पूरग्रस्त भागाच्या पुनर्वसनासाठी केंद्रशासनाकडे ६ सहस्र ८०० कोटी रुपयांची मागणी ! – मुख्यमंत्री

मुंबई – राज्यातील पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या गावांच्या पुनर्वसनासाठी राज्यशासनाने कोल्हापूर, सांगली आणि सातारा अशा एका भागासाठी ४ सहस्र ७०० कोटी, तर उर्वरित भागासाठी २ सहस्र १०० कोटी रुपये असा ६ सहस्र ८०० कोटी रुपयांचा निधी केंद्रशासनाकडे मागितला आहे, अशी माहिती १३ ऑगस्ट या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिली.

या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, पूरस्थितीत केंद्रशासनाकडे जे साहाय्य मागितले, ते उपलब्ध करून देण्यात आले. पुरात मोठ्या प्रमाणात जनावरे मृत पावली आहेत. पोलीस पाटील किंवा सरपंच यांनी याविषयी दिलेली माहिती ग्राह्य धरून हानीभरपाई देण्यात येईल. समयमर्यादा निश्‍चित करून पूरग्रस्त भागाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. यासाठी विविध खात्याचे मंत्री वेळोवेळी त्या ठिकाणी उपस्थित असतील. पुनर्बांधणी करण्यासाठी एक विशेष तज्ञ समिती सिद्ध करण्यात येणार असून लवकरच नावे निश्‍चित करण्यात येतील. पूरग्रस्त भागांत साहाय्य करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती आवश्यक ते निर्णय घेईल.


Multi Language |Offline reading | PDF