कोल्हापूर येथे पूरस्थितीतही गुरुकृपेनेच रक्षण झाल्याची साधकांना आलेली अनुभूती

डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे

१. जोरदार पाऊस पडत असतांना सेवेसाठी बाहेर पडणे आणि देवाने बुद्धी दिल्याप्रमाणे स्थानिकांकडे विचारपूस करून जाणे रहित करणे

कोल्हापूर येथे २९.७.२०१९ पासून पावसाचा जोर पुष्कळ वाढला होता. या कालावधीत साधक त्यांना शक्य होईल, तशी सेवा करत होते. ३० जुलै या दिवशी मी गडहिंग्लजला सेवेसाठी चारचाकी वाहन घेऊन निघाले होते; परंतु रस्त्यात इतका प्रचंड पाऊस होता की, मला गाडी चालवण्यास अडचण येत होती. काय करावे हे सुचत नव्हते. त्या वेळी गाडी एका बाजूला थांबवून देवाला प्रार्थना केली. साधक काय म्हणतील, असे स्वतःच्या प्रतिमेचे विचार आणि भावनाशीलता यांमुळे मला गेलेच पाहिजे. केंद्रात सांगून ठेवले आहे, असे विचार येत होते. त्या प्रसंगात देवाने बुद्धी दिली आणि तेथील केंद्रसेवकांना दूरभाष केल्यावर तिथेही पुष्कळ पाऊस असल्याचे आणि एकूण परिस्थिती पहाता येणे रहित केलेले बरे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मी कोल्हापूरला परत आले. त्या वेळी भगवान श्रीकृष्णानेच मला क्रियमाण वापरण्यास बुद्धी दिली, हे लक्षात आले.

२. पूरस्थितीतील प्रतिकूलतेतही श्रीगुरूंच्या शिकवणीप्रमाणे सकारात्मक राहिलेले साधक आणि धर्माभिमानी !

२ अ. वीज आणि पाणी पुरवठा बंद होऊनही साधकांनी स्थिर राहून परिस्थितीला सामोरे जाणे : ५.८.२०१९ या दिवशी नागपंचमी होती आणि पाऊस मुसळधार होता. सर्व जिल्ह्यात नदीच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत होती; परंतु पुढे इतकी भीषण परिस्थिती येईल, असे कोणाला वाटले नाही. ६.८.२०१९ पासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ (पुणे-बेंगळूरू) यावर नदीचे पाणी आले आणि पंचगंगा पूल वाहतुकीसाठी बंद झाला. सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील अनेक रस्ते बंद झाले.

कोल्हापूर शहरात काही भागांमध्ये पुराचे पाणी शिरले. काही जणांच्या घरासमोर पाणी होते. अशा स्थितीत विजेची रोहित्रे पाण्याखाली गेल्यामुळे बहुतांश ठिकाणी वीज आणि महापालिकेकडून पिण्याचे पाणी मिळणे बंद झाले. अनेक भागांमध्ये ३ – ४ दिवस वीज नव्हती, तरी या स्थितीत केवळ गुरुदेवांवर असलेली श्रद्धा आणि संतांनी सांगितलेले उपाय यांमुळे सर्व साधक स्थिर राहून परिस्थितीला सामोरे जात आहेत, असे शिकायला मिळाले.

२ आ. संतांच्या मार्गदर्शनामुळे अडचणींकडे सकारात्मकतेने पहाणे : सर्व साधक सकारात्मक होते. देव आपल्याला काटकसरीपणाने रहायला शिकवत आहे. जे घरात आहे, त्या साहित्याचा वापर करून भोजन बनवणे, साठवलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करणे, असे अनेकांना करावे लागल्यामुळे पुढे येणारा तिसर्‍या महायुद्धाचा भीषण काळ कसा असेल, याचा अनुभव घेतला. काही साधकांना पाण्यामुळे त्यांचे घर सोडून जावे लागले; परंतु या स्थितीतही स्थिर राहून उपाय करणे, प्रार्थना करणे, यांमुळे त्यांना परिस्थिती स्वीकारता आली. या कालावधीत सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्याकडून सातत्याने मिळत असलेले मार्गदर्शन आणि उपाय यांमुळे आम्हा साधकांना देवानेच आधार दिला.

२ इ. धर्मप्रेमींनीही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे आपत्काळाची सिद्धता केलेली असणे : आपल्याला जोडलेले वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना दूरभाष केल्यावर अनेकांनी साधकांना सांगितले की ,तुम्ही सतत सांगत होता की, आपत्काळ येणार आहे, ते आम्ही खरोखर अनुभवले. या अनुभवामुळे त्यांची प.पू. गुरुदेव आणि सनातन संस्था यांवरील श्रद्धा वाढली.

धर्मशिक्षणवर्ग घेणार्‍या साधकांनी जेव्हा धर्मप्रेमींना संपर्क केला, तेव्हा त्यांनीही सांगितलेले उपाय आणि प्रार्थना अतिशय भावपूर्ण केले. धर्मप्रेमींनाही विविध अनुभूती आल्या. अशा स्थितीत काही जणांनी सामूहिक नामजप केला. २६.५.२०१९ या दिवशी दैनिक सनातन प्रभातने प्रकाशित केलेला भीषण आपत्काळ हा विशेषांक आणि त्यातील आपत्काळाच्या पूर्वसिद्धतेविषयीचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा लेख वाचल्यामुळे घरात त्या पद्धतीने जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवला होता, असे अनेकांनी सांगितले.

काळ आणि परिस्थिती कितीही भीषण असली, तरी देवाचे आशीर्वाद, संतांचे नित्य प्रेम् आणि मार्गदर्शन अन् प्रार्थना यांमुळे साधक या स्थितीतही आनंदी राहू शकले. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवी आणि सर्व संत यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करते.

– डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे, कोल्हापूर. (१४.८.२०१९)

कागल येथील सौ. सविता सणगर यांना आलेली अनुभूती

सौ. सविताताई परिचारिका आहेत. त्यांनी सांगितले की, त्या दिवशी मी कामावरून घरी येत होते, तेव्हा अचानक रस्त्यावर पुष्कळ पाणी आले होते. मला पाण्याची अतिशय भीती वाटते. मी देवाचा धावा चालू केला. त्याच वेळी मला तिथे एक परिचित भेटले. चारचाकी वाहनातून आले होते. त्यांनी मला घरापर्यंत सोडतो, असे सांगितले. केवळ गुरुदेवांच्या कृपेने त्यांच्या माध्यमातून देवच मला वाचवायला आला, याची अनुभूती आली.

– डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे, कोल्हापूर. (१४.८.२०१९)

यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF