रस्त्यावर नमाजपठण केल्याने रस्ता मुसलमानांच्या मालकीचा होत नाही ! – ‘रामलला विराजमान’चे अधिवक्ता वैद्यनाथन्

रामजन्मभूमीविषयी सर्वोच्च न्यायालयातील नियमित सुनावणी

नवी देहली – मुसलमान रस्त्यावर नमाजपठण करत असतील; म्हणून काही त्यांना त्या जागेवर मालकी हक्काचा दावा करण्याचा अधिकार मिळत नाही. अयोध्येतील जागेवर मुसलमानांनी नमाजपठण केले असेल; मात्र यामुळे त्या जागेवर त्यांचा अधिकार असल्याचा हक्क त्यांना मिळत नाही. विशेषतः तेथे सापडलेले खांब, आकृतीबंध आणि शिलालेख या सर्व गोष्टी हिंदूंच्या असल्याचे सिद्ध होत असतांना हा अधिकार त्यांना मिळत नाही, असा युक्तीवाद ‘रामलला विराजमान’ची बाजू मांडणारे अधिवक्ता सी.एस्. वैद्यनाथन् यांनी केला. सर्वोच्च न्यायालयात रामजन्मभूमीविषयी नियमित चालू असलेल्या सुनावणीच्या वेळी त्यांनी हा युक्तीवाद केला.

१. अधिवक्ता वैद्यनाथन् यांनी पुढे म्हटले की, अयोध्येतील या जागेची रचना कोणत्याही अर्थाने मशिदीची नव्हती. बाबरी मशिदीची काढण्यात आलेली छायाचित्रे इस्लामी विचारसरणीला विरोधाभास असणारी आहेत. इस्लाममध्ये कधीही त्यांच्या प्रार्थनास्थळी कोणत्याही व्यक्ती किंवा प्राणी यांची चित्रे कोरलेली नसतात.

२. या वेळी अधिवक्ता वैद्यनाथन् यांनी वर्ष १९५० मध्ये झालेल्या उत्खननाच्या वेळी या जागेची काढण्यात आलेली छायाचित्रे न्यायालयात सादर केली. यात विविध खांबांवर श्रीकृष्ण, तांडव करतांना शिव आणि बालरूपातील श्रीराम यांच्या मूर्ती कोरण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे.

३. वैद्यनाथन् यांनी मागील सुनावणीच्या वेळी म्हटले होते की, बाबरी मशीद ही मंदिराच्या अवशेषांवर उभी करण्यात आली होती. त्यामुळे ही भूमी कोणाच्या मालकीची आहे, असा दावा करणे चूक ठरेल. जर मशीद ही मंदिराच्या अवशेषांवर उभी राहिली असेल, तर ती मशीद असू शकत नाही; कारण हे शरीयत कायद्याच्या विरोधात आहे.


Multi Language |Offline reading | PDF