कमकुवत पुलांचे ‘विघ्न’ !

संपादकीय

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पावसाच्या भीषण तडाख्यानंतर थोडेफार सावरल्यावर आता सर्वांना येत्या गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. गणेशोत्सव म्हटला की, मिरवणुका, धामधूम आणि जल्लोष हे सर्व ओघाने आलेच; पण यंदा भाविकांच्या उत्साहावर मुंबई महानगरपालिकेने बंधन आणले आहे. ‘विसर्जनाच्या दिवशी कमकुवत आणि जर्जर झालेल्या पुलांवर नाचू नका, अन्यथा कोसळाल’, अशी सूचना पालिका प्रशासनाकडून गणेशोत्सव मंडळांना करण्यात आली आहे. नाचगाण्यामुळे दाब येऊन पुलांची हानी होऊ शकते. त्यामुळे ‘गणेशभक्तांनी पुलावर अधिक वेळ न रेंगाळता शांतपणे पूल पार करावा’, अशी सूचना सर्व गणेशोत्सव मंडळांना केली आहे. ‘बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती’चे अध्यक्ष अधिवक्ता नरेश दहिबावकर यांनीच पालिकेला पुलांवर नाचगाणे न करण्याची सूचना दिल्याचे सांगितले. पालिकेच्या सूचनेचा सर्वच गणेशभक्तांनी गांभीर्याने अवलंब करणे आवश्यक आहे. असे असले, तरी आतापर्यंत मुंबईत झालेल्या पूल दुर्घटनेच्या घटना पहाता एकूणच पुलांच्या दुःस्थितीकडे कानाडोळा करून चालणार नाही. गणेशोत्सवासारख्या मोठ्या उत्सवांच्या अनुषंगाने या स्थितीचा तातडीने विचारविनिमय व्हायला हवा. पालिकेने कितीही सूचना दिल्या किंवा नियंत्रणासाठी पथके नेमली, तरी विसर्जन मिरवणुकीच्या वेळी होणारी प्रचंड गर्दी, भाविकांचा वाढता उत्साह, मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूककोंडी हे सर्व पहाता पुलांवरून जाण्याच्या संदर्भातील सूचनांचे पूर्णतः पालन करणे कितपत शक्य होईल हा प्रश्‍नच आहे. भाविकांच्या उत्साहावर कसे नियंत्रण आणणार ? अशातच एखादी दुर्घटना घडली, जीवितहानी झाली किंवा मोठ्या गणेशमूर्ती पडून त्यांची विटंबना झाली, तर त्याला उत्तरदायी कोण ? या संभाव्य स्थितीचाही विचार व्हायला हवा.

पुलांची दुःस्थिती

काही मासांपूर्वी किंवा एखाद वर्षापूर्वी बांधलेले पूल लगेचच निकृष्ट काय होतात, त्यातून पाणी काय झिरपू लागते, अशी अनेक उदाहरणे महाराष्ट्रात घडत असतात. ३ मासांपूर्वी कोट्यवधी रुपये व्यय करून बांधलेला वाकड येथील पूल मध्यंतरी खचला होता. त्याची दुरुस्ती करण्यात आली. पेण येथील रेल्वे स्थानकाच्या जवळील उड्डाणपुलाची संरक्षक भिंत धोकादायक झाली आहे. भिंतीला बसवलेल्या सिमेंटच्या प्लेट्स बाहेरील बाजूला झुकल्याने भिंतींना धोका निर्माण झाला आहे. त्या प्लेट्स पडून मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पुलांच्या खांबांवर उगवलेल्या झाडांच्या मुळांमुळेही पुलाचे बांधकाम बिघडते. मुळात हे नुकतेच बांधलेले पूल कमकुवत होतातच कसे, हा प्रश्‍न आहे. खरेतर पुलांच्या बांधकामांसाठी संबंधित आस्थापनांना किंवा कंत्राटदारांना काही वर्षांचा पुरेसा कालावधी दिलेला असतो; मात्र ८ ते १० वर्षे होऊनही पुलांची कामे रेंगाळतच चाललेली असतात. पूल लवकर बांधण्यासाठी दबाव आल्यावर काही आठवड्यांतच केवळ घाईघाईने मातीचा भराव टाकला जातो. मग झाला उद्घाटनासाठी पूल सिद्ध ! पुलाचे बांधकाम उरकल्याचा परिणाम काही मासांनंतर खड्ड्यांच्या किंवा अन्य स्वरूपात दिसून येतो. पूलाचे बांधकाम होत नाही; म्हणून डोकेदुखी आणि पूलाचे बांधकाम झाल्यानंतरही डोकेदुखीच ! याला काय म्हणावे ? हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे अपयश कि मानवी चुकांचे उदाहरण ?

ब्रिटिशांचा आदर्श घ्या !

ब्रिटिशांनी १५० वर्षे भारतावर राज्य केले. तेव्हा त्यांनी अनेक मोठमोठे दगडी पूल, रस्ते आणि रेल्वेमार्ग बांधले. त्या सर्वांचे आयुष्य १०० वर्षांचे आहे. आजही ब्रिटिशांची आस्थापने तेथून अमुक अमुक पुलाची मुदत संपल्याचे पत्र पाठवून नवीन पूल बांधण्याविषयी सुचवतात. महाड येथील सावित्री नदीच्या पूल दुर्घटनेच्या आधी त्यांनी पत्राद्वारे पुलाच्या दुरुस्तीविषयी कळवले होते; पण संबंधितांनी त्याकडे दुर्लक्षच केले. त्याची परिणती कशात झाली, याचा अनुभव आपण घेतलाच आहे.‘ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ हे ब्रिटिशांनी बांधले होते. इतक्या वर्षांनंतरही ते सुस्थितीत आहे. त्यात जराही निकृष्टता आलेली नाही. काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील अरकान्सास नदीवरचा ९३ वर्षे जुना असलेला ब्रॉडवे ब्रिज हा पूल पाडून तेथे नवीन आणि रुंद पूल बांधायचा होता. पूल पाडण्यासाठी तेथे नियंत्रित स्फोट करण्यात आले. ‘जुना पूल असल्याने तो काही मिनिटांमध्येच कोसळेल’, असे सर्वांना वाटत होते; मात्र सर्व स्फोटके वापरूनही पुलाला केवळ तडेच गेले. दुसर्‍यांदा स्फोट घडवून ५ घंटे अधिक श्रम केल्यानंतर हा पूल पाडण्यात तंत्रज्ञांना यश आले. तोपर्यंत त्यांची दमछाकच झाली होती. हे जुन्या तंत्रज्ञानाचे यशच म्हणावे लागेल. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणार्‍या भारतीय आस्थापनांनी बांधलेल्या पुलांचीच दुरवस्था का होते ? धरणे, रस्ते, पूल, रेल्वेमार्ग, बंदरे हे दीर्घकालीन असल्याने संबंधित बांधकामाच्या गुणवत्तेविषयीची विश्‍वसनीयता आणि दर्जा टिकून राहील, यासाठी अपेक्षित प्रयत्न होणे आवश्यक ठरते; मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तसे होतांना दिसत नाही. ब्रिटीशकालीन पुलांचा आदर्श घेण्यासह पुलांची बांधकामे भ्रष्टाचाराने तर पोखरलेली नाहीत ना, हेही पहाणे तितकेच महत्त्वाचे ठरते.

मानवी चुकांमुळे मिरवणुकीत येणार्‍या विघ्नांकडे दुर्लक्षून चालणार नाही. दायित्वाचे भान ठेवून संबंधितांनी बांधकामाच्या संदर्भातील अनास्था आणि निष्काळजीपणा दूर केल्यास दुर्घटनांची पुनरावृत्ती नक्कीच टाळता येईल. भक्तांचा भार वहाण्यास ‘विघ्नहर्ता’ गणराय जरी समर्थ असले, तरी पुलांवरील भार कोण वहाणार ?, हा प्रश्‍नच आहे. ‘गणेशोत्सवाची संपूर्ण मिरवणूक निर्विघ्नपणे आणि सुरक्षितरित्या पार पडावी’, हीच सर्व गणेशभक्तांची श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना !


Multi Language |Offline reading | PDF