भारत-पाक आणि चीन !

गेले २ आठवडे काश्मीर प्रश्‍नावरून पाक भारताविरोधात कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करत आहे. भारताने आतापर्यंत एकदाही पाकला दाद दिलेली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाक एकटा पडलेला असतांना ‘शत्रूचा शत्रू तो मित्र’ या नात्याने एकत्र आलेला चीन पाकला पाठिंबा देत आहे. काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या प्रकरणी चीनने संयुक्त राष्ट्रांत विशेष बैठक बोलवण्याची मागणी केली होती. त्या बैठकीतूनही पाकला अवमानित होऊन बाहेर पडावे लागले. या बैठकीत भारताची कोंडी तर झाली नाहीच; उलट ‘अन्य राष्ट्रांचे भारताला समर्थन आहे’, हे जगासमोर आले.
पाक आंतरराष्ट्रीय कराराचे बिनबुडाचे सूत्र घेऊन वारंवार जागतिक स्तरावर सांगत आहे की, काश्मीर हा द्विपक्षीय करार आहे. वास्तविक असा कोणताही करार नसून काश्मीर पहिल्यापासून आणि पूर्णतः भारताचे आहे. तरीही पाकचे सूत्र ग्राह्य धरले, तरी पाकने आतापर्यंत कोणते करार पाळले आहेत ? सहस्रो वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून अनेक सैनिक, सामान्य जनता यांचे जीवन पाकनेच तर विस्कळीत केले आहे ना ? जो चीन आता पाकची पाठराखण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची पत पणाला लावत आहे, तो चीन त्याच्या प्रशासकीय विभागांशी केलेले कोणते करार पाळत आहे ? ही जोडी कोणत्या आधारावर भारताला अडचणीत आणण्याच्या वल्गना करत आहे. पाकला आताजरी चीनने जवळ केले असले, तरी पाकने हे लक्षात घ्यायला हवे की, चीनने त्याच्या सर्व सीमांच्या बाजूने हात-पाय पसरले आहेत. प्रत्येक सीमेवर विस्तारवादी संघर्ष पेटवत ठेवले आहेत. तिबेट, तैवान यांप्रमाणे चीन कधी पाकला गिळंकृत करेल, हे त्यांनाही कळणार नाही; पण पाकला आता शहाणपण येणार नाही. भारतात ज्याप्रमाणे राहुल गांधी यांनी ‘जाऊ तेथे अपयश घेऊन परत येऊ’, अशा पवित्र्यात पक्ष बुडवला, त्याप्रमाणे आता पाकचे पंतप्रधान वावरू लागले आहेत कि काय, असे वाटते. राहुल गांधी यांनी ज्याप्रमाणे काँग्रेसला विसर्जित करण्याच्या टप्प्यावर आणून ठेवले, तसे आता इम्रान खानही करणार आहेत का, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.

चीनची मनमानी जगजाहीर !

भारताची भूमिका स्वच्छ असतांना संयुक्त राष्ट्रांत बैठक बोलवण्याचा पाकने कांगावा केला. भारताचे संयुक्त राष्ट्रांतील दूत सय्यद अकबरुद्दीन यांनी ‘काश्मीरप्रश्‍न हा पूर्णतः भारताचा अंतर्गत प्रश्‍न आहे’, हे स्पष्ट केले. रशियानेही भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला. अमेरिकेनेही पाकच्या आर्थिक साहाय्यात कपात केली आहे. आधीच पाकची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. पाकिस्तानी जनता प्रचंड मंदीला सामोरी जात आहे. असे असूनही ‘पाकची भारताविरोधातील खुमखुमी जिरत नाही’, हे आश्‍चर्य आहे. त्यापुढील आश्‍चर्य हे आहे की, चीन पाकला साथ देत आहे. चीन कोणत्या आधारावर काश्मीरप्रश्‍नी बोलत आहे ? हाँगकाँग हा चीनचा प्रशासकीय प्रदेश असतांना चीन त्याच्या विरोधात कुटील कारस्थाने रचत आहे. तेथील जनता शस्त्रबळालाही घाबरत नाही, हे पाहून तेथील लोकसंख्याच न्यून करण्याचा प्रयत्न चीनने चालवला आहे. हाँगकाँगची जनता चीनच्या मनमानी कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून लाखोंच्या संख्येने आंदोलन करत असतांना चीन सैन्य बळ वापरून ते आंदोलन चिरडण्याच्या पवित्र्यात आहे, हे सारे जग जाणते. असे असतांना ‘भारताने काश्मीरविषयी कोणते निर्णय घ्यावेत’, हे सांगण्याचा चीनला अधिकार आहे का ? काश्मीरमधील ३७० कलम हटवल्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील भारतविरोधी कारवायांना चाप बसणार असल्याने पाक जसा धास्तावला आहे, तसाच ‘अक्साई चीन’ही भारतात विलिन होणार असल्याने चीन अस्वस्थ आहे. चीनची प्रादेशिक महत्त्वाकांक्षा सर्वच देश ओळखून आहेत. नेपाळ, तिबेट, तैवान, हाँगकाँग, भारतातील अरुणाचल प्रदेश आदी सर्वच बाजूंच्या सीमा विस्तारण्याचा प्रयत्न करत आहे. असे असतांना भारताने स्वतःच्या सीमा अधोरेखित केल्या, तर चीनच्या पोटात का दुखावे ?

भारताने दमन केलेले नाही !

चीनने ज्याप्रमाणे स्वतःच्या जनतेवर रणगाडे चालवले, तसे भारताने कधीही काश्मिरी जनतेच्या विरोधात कृती केलेली नाही. त्यांचा आवाजही दाबण्याचा प्रयत्न केलेला नाही. काश्मीरचा विशेष दर्जा रहित करण्यामागेही भारताच्या प्रादेशिक महत्त्वाकांक्षा नाहीत, तर काश्मिरी जनतेला आतंकवादी, फुटीरतावादी, पाकप्रेमी यांच्या कह्यातून मुक्त करून भारताच्या राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे. गेले काही दिवस काश्मीरमध्ये असलेले निर्बंधही आता शिथिल होत आहेत. तेथील दूरसंचारसेवा आणि इंटरनेट सुविधाही काही अंशी चालू करण्यात आली आहे. अनेक पाकप्रेमी मंडळी अजूनही सरकार काश्मीरमधील जनतेचा आवाज दाबत असल्याचा कांगावा करत आहेत. ‘तेथील बातम्या बाहेर येऊ दिल्या जात नाहीत’, असे सांगून काश्मीर अशांत असल्याचे अधोरेखित केले जाते. वास्तविक काश्मीरमधील काही मंडळींनी ३७० कलम हटवण्याला विरोध केला किंवा यापुढे रस्त्यावर उतरून विरोध व्यक्त केला, तरी ते साहजिकच आहे. गेली अनेक वर्षे पाकची त्यांना फूस आहे. काश्मीरमधले जे अनेक पाकप्रेमी, फुटीरतावादी भारताविरोधात कारवाया करत होते, आतंकवाद्यांना स्वतःच्या घरात स्थान देत होते, भारतीय सैन्यावर दगडफेक करत होते, ते काश्मिरी कलम ३७० रहित झाल्यावर पेढे वाटणार होते का ? येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की, मोठे निर्णय घेतांना कठोर व्हावेच लागते. फुटीरतावाद्यांना ‘भारत सरकार त्यांचे दमन करत आहे’, असेच वाटणे स्वाभाविक आहे. त्यांच्या वाटण्याचे इतरांनी काही वाटून घेण्याचे कारण नाही; कारण भारताने अजूनही त्यांच्या विरोधात कारवाई हाती घेतलेली नाही. अनेक मोठ्या राष्ट्रांनी ‘सुक्यासह ओलेही जळते’, या न्यायाने अशा प्रसंगांत धडक कारवाई केली आहे. भारताने अद्याप ते केलेले नाही, हे काश्मिरींच्या नावाने टाहो फोडणार्‍यांनी लक्षात घ्यावे.


Multi Language |Offline reading | PDF