मक्के इतकीच हिंदूंना अयोध्या महत्त्वाची ! – रामललाचे अधिवक्ता

रामजन्मभूमीविषयी सर्वोच्च न्यायालयातील नियमित सुनावणी

नवी देहली – ७२ वर्षीय महंमद हाशिम यांनी या खटल्यात साक्ष देतांना सांगितले होते, मुसलमानांसाठी मक्का जितकी महत्त्वाची आहे, तितकीच हिंदूंसाठी अयोध्या महत्त्वाची आहे. रामजन्मभूमीचे नियंत्रण मुसलमान पक्षकारांकडे आहे किंवा पूर्वापार नियंत्रण आहे, असे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नाहीत. जर कोणत्याही स्थानालाच देवता मानण्यात येत असेल, तर त्यांची श्रद्धा मानली पाहिजे, असा युक्तीवाद रामललाचे अधिवक्ता एस्.सी. वैद्यनाथन् यांनी सर्वोच्च न्यायालयात केला. यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्याच एका निकालाचा आधार घेऊन सांगितले की, मंदिरामध्ये मूर्ती असणे आवश्यक नाही. हाच भाग रामजन्मभूमीविषयीची श्रद्धा स्पष्ट करते.

१. वैद्यनाथन पुढे म्हणाले, मशिदीपूर्वी रामजन्मभूमीवर मंदिर होते. तेथे पूर्वी असणारी मशीद बाबरने बनवली, याचे कोणतेही पुरावे नाहीत. मुसलमान पक्षकारांनी दावा केला होता की, ४३८ वर्षांपासून या भूमीचा अधिकार त्यांच्याकडे आहे. तथापि अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांचा हा युक्तीवाद फेटाळला होता.

२. स्वतः न्यायाधीश अशोक भूषण या वेळी वैद्यनाथन् यांच्या सूत्राला दुजोरा देतांना म्हणाले की, वनवासाला जाण्यापूर्वी भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि सीता चित्रकूटमध्ये थांबले होते. त्यामुळे भाविक येथील कामदगिरीला प्रदक्षिणा घालतात.

३. रामलला विराजमानच्या वतीने के. परासरन् म्हणाले की, हे प्रकरण कोणत्याही कारणाने टाळायला नको. जर एखाद्या अधिवक्त्याने हा खटला हातात घेतला आहे, तर त्याने तो पूर्ण होईपर्यंत थांबले पाहिजे. त्या काळात दुसरा कोणताही खटला घेऊ नये.


Multi Language |Offline reading | PDF