महापुराचा फटका कोणाच्या चुकीमुळे ?

पश्‍चिम महाराष्ट्रात अतीवृष्टीमुळे कृष्णा, पंचगंगा आणि वारणा यांसह कोल्हापूर अन् सांगली जिल्ह्यांतील अन्य नद्यांना महापूर आला. त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर शहरांसह या दोन्ही जिल्ह्यांतील ग्रामीण भागातील काही गावांत महापुराचे पाणी शिरल्याने सर्वत्र हाहाकार माजून भयावह परिस्थिती निर्माण झाली. हा महापूर केवळ निसर्गनिर्मितच आहे का ? याविषयी अनेकांनी केलेला अभ्यास आणि त्याविषयी मांडलेले विचार येथे देत आहोत. यातून एखादी घटना घडते तेव्हा त्याच्या मागे कोणकोणती कारणे असतात आणि त्या सर्वच कारणांचा अभ्यास करणे अन् त्यानुसार उपाययोजना काढणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते.

वर्ष १९५३, १९८३ आणि २००५ मध्येही महापूर आला होता.  महाबळेश्‍वरमध्ये कृष्णा नदीचा उगम आहे. महाबळेश्‍वर ते कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीजवळील दाजीपूरपर्यंतच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांतून २४ नद्यांचा उगम होतो. त्यांपैकी बहुतांश नद्यांवर धरणे आहेत. त्यांची साठवण क्षमता अनुमाने २१० टीएम्सी आहे. या सर्व नद्यांचा संगम होऊन शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथे सर्व पाणी जमा होते. नृसिंहवाडी येथे कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम होतो. तेथून कृष्णा नदी कर्नाटकात वहाते. या सर्व भागात अनेक ठेकेदारांनी शासकीय नियम पायदळी तुडवत नद्यांच्या पात्रातील वाळू उपसा मोठ्या प्रमाणात केल्याने नद्यांचे निसर्गचक्र बिघडले आहे. काही ठिकाणी गाळ साठला आहे. नद्यांची पात्रे अरुंद झाली आहेत आणि नद्यांच्या पात्रापर्यंत शेतभूमी सिद्ध करून उसाची शेती नदीकाठापर्यंत करण्यात आली आहे. त्याच्या परिणामामुळे नद्यांच्या पात्रात पाणी अल्प आणि उभ्या पिकांमध्ये अधिक अशी अवस्था झाली आहे. नद्यांच्या पूरनियंत्रण रेषेत झालेली अवैध बांधकामे, धरणांचे अतिरिक्त पाणी एकाच वेळी सोडावे लागण्याचे संकट, नद्यांच्या रचनांमधील फेरपालट, नद्यांवरून जाणार्‍या रस्त्यांमुळे अडणारे पाणी आदी मानवी चुका आहेत. या कारणांमुळे महापुराची तीव्रता गंभीर झाली. अल्प कालावधीत पडणारा अधिक पाऊस, धरणे क्षमतेपेक्षा अधिक भरणे आणि पाणलोट क्षेत्राच्या बाहेर पडणार्‍या पावसाच्या पाण्याचा समावेश करून घेण्यास जागा नसणे हेही कारण आहे.

गतवेळच्या महापुराची तीव्रता, त्याचे परिणाम आणि निर्माण होणारे धोके सर्वांना माहीत होते. त्यानुसार पूर क्षेत्रातील संबंधित गावांना कधी आणि कोणत्या सूचना त्यांच्यापर्यंत कशाप्रकारे पोचवायच्या याचे नियोजन होणे आवश्यक होते. तसेच त्या गावातील लोकांना येणार्‍या अडचणींनुसार काय उपाययोजना काढायला हवी, याचेही वस्तूनिष्ठ नियोजन होणे ही गरजेचे होते.

महापूरानंतर चुका कोणाच्या याचा विचार करण्यासमवेतच चुकांवर उपाययोजना काढणे, त्याचा आढावा घेणे आणि परत अशा प्रकारच्या चुका होऊ नयेत, याची काळजी घेणे आवश्यक आहे. आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी याचे सर्व स्तरांवरील प्रशिक्षण नागरिक, शासन, प्रशासन यांना देणे आवश्यक आहे, हेच लक्षात येते.

– श्री. सचिन कौलकर, सांगली


Multi Language |Offline reading | PDF