद्यांच्या परिसरात वास्तूविशारद (बिल्डर) यांची ‘लॉबी’ सक्रीय आहे. मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली जात आहेत. ही वास्तूविशारदांची (बिल्डरांची) ‘लॉबी’ सरकारी यंत्रणांना हाताशी धरते.

४. सरकारी यंत्रणा केवळ संबंधित यंत्रणांना ‘क्लिन चीट’ देण्याचे काम करत आहे. अनधिकृत खोदकाम आणि बांधकाम यांना अधिकृत करण्याचे काम सरकारी यंत्रणा करत आहेत.

५. पश्‍चिम घाट समितीच्या माध्यमातून आम्ही अनेक गोष्टी सुचवल्या आहेत; मात्र त्यावर विचार होत नाही. पूर आल्यानंतर सरकारी यंत्रणा जाग्या होतात.


Multi Language |Offline reading | PDF