पूरपरिस्थितीत अभूतपूर्व साहाय्य करणारे कोल्हापूरकर !

श्री. सागर निंबाळकर

कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये महापुराने थैमान घातलेले असतांना कोल्हापुरातील विशेषतः तरुणांनी आणि नागरिकांनी पूरग्रस्तांना अभूतपूर्व असे साहाय्य केले. अन्य कोणाकडून किंवा शासनाकडून साहाय्य येण्याची वाट न पहाता नागरिकांनी स्वतःच साहाय्यास प्रारंभ केला. तरुणांना स्थानिक राजकीय नेतृत्वाचीही उत्तम साथ लाभली. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय यंत्रणांनाही या तरुणांनी मोलाचे सहकार्य केले. कोल्हापूरकरांच्या दातृत्वाचा आणि संकटसमयी कर्तव्यभावनेने धावून जाण्याच्या कार्याचा हा धावता आढावा !

संकलन : श्री. सागर निंबाळकर, एक साधक कोल्हापूरकर.

१. कट्ट्यावरचे तरुण साहाय्याला आघाडीवर !

पावसाचा जोर वाढू लागल्यापासून स्थानिक तालीम संघटना, गणेशोत्सव मंडळे, महिला मंडळे यांचे कार्यकर्ते, तसेच ‘एरव्ही ‘कट्ट्यावर बसणारी’ म्हणून हिणवली जाणारी तरुण मंडळी ६ ऑगस्टपासून पाण्यातच होती’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यंत्रणा येण्यापूर्वी ट्रकच्या फाळक्यांपासून तराफे बनवून या तरुणांनी साहाय्यकार्य चालू केले. आपल्या घरात पाणी आले नसले, तरी पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या घरातील साहित्य हालवणे, वरच्या मजल्यावर नेऊन ठेवणे, पूरग्रस्तांच्या निवार्‍याची व्यवस्था करणे, औषधे नेऊन देणे, पाणी असलेल्या परिसरात रस्ते अडवून धरणे, तेथे दोर्‍या बांधणे, विविध गावांतून सुरक्षितस्थळी हालवण्यात येत असलेल्या नागरिकांना बोटीतून उतरतांना धीराचा हात देणे, यांसारखी शेकडो कामे या तरुणांनी आनंदाने केली.

पूरग्रस्त महिलेला बोटीतून बाहेर काढतांना एक तरुण (सौजन्य : माय मराठी एन्टरटेनमेन्ट)

२. ‘स्टे स्ट्राँग कोल्हापूरकर’ (कोल्हापूरकरांनो, खंबीर रहा !) हा ‘हॅशटॅग’ आघाडीवर !

एका तरुणाला त्यांच्या साहाय्यकार्याविषयी विचारले असता त्याने सांगितले की, ‘मीही कोल्हापूरकर आहे आणि पूरग्रस्तही कोल्हापूरकर आहेत, या एकत्वाच्या आणि कर्तव्याच्या भावनेतून आम्ही साहाय्य करत आहोत.’ खरंतर हाच संदेश सामाजिक संकेतस्थळांवरूनही फिरत होता. कोल्हापूर शहरात नसलेल्या; पण मुंबई-पुणे या शहरांत असलेल्या तरुण-तरुणींनीही ‘माझे घर अमुक ठिकाणी आहे. तेथे ५ माणसांच्या रहाण्याची व्यवस्था करता येईल’, असे संदेश पाठवले. सामाजिक संकेतस्थळांवर ‘स्टे स्ट्राँग कोल्हापूरकर'(कोल्हापूरकरांनो, खंबीर रहा !) हा ‘हॅशटॅग’ आघाडीवर होता. ‘अरे कोण म्हणतोय विषय गंभीर आहे’, ‘इथे अख्खे कोल्हापूर खंबीर आहे’, हे वाक्य असो किंवा होय ! संघर्षाचा वारसा घेऊन संकटाला माझं कोल्हापूर म्हणतंय ‘तू येच, मी इथंच आहे !’ या ओळी असतील, प्रत्येक कोल्हापूरकराच्या मनात एकच भावना असल्याचे प्रतीत होत होते. अतिरिक्त अन्नधान्याची नासाडी होऊ नये, यासाठीही संदेश पाठवले जात होते. एखाद्या भागातील नागरिकांनी पोळ्या बनवल्या की, ते सामाजिक संकेतस्थळांवर संदेश द्यायचे. लगेचच त्या पोळ्या गरजूंपर्यंत पोचवण्यासाठी अगदी नियोजन केल्याप्रमाणे तरुणांची यंत्रणा कामी लागत होती.

इस्कॉन या आध्यात्मिक संस्थेच्या वतीने कोल्हापूरमध्ये दाखल झालेले डॉक्टरांचे एक पथक आणि रुग्णवाहिका

३. धार्मिक संस्था आणि संघटना यांचे मोलाचे सहकार्य !

अ. कोल्हापूर येथील जगद्गुरु शंकराचार्य पीठ, करवीर यांच्या मठात पूरग्रस्तांची व्यवस्था करण्यात आली. मठात पाणी शिरल्यानंतर तेथील गायींच्या रक्षणासाठी गायींना वरच्या मजल्यावर नेण्यात आले.

आ. कणेरीवाडी येथील ‘सिद्धगिरी मठा’च्या वतीने महामार्गावर खोळंबलेल्या ट्रकचालकांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या.

इ. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज, नाणीज मठ यांच्या वतीने पूरग्रस्तांना ब्लँकेट, चादरी, अन्नधान्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तू पुरवण्यात आल्या.

ई. ‘आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत (इस्कॉन)’ च्या वतीने डॉक्टरांचे एक पथक रुग्णवाहिकेसह येथे पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी आले आहे.

४. राजकीय नेतृत्वाचा पुढाकार !

अ. शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर आणि त्यांची दोन्ही मुले यांनी पाण्यात उतरून नागरिकांना साहाय्य केले. श्री. क्षीरसागर यांनी एका पूरग्रस्त महिलेला हृदयविकाराचा झटका आला असता, स्वतःची गाडी उपलब्ध करून दिली. स्थानिक पूरग्रस्तांना प्रत्येकी

५ सहस्र रुपयांचे साहाय्य त्यांनी तत्परतेने केले. २५ सहस्र चादरींचे वाटप केले. त्यांच्या पत्नी

सौ. वैशाली क्षीरसागर यांनी महिलांना घेऊन पंचगंगा नदीची ओटी भरून ‘काही चुकले असल्यास क्षमा कर !’, अशी क्षमायाचनाही केली. श्री. क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी शहर आणि परिसरातील पूरग्रस्तांना अपूर्व साहाय्य केले. शिवसेनेचे आमदार श्री. चंद्रदीप नरके आणि डॉ. सुजीत मिणचेकर यांनीही पूरग्रस्तांना साहाय्य केले.

आ. माजी खासदार धनंजय महाडिक यांची ‘धनंजय महाडिक युवाशक्ती’चे तरुण कार्यकर्ते प्रतिदिन ३० सहस्र अन्नाची पाकिटे पूरग्रस्तांपर्यंत अत्यंत नियोजनबद्धरित्या पोचवत होते. पहाटेपासूनच त्यांचे कार्यकर्ते या साहाय्यासाठी धडपडत होते. स्थानिक प्रतिष्ठितांनीही महाडिक यांच्याकडे मोठ्या प्रमाणात धनधान्य रूपात साहाय्य केले. आमदार सतेज पाटील यांचे कार्यकर्ते महापुराच्या पहिल्या दिवसापासून पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी कार्यरत होते. या कार्यकर्त्यांनी कसबा बावडा परिसरातील पूरग्रस्तांना प्रसंगी खांद्यावरून सुरक्षित स्थळी पोचवले. संजय घोडावत ग्रुप, समस्त हिंदु आघाडीचे श्री. संभाजीराव साळुंखे यांचे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते, स्थानिक शिवसैनिक आदींनीही मोठ्या प्रमाणात साहाय्य केले.

५. अन्य संघटनांचे सहकार्य !

येथील हॉटेल मालक संघाने पूरग्रस्तांसाठी भोजनाची व्यवस्था केली आहे. स्थानिक बचत गट, वैद्यकीय संस्था, प्राणीमित्र संघटना, ‘व्हाईट आर्मी’, ‘मावळा ग्रूप’, ‘श्री महालक्ष्मी अन्नछत्र’, ‘कोल्हापूर जिल्हा इंजिनियरिंग असोसिएशन’, ‘माणुसकीची भिंत आणि मित्र परिवार’, शिक्षक संघटना, महापालिका कर्मचारी संघ आदींनीही साहाय्यकार्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शहरातील मुस्लीम बोर्डींग आणि शिरोली येथील मदरसा येथेही पूरग्रस्तांची व्यवस्था करण्यात आली होती. मुस्लीम बोर्डींगच्या वतीने ‘बकरी ईदला बकरी न कापता, त्यांची रक्कम पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी देण्यात येईल’, असा निर्णय घोषित करण्यात आला होता.

६. आपत्कालीन साहाय्य यंत्रणेच्या अधिकार्‍यांनाही आवडली कोल्हापूरकरांची कर्तव्यभावना !

आपत्कालीन साहाय्य यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कार्याचे अनेक नागरिकांनी मोठे कौतुक केले. पूरग्रस्तांना हे अधिकारी म्हणजे देवच साहाय्यासाठी धावून आला, असे वाटणे साहजिक असले, तरी पूरस्थितीने बाधित नसलेल्या कोल्हापूरकराच्या मनातही तीच भावना होती. त्यामुळे या कर्मचार्‍यांनाही स्थानिक महिलांनी राखी बांधली. या यंत्रणांपैकी एका यंत्रणेच्या अधिकार्‍यानेही ‘आम्हाला अन्य जिल्ह्यांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी पोचवण्यासाठी जायचे आहे; मात्र कोल्हापुरात मिळालेले प्रेम, सहकार्य हे अविस्मरणीय आहे. येथून पाय निघत नाहीत’, अशी भावना व्यक्त केली.

‘कोल्हापूरकरांमध्ये असलेली ही कर्तव्यभावना आज देशातील प्रत्येक नागरिकामध्ये असणे आवश्यक आहे. कोल्हापूरकरांच्या या कर्तव्यभावनेचे रूपांतर राष्ट्र आणि धर्म यांच्याप्रतीच्या समर्पणभावनेत होवो, ही श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कर्तव्यनिष्ठा !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील २२ केंद्रांत २५० कार्यकर्ते पूरग्रस्तांच्या साहाय्यार्थ कार्यरत आहेत. त्यांनी ३८ सहस्र व्यक्तींच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था केली आहे. १० आरोग्य केंद्रांमध्ये प्रथमोपचारासाठी साहाय्य, ६ सहस्र लिटर पेयजलाचे वितरण, औषधे आणि कपडे यांचे वितरण चालू आहे. कोल्हापूरमधील ६ आणि इचलकरंजीतील ४ निवाराकेंद्रांचे पूर्ण दायित्व संघाने घेतले आहे.


Multi Language |Offline reading | PDF