१४ ऑगस्ट : काळा दिवस !

संपादकीय

आज १४ ऑगस्ट ! पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन, तर भारतासाठी काळा दिवस ! देशाच्या स्वातंत्र्यासाठी लक्षावधी स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतीकारक यांनी बलीदान दिले. यात सर्वाधिक संख्या हिंदूंची होती, तर मूठभर मुसलमान होते, तरीही त्यांना त्यांचा वेगळा देश तत्कालीन जन्महिंदू असणार्‍या राष्ट्रघातकी काँग्रेसी नेत्यांमुळे देण्यात आला. यासाठी त्यांनी १० लाखांहून अधिक हिंदूंचे प्राण घेतले, तर लक्षावधी हिंदु महिलांना बलात्काराच्या खाईत ढकलले. त्यामुळेच १४ ऑगस्ट भारतासाठी काळा दिवस आहे आणि प्रत्येक वर्षी तो भारताने अन् हिंदूंनी काळा दिवस म्हणून पाळायला हवा ! जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७० रहित करून त्याचे दोन भागांत विभाजन आणि ते केंद्रशासित प्रदेश करण्यात आल्यावर संतापलेल्या पाकिस्तानने भारताची अन्य काही हानी करता येत नसल्याने भारताचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट काळा दिवस म्हणून घोषित केला आहे. पाकने केले; म्हणून आपण त्याचा स्वातंत्र्यदिन काळा दिवस घोषित करायला हवे, असे नाही, तर मुळातच भारतासाठी हा दिवस खर्‍या अर्थाने काळा दिवस असल्याने त्याकडे तसेच पाहिले गेले पाहिजे.

अत्याचार आठवा !

पाक भारतातून फुटून निघण्यापूर्वी म्हणजे महंमद अली जिना यांनी पाकिस्तानची मागणी केल्यापासून आणि त्यांनी डायरेक्ट अ‍ॅक्शन म्हणजे हिंदूंवर आक्रमण करण्याचा आदेश दिल्यापासूनच पाकिस्तान भारतासाठी अत्याचारी देश ठरला. त्याला मूर्त रूप १४ ऑगस्टला मिळाले, त्यामुळे त्याला काळा दिवस म्हटले पाहिजे. १४ ऑगस्ट १९४७ पासून आतापर्यंत पाकने भारताविरोधी केलेल्या कृती पहाता हा दिवस भारतासाठी काळा दिवसच ठरतो. भारताने आता पाकच्या विरोधात आक्रमक धोरण राबवणे चालू केले आहे. अशा वेळी पाकला मानसिक स्तरावर खच्ची करण्यासाठी सरकारने १४ ऑगस्टला काळा दिवस म्हणून जनतेला पाळायला सांगायला हवे. सरकारने आदेश दिला नाही, तरी हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी तसे केले पाहिजे. यातून भारतीय जनता आणि हिंदू यांना सतत लक्षात राहील की, पाकने भारतावर आणि हिंदूंवर किती अत्याचार केलेले आहेत अन् याचा सूड घेणे कसे आवश्यक आहे. या दिवशी पाकच्या प्रत्येक अत्याचाराची माहिती देणारी प्रदर्शने लावायला हवीत. सामाजिक माध्यमांतून याविषयी प्रसार केला पाहिजे. पाकला नष्ट केल्यानंतरच पाकविषयीचा सूड पूर्ण होईल आणि काँग्रेसने केलेली चूक सुधारता येईल, हे हिंदूंच्या मनावर बिंबवले पाहिजे. जो इतिहास विसरतो, त्याचे भविष्य आणि भूगोलही पालटतो, हे नेहमीच लक्षात ठेवायला हवे. भारताने किंवा भारतातील राष्ट्रघातकी राजकीय नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आजही पाकपुरस्कृत आतंकवाद्यांच्या सावटाखाली भारताचा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन साजरा करावा लागतो. काश्मीर भारतात रहावा आणि तेथे शांतता रहावी; म्हणून १ लाखाहून अधिक सैन्य तैनात ठेवावे लागते. पाकचा नायनाट केल्यावर हे थांबणार आहे.

पूर्ण विजय दिवस हवा !

पाक आताही भारताच्या विरोधात कृती करत आहे. कलम ३७० रहित केल्या नंतर पाकने चालू केलेल्या थयथयाटाला कोणत्याही देशाने भीक घातलेली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाणे खणखणीत असल्याचे पहिल्यांदाच दिसून आले आहे. याला पालटती आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि भाजप सरकारची नीती कारणीभूत आहे. तसेही हा भारताचा अंतर्गत प्रश्‍न आहे. त्यामुळे अन्य देशांना या विरोधात बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. भारताच्या विरोधात कोणी बोलले असते, तर भारतालाही त्या देशांच्या अंतर्गत गोष्टींत बोलण्याचा अधिकार मिळाला असता. चीनने भारताला थेट विरोध केलेला नाही, यामागेही हेच कारण आहे; कारण चीनचे हातही दगडाखाली आहेत. मग ती शिनजियांग येथील मुसलमानांवरील दडपशाही, तिबेटी लोकांवरील अत्याचार, हाँगकाँगमधील परिस्थिती आदी गोष्टी चीनच्या विरोधात जाणार्‍या आहेत. अमेरिकाही यामध्ये पडू इच्छित नाही. त्याला अफगाणिस्तानची चिंता आहे. संयुक्त राष्ट्र संघ अमेरिकेच्या तालावर नाचतो. त्यामुळे त्यानेही पाकला भीक घातली नाही. इस्लामी देशही पाकच्या बाजूने नाहीत आणि हे सर्व आता पाकने मान्य केलेले आहे. त्याने त्यांच्या जनतेला या परिस्थितीत स्वतःच लढायला हवे, असे म्हटले आहे. त्यामुळे या स्थितीचा आता भारताने लाभ घेतला पाहिजे. कदाचित् भाजप सरकारने तसा विचार केलाही असेल. पाकव्याप्त काश्मीर पाकच्या कह्यातून मुक्त करण्यासाठी याहून चांगली संधी यापूर्वी नव्हती. त्याचा आता लाभ उठवून सैनिकी कारवाई केली पाहिजे. भारताचे अंतिम लक्ष्य १४ ऑगस्टचा काळा दिवस कायमचा पुसून टाकणे हेच असले पाहिजे. त्यासाठी पहिले पाऊल पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेणे हेच असेल. वर्ष १९७१ मध्ये भारताने पाकचे दोन तुकडे करून बांगलादेश नावाचा नवीन देश निर्माण केला आहे. त्यामुळे भारताला हा काळा दिवस पुसणे कठीण जाणार नाही. भारत वर्ष १९७१ चे आणि कारगिलचे युद्ध जिंकल्यासाठी तो दिवस पराक्रम दिवस अन् विजय दिवस म्हणून साजरा करत असतो. आता ही युद्धे लहान ठरतील, असा पाकचा संपूर्ण निःपात झाल्याचा एकच दिवस साजरा करण्यात येईल, असे प्रयत्न केले पाहिजेत. असे केले, तर पाकवरून मुसलमानांचे लांगूलचालन करणारी काँग्रेस आणि तिचे नेते यांनाही मोठा झटका बसणार आहे. पाकच्या जिवावर भारतात जिहादी मानसिकतेमध्ये वावरणार्‍या धर्मांधांनाही चाप बसेल. त्यांच्या कुरापती थांबतील. इस्लाम खतरे में हैं ।च्या घोषणा बंद होतील. मशिदींमधून हिंदूंवर होणारी आक्रमणे थांबतील; म्हणजे अंतर्बाह्य स्थितीत पालट होईल. या दिवसाची भारतीय आतुरतेने वाट पहात आहेत, असेच म्हणावेसे वाटते.


Multi Language |Offline reading | PDF