सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून महाराष्ट्र अन् कर्नाटक येथील पूरग्रस्तांना साहाय्य, तसेच विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दक्षिण कन्नड (कर्नाटक) जिल्ह्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पूरग्रस्त असलेल्या लहान मुलांना वस्तूंचे वाटप करतांना  १. पू. रमानंद गौडा, समवेत विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक

गेले काही दिवस महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांतील काही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती उद्भवली आहे. या पुरात सहस्रो लोक अडकून पडले आहेत, तर कोट्यवधी रुपयांची हानीही झाली आहे. पुरात अडकून पडलेल्या लोकांना साहाय्य करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांसह समाजातून अनेक सामाजिक, तसेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटना पुढे सरसावल्या आहेत आणि त्या आपापल्या परीने सर्व साहाय्य करत आहेत. यामध्ये सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचाही मोठा सहभाग आहे. या संघटनांकडून अन्नदान, धान्य, कपडे, पिण्याचे पाणी आदी जीवनावश्यक वस्तूंसह औषधे आणि अन्य वैद्यकीय साहाय्यही केले जात आहे. या साहाय्यासह सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्याकडून पूरग्रस्तांना साधना, तसेच नामजप यांचेही महत्त्व सांगण्यात येत आहे. परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांच्या कृपाछायेखाली साधना करणार्‍या साधकांनी या पूरग्रस्तांना साहाय्य करून समाजासमोर आदर्शच निर्माण केला. या साहाय्यकार्याचा वृत्तांत येथे देत आहोत.

कर्नापा (जिल्हा दक्षिण कन्नड, कर्नाटक), १५ ऑगस्ट (वार्ता.) – हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटना यांच्या वतीने येथील पूरग्रस्तांना साहाय्यकार्याच्या अनुषंगाने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी कर्नाटक राज्याचे सनातन संस्थेचे धर्मप्रसारक पू. रमानंद गौडा यांच्या शुभहस्ते पूरग्रस्तांना वस्तूंचे वाटप करण्यात आले.

बेळ्ळतंगडी तालुक्यात असलेल्या कर्नापा या गावातील पूरग्रस्तांना याप्रसंगी मार्गदर्शन करतांना पू. गौडा यांनी भविष्यात उद्भवणार्‍या कठीण काळाला सामोरे जाण्यासाठी आपण सतर्क रहाण्याविषयी सांगितले. या वेळी त्यांनी साधनेचे महत्त्वही विशद करून सांगितले.

या वेळी बेळ्ळतंगडी तालुका मजदूर संघाचे सचिव श्री. जयराज सालियान, चिरंजीवी युवक मंडळाचे समन्वयक श्री. रामचंद्र गौडा, मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. हरिप्रसाद भट यांच्यासमवेतच मंडळाचे सर्वश्री रवींद्र पुजारी, राघवेंद्र भट, संजीव दरखासू आदी सदस्य उपस्थित होते. सनातन संस्थेच्या सौ. मंजुळा गौडा, सौ. रूपा आणि श्री. आनंद गौडा, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. हरिष एम्. ही या वेळी उपस्थित होते. पुराने प्रभावित झालेल्या लहान मुलांनाही साहाय्यकार्याच्या अनुषंगाने काही वस्तूंचे वाटप करण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF