प.पू. दास महाराज यांना सर्वार्थाने साथ देणार्‍या आदिशक्तीस्वरूप पू. (सौ.) लक्ष्मी नाईक !

पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांच्या चरणी वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

विवाहापूर्वी ऐश्‍वर्यात जीवन व्यतीत करणार्‍या पू. (सौ.) लक्ष्मी नाईक उपाख्य पू. (सौ.) माई यांनी विवाहानंतर पतीगृही, म्हणजे प.पू. दास महाराजांच्या समवेत अत्यंत काटकसरी आणि कष्टमय सहजीवनही आनंदात व्यतीत केले. उपजतच अध्यात्माची आवड असणार्‍या पू. (सौ.) माई आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असलेल्या प.पू. दास महाराजांच्या समवेत सांसारिक दायित्व पार पाडत साधना करून आध्यात्मिक प्रगतीपथावर अग्रेसर होत संतपद प्राप्तकर्त्या झाल्या. सेवाभावी अन् समाधानी वृत्ती, प्रेमभाव इत्यादी अमौलिक गुणसंपदा असलेल्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असलेल्या पू. (सौ.) माईंचा श्रावण पौर्णिमा (नारळी पौर्णिमा) (१४.८.२०१९) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने प.पू. दास महाराज यांनी कृतज्ञतापूर्वक शब्दांकित केलेले पू. (सौ.) माईंसमवेतच्या जीवनप्रवासातील अनमोल क्षण आणि अनुभवलेले त्यांच्या आदिशक्तीस्वरूपिणी रूपाचे वर्णन येथे देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले

पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांचे वरवरचे गुण आम्हाला ज्ञात होते; पण त्यांच्या साधनेची आणि व्यावहारिक जीवनातील विविध वैशिष्ट्ये ज्ञात नव्हती. प.पू. दास महाराज यांनी लिहिलेल्या या लेखामुळे आम्हाला पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांचे अनेक गुण लक्षात आले आणि त्यांच्यासारख्या संतांचा सहवास आम्हाला दिल्याबद्दल प्रभु श्रीरामचंद्रांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांचा सहवास आम्हाला असाच लाभो, अशी प्रभु श्रीरामचंद्रांच्या चरणी प्रार्थना ! या लेखाबद्दल प.पू. दास महाराज यांचाही मी ऋणी आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सौ. माई माझ्या जीवनात आल्यापासून त्यांनी मला अनमोल साथ दिली. त्रेतायुगातील अत्रीऋषींच्या पत्नी अनसूयेप्रमाणेच कलियुगातील ही माझी पत्नी केवळ पत्नी नसून साक्षात आदिशक्तीचे स्वरूप आहे. सौ. माईंच्या विषयी कितीही लिहिले, तरी ते अपूर्णच आहे, तरीही मी गुरुचरणी प्रार्थना करून सौ. माईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा लेख लिहीत आहे.

प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक

१. विवाहपूर्व स्थिती

आमचे संसारातील ऐश्‍वर्य म्हणजे त्रेतायुगातील ऋषीमुनींच्या पर्णकुटीप्रमाणे असलेली आमची पर्णकुटी ! माझा नित्यक्रम म्हणजे श्रीरामाची पूजा आणि साधना करणे. घरी गायी – म्हशी होत्या. त्यामुळे मी दुधाचा व्यवसाय करत होतो. त्यावर आमची उपजिविका चालायची. आमची परिस्थिती अगदीच बेताची होती. ही परिस्थिती माईंच्या आई-वडिलांनी पाहिली होती. माईंचे माहेर जवळ असल्यामुळे त्यांचे आई-वडील आमच्या आश्रमात श्रीरामाच्या दर्शनाला यायचे. ते आल्यावर पर्णकुटीत येऊन माझ्या आईशी बोलायचे. त्यांचे सगळे बोलणे अध्यात्माविषयीच असायचे. माईंना २ बहिणी होत्या. बहिणींमध्ये केवळ माईंना अध्यात्माची अतिशय आवड होती. त्या माझ्या आईकडे येऊन अध्यात्मावर प्रश्‍न विचारायच्या. त्या वेळी माझी आई त्यांचे शंकानिरसन करत असे.

२. विवाह करण्याचा विचार नसल्याने घरी विवाहाची बोलणी चालू झाल्यावर एकदा ६ मासांसाठी मानस सरोवर येथे आणि नंतर २ वेळा बद्रीनाथला निघून जाणे अन् ठरवल्याप्रमाणे मारुतिरायांचे दर्शन घेऊन येणे, नंतर वडील रुग्णाईत असल्याचे कळल्यावर घरी येऊन त्यांची सेवा करणे

माईंचे वडील मला म्हणायचे, तुम्ही विवाह करा; परंतु मी त्यांचे म्हणणे टाळायचो. माझे वडीलही मला विवाह कर, असे म्हणायचे; पण माझ्या मनात तो विचारच नव्हता. मला मारुतिरायांचे दर्शन घ्यायचे होते. एकदा घरचे माझ्यासाठी मुली पहाणार आहेत, हे कळल्यावर मी मानस सरोवर येथे ६ मासांसाठी (महिन्यांसाठी) पळून गेलो आणि ठरल्याप्रमाणे मारुतिरायांचे दर्शन घेऊनच आलो. घरी आल्यावर पुन्हा तोच विषय चालू झाला. तेव्हा मी पुन्हा बद्रीनाथला गेलो. तेथे मी २ मास राहिलो. वर्ष १९६५ मध्ये मी परत आलो. मी जेव्हा दुसर्‍या वेळी बद्रीनाथला गेलो, तेव्हा माझ्या वडिलांना (पू. भगवानदास महाराज यांना) अर्धांगवायूचा झटका आला. त्या वेळी मला महाराजांची अवस्था गंभीर आहे. तू लवकर ये, अशी तार आल्याने मी घरी परत आलो आणि त्यांच्या सेवेत गुंतलो.

३. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी वडिलांनी (पू. भगवानदास महाराजांनी) देहत्याग करणे

वडील सतत ध्यानावस्थेत असायचे. त्यांचे आध्यात्मिक सामर्थ्य पुष्कळ होते. ७.११.१९६५ या दिवशी वैकुंठ चतुर्दशी होती. त्याच दिवशी माझ्या वडिलांनी दुपारी २ वाजता ध्यानावस्थेत असतांनाच देहत्याग केला. ते देहत्यागापूर्वी किती वाजले ? असे मला सारखे विचारत होते. त्या वेळी ते असे का विचारत आहेत ?, हे मला कळत नव्हते. (चातुर्मासात वैकुंठाचे द्वार बंद असते. त्या कालावधीत प्रापंचिक लोक ४ मास आणि संन्यासी २ मास साधना करण्यासाठी ध्यानाला बसतात. हे वैकुंठाचे द्वार वैकुंठ चतुर्दशीला दुपारी २ वाजता उघडते.) तेव्हा मला कळले की, वडील देहत्यागासाठी वैकुंठाचे द्वार उघडण्याच्या वेळेची वाट पहात होते. त्या वेळी वडिलांना बोलावण्याकरता ३ भिल्ल आले होते. ते २ भिल्ल आणि १ भिल्लीण म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाई होती.

४. पू. भगवानदास महाराजांनी देहत्यागापूर्वी पू. (सौ.) माईंच्या वडिलांना प.पू. दास महाराज यांच्या विवाहाविषयी सांगणे

पूर्वी माईंच्या वडिलांवर काही बिकट प्रसंग आले होते. त्या वेळी पू. भगवानदास महाराजांनी (वडिलांनी) त्या प्रसंगांचे निवारण केल्यामुळे माईंच्या वडिलांची त्यांच्यावर श्रद्धा बसली होती.

पू. भगवानदास महाराजांनी माईंच्या वडिलांना सांगितले, हा (प.पू. दास महाराज) विवाह करायचा नाही, असे म्हणतो; पण आपण त्याचे लग्न लावून देऊया. (याच्यावर अक्षता घालूया.) माईंच्या वडिलांनी होकार दिला आणि त्यांनी पू. भगवानदास महाराजांना दिलेला शब्द पूर्ण केला.

५. भगवान श्रीधरस्वामींनी पू. (सौ.) माईंच्या वडिलांना स्वप्नदृष्टांताद्वारे प.पू. दास महाराजांचा विवाह माईंशी करून देण्यास सांगणे

त्यानंतर एकदा भगवान श्रीधर स्वामी माईंच्या वडिलांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, या मुलाला (प.पू. दास महाराज यांना) अध्यात्माची आवड आहे. सध्याच्या काळात असा मुलगा मिळणे फार कठीण आहे. त्यात तुझ्या मुलीलाही अध्यात्माची आवड आहे. तुझी मुलगी तू या मुलाला दे. त्याला मी अनुग्रह दिला आहे आणि दुसर्‍या अवतारात मी तुझ्या मुलीला संत करीन. (परात्पर गुरु डॉ. आठवले हे भगवान श्रीधरस्वामींचा दुसरा अवतार आहेत, अशी प.पू. दास महाराजांची दृढ श्रद्धा आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी माईंना संतपद प्राप्त झाल्याचे घोषित केले होते. – संकलक)

६. माईंच्या नातेवाइकांचा विरोध असूनही पू. (सौ.) माईंच्या वडिलांनी प.पू. दास महाराज आणि माई यांचा विवाह लावून देणे

माईंच्या वडिलांनी मला काहीच न सांगता किंवा कळूही न देता ज्योतिषी असलेल्या त्यांच्या मेव्हण्यांना माईंची आणि माझी पत्रिका दाखवली. दोघांचे सर्व गुण जुळल्याने त्यांनी ही पत्रिका इतर नातेवाइकांनाही दाखवली; परंतु नातेवाइकांनी या मुलाला मुलगी देऊ नका, असे म्हणून आमच्या लग्नाला विरोध केला. माईंच्या वडिलांनी मात्र त्यांना झालेल्या स्वप्नदृष्टांतानुसार कृती केली. मीही त्यांना विचारले, लोक काय म्हणतील ? त्यावर त्यांनी मुलगी माझी आहे. मी हवे ते करीन, असे सांगितले. ते प्रतिष्ठित असल्यामुळे त्यांना काही बोलण्याचे कुणाचे धाडस नव्हते. त्यांनीच विवाहाची सर्व सिद्धता केली आणि १७.२.१९७८ या दिवशी आमचा विवाह झाला.

७. विवाहानंतर सर्व ऐश्‍वर्य सोडून पर्णकुटीत रहायला आलेल्या पू. (सौ.) माईंना प.पू. दास महाराजांसारखा पती मिळाल्याने जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटणे

माई माझ्या जीवनात आल्या, त्या वेळी समाजाच्या दृष्टीने किंवा व्यावहारिक दृष्टीने आमच्याकडे काही ऐश्‍वर्य नव्हते. रहाण्यासाठी केवळ एक पर्णकुटी होती. मी माईंना म्हणायचो, तू राजवाड्यात मोठी झालीस. लग्न होऊन एखाद्या चांगल्या घरात गेली असतीस. असे असतांना तू या पर्णकुटीत का आलीस ? त्यावर माई म्हणायच्या, पार्वतीने शंकराला तपश्‍चर्या करून प्रसन्न करून घेतले. प्रभु श्रीराम आणि सीतामाई यांचा विवाह झाला. मलाही तसेच पती मिळाले आहेत. मी किती भाग्यवान आहे ! असा पती मिळणे अत्यंत दुर्लभ आहे. त्यामुळे तुम्ही कसलाही विचार मनात आणू नका. येथे येऊन माझ्या जीवनाचे सार्थकच झाले आहे.

८. अनेक कठीण प्रसंगात पू. (सौ.) माईंची प.पू. दास महाराजांना मिळालेली खंबीर साथ !

८ अ. पू. (सौ.) माईंनी संसारातील सर्व कष्टप्रद कामे आनंदाने करणे : सौ. माईंनी मला सर्वतोपरी साहाय्य केले. आमचा दुधाचा व्यवसाय होता. सौ. माई मला गाय आणि म्हैस यांच्या धारा काढण्यासाठी साहाय्य करायच्या. पावसाळ्यात विजा चमकायच्या. ओढ्याला पुष्कळ पाणी असायचे, तरीही माई सर्व काही करायच्या. त्या स्वतः जाऊन घरोघरी दूध घालायच्या. त्या श्रीरामाची पूजा करायच्या. त्या म्हणत, ‘‘मी मंदिरातील पूजा करते. तुम्ही घरातील पूजा करा.’’ पूजेची पूर्वसिद्धता माईच करत असत. मी जाऊन केवळ पूजा करायचो. (जशी भगवंताने ‘श्रीखंड्या’ नाव धारण करून संत एकनाथ महाराजांच्या घरी १२ वर्षे पाणी भरणे, पूजेची पूर्वसिद्धता करणे, वस्त्रे धुणे इत्यादी कामे केली आणि त्याने आपली ओळखही संत एकनाथ महाराजांना होऊ दिली नाही, तसेच माईंच्या संदर्भातही आहे.) त्यामुळे ‘माई म्हणजे साक्षात आदिशक्तीच आहेत’, असे मला जाणवते. (जसे परात्पर गुरु डॉ. आठवले अवतारी पुरुष असूनही सर्वसामान्यांप्रमाणे राहून अवतारकार्य करत आहेत, तसेच माईंचे वागणे आहे.)

८ आ. परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा ठेवून कठीण प्रसंगात प.पू. दास महाराजांना धीर देणार्‍या पू. (सौ.) माई ! : जेव्हा मी ‘आश्रमातील श्रीराम मंदिर कसे होणार ?’, या विवंचनेत असायचो, त्या वेळी मला माई म्हणायच्या, ‘‘तुम्ही कशाला काळजी करता ? सगळे व्यवस्थित होणार. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने सर्व होणार आहे. ते आपल्या जीवनात आहेत ना ? तेच सर्व इच्छा पूर्ण करणार आहेत.’’ जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग येत असे, तेव्हा मला काळजी वाटायची. अशा वेळी माई मला धीर द्यायच्या.

८ इ. प.पू. दास महाराजांच्या एक वर्षाच्या मौनाच्या कालावधीत त्यांना सर्वार्थाने साथ देणार्‍या पू. (सौ.) माई ! : २०१६ ते २०१७ या एक वर्षाच्या कालावधीत मी मौन धारण केले होते. मौनाचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये एक लेख प्रसिद्ध झाला होता. तो वाचल्यावर माझे अभिनंदन करण्यासाठी देवदहून परात्पर गुरु पांडे महाराज यांचा मला दूरभाष आला होता. त्या वेळी ते म्हणालेे, ‘‘तुम्ही इतके (कठीण व्रत) केलेत; पण हे सर्व करण्यात तुम्हाला कुणी साथ दिली ?’’ मी त्यांना त्या काळात माझ्याजवळ असणार्‍या साधकांची नावे सांगितली. त्यावर परात्पर गुरु पांडे महाराज म्हणाले, ‘‘ते तुमच्या जवळ असेपर्यंत त्यांनी साहाय्य केले; परंतु नंतर सर्व कुणी केले ?’’ मला काही कळेना. नंतर ते म्हणाले, ‘‘पू. (सौ.) माईंनी साथ दिली नसती, तर तुमचे मौन पूर्ण झाले असते का ? पू. माईंनी इतके करूनही तुम्ही त्यांच्या नावाचा उल्लेख लेखात कुठेच केला नाही, हे कसे ? कुठल्याही देवतेचे कार्य त्याच्या शक्तीविना पूर्णत्वाला जात नाही. त्याला शक्तीची आवश्यकता असते, उदा. श्रीराम वनवासात असतांना त्यांना सीतामाईंनी पूर्ण साथ दिली होती.’’

परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे सीतामाई सर्व ऐश्‍वर्य सोडून श्रीरामासमवेत वनवासात गेल्या, तसाच माझाही हा (मौनरूपी) वनवासच होता. त्यात माईंनी मला पूर्ण साथ दिली. अत्रिऋषींच्या कार्यात त्यांना जशी पतिव्रता अनसूयेने साथ दिली, तसेच माझे मौन पूर्णत्वाला नेण्याच्या दृष्टीने माईंनी मला पूर्ण साथ दिली.

परात्पर गुरु पांडे महाराजांनी म्हटल्यानुसार आदिशक्तीविना कुठलीच देवता कार्य करू शकत नाही. जशी शिवाची पार्वती, श्रीरामाची सीता, श्रीविष्णूची लक्ष्मी आहेे.

९. पू. (सौ.) माईंच्या गुरुदेवांवरील श्रद्धेमुळे सर्व आपोआप होत असल्याची अनुभूती येणे

९ अ. गुरुपौर्णिमेच्या वेळी गुरुपूजनाचे साहित्य नसल्याने काळजी वाटत असतांना पू. (सौ.) माईंनी ‘काळजी करू नका’, असे सांगणे आणि थोड्याच वेळात एका साधकाने स्वतःहून सर्व साहित्य आणून दिल्याने पूजा व्यवस्थित पार पडणे : २०१७ या वर्षी गुरुपौर्णिमेला आमच्याकडे असलेल्या भगवान श्रीधरस्वामी आणि परात्पर गुरु आठवले यांच्या पादुकांची पूजा करायची होती; पण जवळ काहीच (धन) नव्हते. दोन दिवस आधी मी ‘आता हे कसे करायचे ?’, या विचारात असतांना माई म्हणाल्या, ‘‘सगळे ठीक होईल. तुम्ही काळजी करू नका’’ आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणेच घडले. एका साधकाने स्वतःहूनच त्यासाठी लागणारे सर्व साहित्य आणले. त्यात पूजेची सर्व सिद्धता आणि ब्राह्मणाला द्यायची दक्षिणा (रक्कम) इत्यादी सर्व होते. मला आश्‍चर्य वाटले. अशा प्रकारे सौ. माई जे म्हणतात, त्यानुसार सगळे आपोआप घडते, याचा अनुभव मला प्रत्येक वेळी येतो. (त्या वेळी सर्व साहित्य घेऊन आलेला साधक नंतर मला दिसला नाही.)

९ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी आश्रमात रहाण्यास बोलावणे, त्या वेळी मंदिराच्या पूजेची व्यवस्था होत नसल्याने काळजी वाटणे आणि माईंच्या परात्पर गुरुदेवांवरील श्रद्धेमुळे अकस्मात् एक गुरुजी येऊन सोय होणे अन् त्यानंतर माईंना सोबतही मिळणे : एकदा परात्पर गुरु डॉक्टर आम्हा उभयतांना म्हणाले, ‘‘तुम्ही दोघेही आता वृद्ध झाला आहात. आता तुम्ही रामनाथी आश्रमात रहायला या.’’ त्यांच्या आज्ञेप्रमाणे आम्ही दोघे रामनाथी आश्रमात रहायला आलो. नंतर प्रतिवर्षी होणार्‍या श्रीरामनवमीच्या उत्सवासाठी आम्ही घरी गेलो होतो. त्या वेळी ४ मास आम्ही घरीच होतो. तेव्हा माई मला म्हणाल्या,‘‘आता आपल्याला इथे येऊन पुष्कळ दिवस झाले आहेत. आपण रामनाथीला जायला हवे.’’ त्यापूर्वी एक कुटुंब आमच्याकडे रहात होते; परंतु काही अडचणींमुळे ते सोडून गेले होते. त्यामुळे मी माईंना म्हणालोे, ‘‘इथे कोणी नाही. तर येथील पूजा इत्यादी सर्व कसे होणार ?’’ तेवढ्यात एक गुरुजी आले आणि त्यांच्यामुळे मंदिरातील पूजेची व्यवस्था झाली. मी माईंना म्हणालो, ‘‘पूजेची व्यवस्था झाली; पण तुम्ही इथे रहाणार, तेव्हा तुमच्यासमवेत कोण थांबणार ?’’ त्या म्हणाल्या, ‘‘मी इथे थांबते. तुम्ही आश्रमात जा. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे सर्व होईल. तुम्ही काळजी करू नका.’’ मी म्हणालो, ‘‘येथे तुम्ही एकट्या कशा रहाणार ?’’ त्यावर त्या म्हणाल्या,‘‘आतापर्यंत गुरूंनी सर्व पाहिले आहे, तर तेच सोय करतील.’’ तेवढ्यात एका साधिकेचा दूरभाष आला. तिन विचारले, ‘‘माई, मी एक मासासाठी तुमच्याकडे रहायला येऊ का ?’’ माई मला म्हणाल्या,‘‘पहा, केली ना गुरूंनी सोय ? आता तुम्ही लगेच रामनाथी आश्रमात जा.’’ त्याप्रमाणे मी रामनाथी आश्रमात आलो. त्यानंतर रामनगर येथील काही साधक बांधकामाच्या निमित्ताने तेथे आले आणि तेसुद्धा घराच्या बाजूला भाड्याच्या घरात राहिले. त्यामुळे माईंनाही सोबत मिळाली.

अशा प्रकारे भगवंतानेच सर्व काळजी घेतली. यासाठी मी परात्पर गुरु डॉक्टर आणि सौ. माई यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.

१०. पू. (सौ.) माईंची क्षात्रवृत्ती !

१० अ. अंथरुणात साप दिसल्यावर त्याकडे साक्षीभावाने न पहाता क्षात्रवृत्तीने त्याला मारण्यास सांगणार्‍या पू. (सौ.) माई ! : एकदा रात्री माई आणि मी झोपलो होतो. माई पायावर गोधडी घेऊन झोपल्या होत्या. पहाटे माई मला म्हणाल्या, ‘‘मला पायांवर काहीतरी आवळल्यासारखा स्पर्श होत आहे.’’ मी दिवा लावून पाहिले, तर तेथे एक मोठा सर्प होता. (‘पर्णकुटीवर नारळाच्या झाडाच्या झावळ्यांचे छत होते. त्यातून उंदीर येत असल्याने त्यांना पकडण्यासाठी साप आला असावा’, असे मला वाटले.) त्या सापाने माईंच्या पायाला विळखा घातला होता आणि तो त्यांना दंश करण्याचा प्रयत्न करत होता; परंतु माईंच्या अंगावरील गोधडीमुळे त्याला ते जमत नव्हते. मी माईंना पाय झटकायला सांगितले. त्यांनी तसे केल्यावर सापाचा विळखा सुटून तो बाजूला पडला. ते पाहून माई मला म्हणाल्या, ‘‘नुसते साक्षीभावाने काय पहाता ? त्याला मारा !’’ मी म्हणालो, ‘‘अगं, शंकर आपले कुलदैवत आहे. त्यामुळे मी सापाला कसे मारू ?’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘संकटकाळी साक्षीभावाने पहायचे नाही, हे ठाउक आहे ना ?’’ त्यानंतर मी त्या सापाला काठीने मारले. मी त्याला टाकण्यासाठी बाहेर घेऊन गेलो. तेव्हा तेथील धनगरांनी मला सांगितले, ‘‘हा ‘घोणस’ असून तो अतिशय विषारी असतो. बरे झाले तुम्ही याला मारले.’’

या प्रसंगात देवानेच आमचे रक्षण केल्यामुळे आम्ही त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

१० आ. अजगराच्या विळख्यात असलेल्या म्हशीला अजगर गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत असतांना माईंनी मारुतिरायाला प्रार्थना करून अजगराच्या विळख्यात शस्त्र घालून त्याचा विळखा सोडवणे आणि म्हशीची सुखरूप सुटका करणे : एकदा माई म्हशींना चरण्यासाठी वनात घेऊन गेल्या होत्या. संध्याकाळी घरी परत येतांना त्यातील एक म्हैस त्यांना दिसली नाही. त्यांनी तिची चारा घालण्याच्या वेळेपर्यंत वाट पाहिली, तरीही ती आली नाही. तेव्हा मी आणि माई आम्ही दोघे विजेरी घेऊन तिला शोधण्यास वनात गेलो. तेथे गेल्यावर आम्हाला म्हशीच्या ओरडण्याचा आवाज ऐकू  आला. आम्ही त्या दिशेने गेलो. तेव्हा आम्हाला विजेरीच्या प्रकाशात म्हशीचे मागचे दोन्ही पाय अजगराच्या विळख्यात असल्याचे दिसले. म्हैस स्वतःची सुटका करण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करत होती; पण तिला ते शक्य होत नव्हते. आम्हालाही ‘आता तिला कसे सोडवायचे ?’, असा प्रश्‍न पडला. नंतर आम्ही तसेच घरी आलो आणि मारुतिरायाला प्रार्थना केली, ‘तूच त्या म्हशीचे अजगरापासून रक्षण कर.’ रात्रभर आम्ही दोघे जागे राहून ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करत होतो. सकाळ झाल्यावर आम्ही लगेच वनात गेलो. आम्ही जातांना आमच्यासमवेत आश्रमातील त्रिशूलासारखे असलेले शस्त्र घेऊन गेलो. तेथे गेल्यावर आम्ही पाहिले की, तो अजगर म्हशीला गिळण्याचा प्रयत्न करत होता; पण श्री मारुतिरायाच्या कृपेने तो तिला गिळू शकला नव्हता. हे पाहून आम्ही श्री मारुतिरायाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनतर मी तिला सोडवण्यासाठी त्या शस्त्राने प्रयत्न करू लागलो. त्यावर माई म्हणाल्या, ‘‘नुसताच प्रयत्न करू नका. आधी प्रार्थना करून मग प्रयत्न करा !’’ असे म्हणून माईंनी माझ्या हातातून ते शस्त्र घेतले आणि त्या अजगराच्या वेटोळ्यात खुपसले. त्यामुळे अजगराचे वेटोळे सुटले आणि म्हैस लगेच धावत सुटली. ती आश्रमात तिच्या वासराकडे गेली.

अशा अनेक प्रसंगात माईंनी स्थिर राहून मला साहाय्य केले आहे.

११. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रमाणेच पू. (सौ.) माईंनी मार्गदर्शन करणे

वर्ष २००० मध्ये माझी प्रथमच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली. ते मला गुरुरूपात लाभले. तेव्हापासून ते मला मार्गदर्शन करतात. परात्पर गुरु डॉ. आठवले जसे मार्गदर्शन करतात, अगदी तसेच मार्गदर्शन माईही करतात. त्या दोघांच्या बोलण्यात काहीच भेद जाणवत नाही.

१२. प्रतिवर्षी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना राखी पाठवणे

प्रतिवर्षी मी मारुतिरायाला राखी बांधायचो. एकदा सौ. माई म्हणाल्या, ‘‘त्या दगडातल्या देवाला काय राखी बांधता ? प्रत्यक्ष स्थुलातल्या देवालाच म्हणजे, परात्पर गुरु डॉक्टरांनाच राखी बांधा !’’ तेव्हा मी म्हणालोे, ‘‘तूच त्यांना राखी बांध.’’ तेव्हापासून माई परात्पर गुरु डॉ. आठवले यांना राखी पाठवतात.

१३. पू. (सौ.) माई यांच्याविषयी संतांनी काढलेले गौरवोद्गार !

अ. परात्पर गुरु पांडे महाराज म्हणायचे, ‘‘माई साक्षात आदिशक्ती (सीतामाई) आहेत.’’ ते नेहमी दूरभाष केल्यावर माईंशी बोलतांना म्हणायचे, ‘‘लक्ष्मीम् नमस्कारम् ।’’

आ. परात्पर गुरु डॉक्टर नेहमी माझ्याशी बोलतांना प्रत्येक वाक्यात माईंचे पुष्कळ कौतुक करतात आणि म्हणतात, ‘‘तुम्ही माईंचे मार्गदर्शन घेत चला.’’

परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने माई आज ७१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभोे, हीच शुभेच्छा आणि श्री गुरुचरणी प्रार्थना !

– आपला चरणसेवक,

(प.पू.) दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.८.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF