माजी पोलीस महासंचालक एस्.एम्. मुश्रीफ यांच्या ब्राह्मणद्वेषी पुस्तकाला वैध मार्गाने विरोध करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांनी कह्यात घेतले

हिंदुत्वनिष्ठांना कह्यात घेणार्‍या पुणे पोलिसांचा उफराटा (अ)न्याय ! हिंदूंवर होणार्‍या या अन्यायाविषयी तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी आणि पुरो(अधो)गामी बोलणार नाहीत; कारण त्यांच्या दृष्टीने हिंदुद्वेषी लिखाण करून हिंदुविरोधी प्रचार करणे हीच धर्मनिरपेक्षता आहे !

पुणे, १३ ऑगस्ट (वार्ता.) – राज्याचे माजी पोलीस महासंचालक एस्.एम्. मुश्रीफ यांनी ब्राह्मनिस्ट बॉम्बड, मुस्लिम्स हँग्ड (ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुसलमान लटकले) नावाचे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकाच्या नावावरूनच यात पराकोटीचे विखारी लिखाण असल्याचे दिसून येते. शहरातील विविध हिंदुत्वनिष्ठ आणि ब्राह्मण संघटनांनी या पुस्तकाला अन् त्याच्या प्रकाशन कार्यक्रमाला वैध मार्गाने विरोध दर्शवला होता. या वादग्रस्त पुस्तकाचे प्रकाशन येथे १३ ऑगस्टला करण्यात आले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे, मयुरेश अरगडे हे कार्यक्रमस्थळी आले होते; मात्र त्यांना आत जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला आणि कह्यात घेतले.

कार्यक्रमाला जाऊ देण्यात द्यावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना कह्यात घेतांना त्यांनी भारतमाता की जय, वन्दे मातरम् अशा घोषणा दिल्या.

याविषयी श्री. आनंद दवे म्हणाले, आम्हाला दिलेल्या नोटिसीमध्ये जमावबंदी किंवा मोर्चा यांना अनुमती नाकारली होती; पण आम्ही या कार्यक्रमाला येऊ नये, असा उल्लेेख कोठेच नव्हता. तरीही पोलिसांनी आम्हाला तेथून बळजोरीने डेक्कन पोलीस ठाण्यात आणले. भगवा आतंकवाद नावाची गोष्ट अस्तित्वात नाही; पण आज विकृत लिखाण करणार्‍यांच्या संरक्षणासाठी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना त्रास दिला गेला. हे दुर्दैवी आहे.

या पुस्तकाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या होत्या, तसेच आयुक्तालयात पोलिसांशीही चर्चा करून विरोधामागची कारणे स्पष्ट केली होती. एकंदरीत जातीयवादी पुस्तकाला असणारा वाढता रास्त विरोध पाहून हा कार्यक्रम रहित करण्यात येईल, अशी हिंदुत्वनिष्ठांची अपेक्षा होती; मात्र तसे न होता वैध मार्गाने विरोध करणार्‍यांनाच पोलिसांनी कलम १४९ ची नोटीस पाठवून कोणत्याही प्रकारचे विनापरवाना आंदोलन किंवा निदर्शने करण्यावर बंदी घातली. आपल्या न्यायिक मार्गांचा अवलंब करून मागण्यांसाठी न्यायालयात दाद मागावी, असा सल्लाही पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांना दिलेल्या नोटिसीत दिला आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे श्री. आनंद दवे, श्री. मयुरेश अरगडे, ब्राह्मण जागृती सेवा संघाचे श्री. अंकित काणे यांना ही नोटीस मिळाली आहे. त्यामुळे सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये या संपूर्ण प्रकाराचा निषेध व्यक्त होत आहे. (पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानी असणार्‍या शहरात अशा जातीयवादी आणि विखारी कार्यक्रमांचे आयोजन होणे अन् त्याला वैध मार्गाने विरोध करणार्‍यांना नोटिसा देणे, हे अनाकलनीयच आहे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF