फसव्या भ्रमणभाषपासून (‘फेक कॉल’पासून) सावध रहा !

‘२२.१.२०१९ या दिवशी दुपारी ४.२८ वाजता मला एका अनोळखी व्यक्तीचा भ्रमणभाष आला. ती व्यक्ती भारतीय रिझर्व्ह अधिकोषातून बोलत असल्याचे तिने सांगितले. त्या व्यक्तीशी माझे पुढीलप्रमाणे संभाषण झाले.

श्री. निमिष म्हात्रे

१. ‘भारतीय रिझर्व्ह बँकेचा मॅनेजर बोलत आहे’, असे सांगून एका अनोळखी व्यक्तीने अधिकोषातील खाते आणि ए.टी.एम्. कार्ड ‘ब्लॉक’ करणार असल्याचे सांगणे

अनोळखी व्यक्ती : मी मॅनेजर आदित्य मिश्रा बोलत आहे. आम्ही तुमचे अधिकोषातील खाते आणि ए.टी.एम्. कार्ड ‘ब्लॉक’ करणार होतो. तुम्हाला त्याविषयी काही करायचे आहे का ?
मी : तुम्ही कोणत्या शाखेमधून बोलत आहात ?
अनोळखी व्यक्ती : मी रिझर्व्ह बँकेतून बोलत आहे. आम्ही तुमचे खाते आणि ‘ए.टी.एम्. कार्ड ‘ब्लॉक’ करणार होतो. तुम्हाला ते चालू ठेवायचे आहे का ?
मी : तुम्ही आम्हाला काही न कळवता अकस्मात कसे काय खाते बंद करू शकता ?

२. अनोळखी व्यक्तीने चार दिवसांपूर्वी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून खाते आणि ‘ए.टी.एम्. कार्ड ‘ब्लॉक’ करण्याविषयी लघुसंदेश पाठवला असल्याचे सांगणे आणि प्रत्यक्षात साधकाला तसा कोणताही लघुसंदेश आलेला नसणे

अनोळखी व्यक्ती : तुम्हाला चार दिवसांपूर्वी तुमच्या अधिकोषातून लघुसंदेश आला आहे.
मी : मला असा कोणताच लघुसंदेश आलेला नाही. कोणत्या अधिकोषातून पाठवला होता ?
अनोळखी व्यक्ती : नीट पहा, १९ जानेवारीला तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाकडून लघुसंदेश आला आहे. भ्रमणभाष चालू ठेवूनच तपासून घ्या.
मी (लघुसंदेश तपासून) : मला असा कोणताच लघुसंदेश आलेला नाही.
अनोळखी व्यक्ती : मला आमच्या ‘रेकॉर्ड’मध्ये ‘ड्राफ्ट’ केलेला दिसत आहे.
मी : माझ्यापर्यंत आलेला नाही.

३. अधिकोषातील खाते ‘पॅन कार्ड’ आणि ‘आधार कार्ड’ यांना जोडलेले नसल्याने ते बंद करणार असल्याचे अनोळखी व्यक्तीने सांगणे अन् प्रत्यक्षात साधकाने दोन वेळा ही कागदपत्रे अधिकोषात दिलेली असणे

मी : तुम्हाला अधिकोषातील खाते बंद का करायचे आहे ?
अनोळखी व्यक्ती : कारण तेे ‘पॅन कार्ड’ आणि ‘आधार कार्ड’ यांना जोडलेले नाही.
मी : मी दोन वेळा वरील गोष्टीसाठी सर्व कागदपत्रे अधिकोषात दिली आहेत. आता खाते चालू ठेवण्यासाठी काय करावे लागेल ?
अनोळखी व्यक्ती : तुम्हाला अधिकोषात छायाचित्र, ‘पॅन कार्ड’ आणि ‘आधार कार्ड’ यांची छायांकित प्रत द्यावी लागेल; पण त्याआधी आम्ही आजच येथून खाते बंद करणार आहोत.

४. अनोळखी व्यक्तीने खाते चालू ठेवण्यासाठी ‘आधार कार्ड’चा क्रमांक द्यावयास सांगणे आणि सुरक्षेच्या कारणास्तव ‘आधार कार्ड’चा क्रमांक सांगता येणार नसल्याचे सांगून साधकाने तो क्रमांक न देणे

मी : मग मी काय करू शकतो ?
अनोळखी व्यक्ती : तुम्ही आम्हाला तुमचा आधार कार्डचा क्रमांक सांगू शकता. मग आम्ही खाते चालू ठेवू.
मी : आधार कार्डचा क्रमांक मला भ्रमणभाषवर सांगता येणार नाही.
अनोळखी व्यक्ती : त्यात काही अडचण नसते. भ्रमणभाषवर केवळ खाते क्रमांक आणि पिन कोडची अडचण असते. आधार कार्डचा क्रमांक सांगू शकतो. मग तुम्ही सांगणार का ?
मी : क्षमा करा. आधार कार्डचा क्रमांक मला सांगता येणार नाही. तुमचे नाव काय सांगितलेत ?
अनोळखी व्यक्ती : आदित्य मिश्रा, रिझर्व बँक मॅनेजर.
मी : बरं, याविषयी मी प्रत्यक्षात अधिकोषात जाऊनच बोलीन.
अनोळखी व्यक्ती : तुम्ही आधार कार्डचा क्रमांक सांगणार नाही का ?
मी : नाही. सुरक्षेच्या कारणांमुळे मी सांगू शकत नाही. जे काही आहे, ते प्रत्यक्षात अधिकोषात जाऊन बोलीन.

५. रिझर्व्ह बँकेचे मॅनेजर श्री. आदित्य मिश्रा यांच्या नावाने अन्य कुणीतरी असे गैरकृत्य करत असल्याचे लक्षात येणे आणि दुसर्‍या दिवशी अधिकोषात पैसे भरल्यावर कोणतीही अडचण न येणे

याविषयी मी माहितीजालावर शोधले. तेव्हा आदित्य मिश्रा नावाच्या व्यक्तीचे ‘लिंक्ड इन’ या सामाजिक संकेतस्थळावर अकाउंट असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यामध्ये ती व्यक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेत ‘मॅनेजर’ या पदावर असल्याचे नमूद केलेले आहे. ‘त्यांच्या नावाने कुणीतरी असे कृत्य करत आहे’, असे मला वाटले.
दुसर्‍या दिवशी मी माझ्या कार्डवरून पैसे भरले, तर मला काही अडचण आली नाही. खाते व्यवस्थित चालू असल्याचे माझ्या लक्षात आले.

६. वरील संभाषणाच्या वेळी लक्षात आलेली सूत्रे

अ. भ्रमणभाष आला, तेव्हा मला हसण्याचा आवाज येत होता.
आ. बोलणारी व्यक्ती ‘प्रोफेशनल’ वाटत नव्हती. तिला भरपूर वेळ असल्याप्रमाणे ती बोलत होती. प्रत्यक्षात भारतीय रिझर्व्ह बँकेला अकाउंट बंद करण्याआधी प्रत्येकाला दूरभाष करण्याएवढा वेळ असतो का ?
इ. ‘अधिकोषाच्या कोणत्या शाखेमधील खात्याविषयी बोलत आहात ?’, हे विचारले असते, तर कदाचित त्यांचा फोलपणा स्पष्ट झाला असता.
ई. एखाद्या मोठ्या आस्थापनाकडून किंवा शासकीय भ्रमणभाष आले, तर हल्ली स्मार्टफोनवर त्यांचा लोगो आणि नाव येते. याविषयी तसे काहीच दिसले नाही.
उ. ‘ऑनलाइन’ खरेदी करत असल्यामुळे माझा भ्रमणभाष क्रमांक आणि अकाउंट कोणत्या अधिकोषात आहे ?’, हे त्यांना कळले असेल’, असे वाटते, तरी ‘ऑनलाइन’ खरेदी करणार्‍यांनी याविषयी सतर्कता बाळगायला हवी’, असे वाटते.
देवाच्या कृपेने आणि गुरूंच्या स्मरणामुळेच मी या प्रसंगात स्थिर राहून योग्य ती उत्तरे देऊ शकलो, नाहीतर मी पुष्कळ घाबरलो असतो आणि कदाचित माझ्याकडून चुकाही झाल्या असत्या.’

अशा प्रकारचे फसवे भ्रमणभाष (फेक कॉल्स) आल्यास पुढील कृती करा.

१. तुमच्या क्षेत्रातील स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करा.
२. तुम्हाला ज्या संपर्क क्रमांकावरून हा भ्रमणभाष आला असेल तो क्रमांक, त्या व्यक्तीने सांगितलेले नाव, अन्य ओळख, तिने मागितलेले आधार अथवा तत्सम क्रमांक इत्यादी माहिती तक्रार अर्जात नमूद करा.
३. ज्या अधिकोषाचे नाव सांगून भ्रमणभाष आला असेल, त्या अधिकोषाकडे पत्र पाठवून तक्रार करा. उदा. भारतीय रिझर्व्ह अधिकोष. तक्रार-पत्र देतांना संबंधित अधिकोषाने याविषयी काय उपायात्मक कृती केली ते कळवण्यासाठी अधिकोषाला विनंती करा.
४. ज्या अधिकोषातील तुमच्या खात्याविषयी भ्रमणभाष आला असेल त्या अधिकोषाकडेही तक्रार करा. उदा. स्टेट बॅक ऑफ इंडिया. तक्रारपत्र देतांना संबंधित अधिकोषाने याविषयी काय उपायात्मक कृती केली ते कळवण्यासाठी अधिकोषाला विनंती करा.
५. जर तुम्हाला संगणकीय तक्रारींविषयी माहिती असेल, तर पोलीस, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या ‘सेवा पोर्टल’वरही तुम्ही ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता.

– श्री. निमिष म्हात्रे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF