कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांनी संग्रहित केलेल्या पुस्तकातील नारळाची उत्पत्ती, तसेच नारळी पौर्णिमेचे माहात्म्य यांविषयीची कथा !

आज नारळीपौर्णिमा आहे त्यानिमित्ताने …

प.पू. आबा उपाध्ये कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

१. नारळ हे नारदांचे फळ

मांगल्ये (टीप), नारळाला जरी श्रीफळ म्हणत असले, तरी प्रथम त्याचे नाव नारळच आहे. नारळ हे नारदांचे फळ आहे. नारदांचे फळ असल्यामुळे त्याला नारळ असे म्हटले आहे.

(टीप – पू. सदानंद स्वामी प.पू. आबा उपाध्ये यांच्या मुखातून ज्ञान देतांना कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांना मांगल्ये, असे उद्देशून देत असत.)

२. इंद्राने नारदांच्या ब्रह्मचर्याची कुचेष्टा करूनही नारद शांत रहाणे

एकदा इंद्राने नारदांच्या ब्रह्मचर्याची चेष्टा केली, अरे नारदा, तू जरी तिन्ही लोकांत फिरत असलास, तरी तू ब्रह्मचारी असल्यामुळे तुला पुत्रप्राप्ती नाही आणि तुझ्या सान्निध्यात स्त्री नसल्यामुळे, तसेच स्त्रियांना तुझा काहीच उपयोग नसल्याने त्या तुझी हेटाळणी करतील. अशा प्रकारे इंद्राने भर दरबारात नारदांची अनेक प्रकारे कुचेष्टा केली. नारद शांत प्रवृत्तीचे असल्याने इंद्राने त्यांंची चेष्टा केली, त्यांना शिव्या दिल्या, तरी ते शांतच राहिले. ते गंमत म्हणून दुसर्‍यांत लढत लावून द्यायचे; पण ते स्वतः प्रवृत्तीने शांतच होते. नारद म्हणाले, नारायण ! नारायण !

३. नारळाची उत्पत्ती आणि महत्त्व

३ अ. नारदांनी विष्णुदेवांकडे आशीर्वाद मागितल्यावर त्यांनी तथास्तु असे म्हणून तुला एक मंत्र देतो, असे सांगणे : इंद्राला वंदन करून मुनिराज (नारद) निघाले, ते थेट विष्णुदेवांकडे आले. त्यांनी ही कथा विष्णुदेवांना कथन केली आणि सांगितले, माझे ब्रह्मचर्य जसेच्या तसे राहून मला असा आशीर्वाद द्या की, स्त्रियांनी माझी हेटाळणी करू नये. मला कुठेही जाण्यास मोकळीक रहावी. स्त्रियांनी मला काही विचारले, तरी माझे ब्रह्मचर्य अबाधित रहावे, तसेच ब्रह्मचर्य असूनही माझे शुभाशीर्वाद पुत्रप्राप्ती होण्यास पात्र व्हावेत, म्हणजे इंद्राच्या हेटाळणीचे परिमार्जन होईल ! विष्णुदेव म्हणाले, तथास्तु ! मी तुला एक मंत्र देतो. तू सागर किनार्‍यावर जाऊन त्याची साधना कर आणि पहा काय चमत्कार होतो.

३ आ. नारदांनी जप केल्यावर सागर किनारी झाडाचे रोप उगवणे, विष्णुदेवांनी त्याचे नामकरण नारळाचे झाड असे करून त्याला येणारे फळ म्हणजे नारळ स्त्रियांच्या ओटीत घातल्यास त्यांना सद्गुणी पुत्राची प्राप्ती होईल, असा आशीर्वाद देणे : नारदांनी सागर किनार्‍यावर जाऊन विष्णुदेवांंची प्रार्थना केली आणि मंत्र जपण्यास आरंभ केला. मंत्राची साध्यता होते न होते, तोच नारदांनी डोळे उघडले, तर तेथे एका झाडाचे रोप उगवलेलेे दिसले. त्या वेळी विष्णुदेव प्रगट झाले आणि म्हणाले, नारदा, ही तुझी उत्पत्ती ! यातून निर्माण होणारे फळ म्हणजे ब्रह्मचर्य असूनही तुला झालेली पुत्रप्राप्ती आहे ! भगवान विष्णूंनी त्या झाडाचे नारळाचे झाड असे नामकरण केले. जे झाड उंच असते, ज्याच्या फांद्या सगळीकडे पसरतात आणि आपल्या खोडाकडेही लक्ष देतात, अशा झाडाला जे फळ आले, त्याचे नाव नारळ होय. विष्णूंनी या फळाला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, पुत्रप्राप्तीसाठी स्त्रियांच्या ओटीत हे फळ पडेल. ब्रह्मचर्य कायम राहून तुझे हे फळ स्त्रियांच्या ओटीत घातल्याने त्यांना पुत्रप्राप्ती होईल. ही पुत्रप्राप्ती सशक्त होईल; कारण नारळाचे कवच कठीण असते आणि त्याची शेंडी ज्ञानार्जनासाठी उभी असते. पुत्र सशक्त, म्हणजे कवचाप्रमाणे कठीण असला, तरी नारळाच्या आतील भागाप्रमाणे त्याच्या हृदयात प्रेम आणि रसाळपणा असेल. त्याच्या अंगात धमक असेल, म्हणजे पाणी असेल; परंतु धमक असली, तरी तो शक्तीचा दुरूपयोग न करता सुस्वभावाने वागेल किंवा पाण्याप्रमाणे गोडी राखेल. स्त्रियांना असा (नारळाप्रमाणे) अनेक गुणांचा पुत्र होईल !

मांगल्ये, ते फळ नारदाचे असून अशा प्रकारे त्याची उत्पत्ती झाली आहे. ही कथा पोथ्या आणि पुराणे यांतून मिळायची नाही.

३ इ. विष्णुदेवांनी नारदांना नारळ श्री महागणपतीपुढेे ठेवण्यास सांगून तो जगन्मान्य होण्यासाठी त्याचे नामकरण श्रीफळ असे होणे आवश्यक आहे, असे सांगणे : नंतर विष्णुदेवांनी नारदांना सांगितले, जो जगाला ज्ञान देतो आणि ज्या ज्ञानावर आणि बुद्धीमत्तेच्या आधारे जग चालते, त्याचा आद्यप्रवर्तक श्री महागणपति याच्या पुढेे प्रथम ते फळ ठेव. तुझा पुत्र प्रथम गजाननाच्या समोर ठेव, म्हणजे ते फळ जगात श्रीफळ म्हणून संबोधले जाईल. श्रींची पूजा जगन्मान्य होणार असल्याने त्याचे फळ म्हणून प्रत्येक जण त्याचा स्वीकार करील. नाहीतर एका ब्रह्मचार्‍याचे फळ ओटीत घेऊन पुत्रप्राप्ती कशी होणार ?, असा प्रश्‍न सर्वांना पडेल. कालांतराने पुढील पिढ्यांतील ढुढ्ढाचार्य (महाविद्वान) आपल्या ज्ञानाची हुशारी जगापुढे मांडतील आणि जगालाही पटेल की, नारळ हे नारदाचे फळ आहे. त्याचा पुत्र आहे. मानवजातीला नारळ एका ब्रह्मचार्‍याचा पुत्र आहे, असे समजले, तर ते त्याचा अव्हेर करतील; म्हणून ते श्रींपुढे ठेवून त्याचे नामकरण श्रीफळ असे होणे आवश्यक आहे.

३ ई. इंद्राने दैत्यांना केलेल्या आज्ञेनुसार त्यांनी नारळाची झाडे मुळासकट उपटून ती सागरात टाकणे आणि निमिषार्धात क्रोधित झालेल्या सागराने रौद्र रूप धारण करून दैत्यांना नारळाचे महत्त्व सांगून ती किनार्‍यावर नेऊन ठेवण्यास सांगणे : नारळाचे महत्त्व वाढू लागले, तसे इंद्राने दैत्यांवर एक पराणी (टोचणी) लावून दिली, त्या नारळाचे महत्त्व वाढण्यापूर्वी, तसेच त्याचे बीज फैलावण्यापूर्वीच वाढलेली झाडे सागरात फेकून द्या. इंद्राला आपले शब्द खरे करायचे होते. मोकाट सुटलेले दैत्य वाढलेली नारळाची झाडे मुळासकट उपटून सागरात टाकू लागले; पण निमिषार्धातच सागर खवळला. त्याने आपली सीमा सोडून दैत्यांसमोर रौद्र रूप धारण केले आणि वाणी उच्चारली, विष्णुदेवांच्या आशीर्वादाने माझ्या तिरावर उत्पन्न झालेले नारदाचे पुत्र, म्हणजे नारळ हे फळ असून ते विष्णुदेवाप्रमाणे शांत रसाचे फळ आहे. शक्ती असूनही समता साधणारे असे फळ नामशेष झाले, तर इंद्राचे आसनसुद्धा डळमळीत होईल. झाडे जशी फेकली आहेत, तशी ती किनार्‍यावर आणून ठेवा. दैत्यांनी ती झाडे किनार्‍यावर आणून ठेवली. त्यानंतर सागराच्या आशीर्वादाने त्यांची अनंत झाडे झाली.

नंतर सागर विष्णुदेवांना म्हणतो, मी शांत आहे; परंतु मी भगवान शंकरांप्रमाणे तापटही आहे. भगवान विष्णुदेवा, हे वृक्ष माझ्याच तिरावर ठेवले, तर माझा तामसी स्वभाव शांत होऊ शकेल !

४. नारळी पौर्णिमेला सागराला नारळ अर्पण करण्याचे महत्त्व

हा प्रसंग ज्या दिवशी घडला, तो दिवस म्हणजे नारळी पौर्णिमा; म्हणून या पौर्णिमेला सागराला शांतीसाठी नारळ अर्पण केला जातो. नारळाची महती मोठी आहे. नारदांप्रमाणे नारळालाही शेंडी असते. ब्राह्मणांनी शेंडी ठेवली. डोक्यातील मूळ ज्ञानाचा पिंड शेंडीच्या मुळाशी असतो. नारदांची शेंडी ब्रह्मज्ञानासाठी उभी असते.

अशा प्रकारे स्त्रियांच्या ओटीत नेहमी नारळ घालतात. श्री गणेशाला प्रिय असलेल्या मोदकांत नारळाचेच सारण असते आणि मोदकाचा वरचा भागही शेंडीप्रमाणेच असतो. अशा प्रकारे सर्व साम्य पाहिले की, मन निश्‍चितच आश्‍चर्यचकित होते.

– प.पू. आबा उपाध्ये (संदर्भ : अमृतवाणी – भाग १ (श्री सदानंद स्वामींनी कथन केलेल्या उपदेशपर गोष्टी))


Multi Language |Offline reading | PDF