बुडत्या जहाजाचा कप्तान

संपादकीय

काँग्रेस नामक बुडत्या जहाजाचे कप्तानपद हंगामी का होईना एकदाचे कोणाच्या तरी गळ्यात पडले. जनतेत कितीही छीःथू होत असली, तरी काँग्रेसींनी घराणेशाहीची परंपरा कायम ठेवत हंगामी अध्यक्षपदाची माळ सोनिया गांधी यांच्या गळ्यात घातली. लोकसभेच्या निवडणुकीत सलग २ वेळा सपाटून मार खाल्यानंतर काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाची पुरती वाताहत झाली. त्यानंतर निवडणुकीतील पराभवाचे दायित्व स्वीकारत पक्षाचे नुकतेच अध्यक्ष झालेले राहुल गांधी यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र दिले. व्यक्तीनिष्ठेमध्ये आकंठ बुडालेल्या अनेक काँग्रेसींनी मग लगोलग त्यांच्या पदाची त्यागपत्रे देऊन राहुल यांनीच अध्यक्षपदी रहावे, यासाठी गळ घातली; पण अध्यक्षपद नाकारण्याची हूल खरी करण्यात राहुल सध्या तरी उत्तीर्ण झाले. मध्यंतरीच्या २ मासांच्या काळात काँग्रेसची स्थिती निर्नायकी होती. अध्यक्षपदासाठी कोणी गांधीपुत्री प्रियांका वाड्रा यांचे नाव सुचवले, तर सुशीलकुमार शिंदे, मल्लिकार्जुन खरगे, अशोक गेहलोत, जनार्दन द्विवेदी, मुकुंद वासनिक आदींच्या नावांचाही विचार झाला; पण कोणत्याच नावावर एकमत होऊ शकले नाही. ज्या नावांचा अध्यक्षपदासाठी विचार झाला, त्यांची ओळख राष्ट्रीय स्तरावर नव्हती, तर केवळ राज्यपातळीवर होती. त्यांच्यापैकी अनेकांचे कार्यक्षेत्र मोदींच्या लाटेत बर्‍यापैकी आकुंचन पावले होते. गांधी वगळता अन्य कोणा व्यक्तीचे नेतृत्व स्वीकारण्यास कार्यकर्ते, नेते सिद्ध नाहीत आणि राष्ट्रीय नेतृत्व करू शकणारी फळीही काँग्रेसकडे नाही, हे काँग्रेस अस्ताकडे वाटचाल करत असल्याचे एक लक्षण आहे. याचे कारण काँग्रेसमध्ये असलेल्या वैचारिक बैठक, सिद्धांत अन् धोरणे यांच्या अभावामध्ये आहे. वास्तविक वर्ष २०१४ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लाजिरवाणा पराभव पदरी पडल्यानंतर काँग्रेसने पराभवाच्या कारणांचे खोलात जाऊन चिंतन करायला हवे होते; पण दारुण पराभव होऊनही काँग्रेसी नेते आत्मपरीक्षण करण्याऐवजी मतदानयंत्रामध्ये (इव्हीएम्) त्यांच्या पराभवाचे कारण धुंडाळत होते.

राष्ट्रघातकी धोरणांचा परिपाक

देशाला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये काँग्रेसचे काही प्रमाणात का होईना योगदान होते; मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा सत्ता गांधी-नेहरू घराण्याकडे आली, तेव्हा त्यांनी सत्तेचा प्रचंड अपवापर केला. सत्ता, स्वार्थ आणि पैसा यांसाठी राष्ट्रहिताशी अक्षम्य तडजोड केली. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केला. इतका की, भ्रष्टाचाराचे दुसरे नाव काँग्रेस पडावे. या भ्रष्टाचार्‍यांवर पक्ष कार्यकारिणीने कठोर कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. जेथे पक्षातील वरिष्ठांचे हातच बरबटले होते, तेथे कारवाई तरी कोणी आणि कोणावर करायची ? या भ्रष्टाचारांच्या नवनव्या प्रकरणांपोटी काँग्रेसला वर्ष २०१४ मध्ये सत्ता गमवावी लागली; पण काँग्रेसला जाग आली नाही. वर्ष २०१९ मध्ये काँग्रेसने पराभवाचा अजून एक इतिहास रचला. सत्ताच्युत झाल्याने सैरभैर झालेल्या काँग्रेसींची दशा आणि दिशा त्यानंतर अजूनच भरकटली. मोदी आणि भाजप यांचा विरोध, हाच त्यांच्या पक्षाचा एककलमी कार्यक्रम झाला. त्यातून स्वतःच्याच पक्षाच्या विचारांना हरताळ फासला जात आहे, याचेही त्यांना भान नव्हते. उद्या चुकून मोदी आणि शहा यांनी काँग्रेसविषयी चार कौतुकाचे शब्द काढले, तर ते कसे चुकीचे आहेत, हे सिद्ध करायला काँग्रेसीच सरसावतील; कारण भाजपविरोधी बोलायचे, असा त्यांनी जणू चंगच बांधला आहे. नुकत्याच रहित करण्यात आलेल्या ३७० कलमाच्या संदर्भातही त्याचे प्रत्यंतर आले. वास्तविक कलम ३७० रहित करण्यास पूर्वीच्या काळी काँग्रेसमधील काही अपवाद वगळले, तर कोणाचा विरोध नव्हता; पण भान हरपलेल्या काँग्रेसींनी कलम ३७० रहित केल्यानंतर थयथयाट चालू केला. त्यांच्या पक्ष बैठकीमध्ये अखेर काहींनी राष्ट्रहिताची भूमिका घेऊन पक्षभूमिकेच्या विरोधात जाऊन कलम ३७० रहित करण्याचे समर्थन केले. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार भुवनेश्‍वर कलिता यांनी त्यासाठी काँग्रेसचे त्यागपत्रही दिले. कलम ३७० रहित करण्याला विरोध करून काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे, असाच संदेश जनतेत गेला. हे म्हणजे काँग्रेसने स्वतःहून तिची कबर खणण्यासारखे होते. ज्यांना देशहित आणि देशवासियांची मनोभूमिका यांचा अंदाज येत नाही, ते पक्ष काय चालवणार ? जे स्वतःचा पक्ष चालवू शकत नाहीत, ते राष्ट्र काय चालवणार ? विनाशकाले विपरीतबुद्धिः । म्हणतात, ते असे ! गोहत्याबंदी कायद्याच्या संदर्भातही तिची भूमिका १८० अंशाच्या कोनातून फिरवली. काँग्रेसींना परमश्रद्धेय असणार्‍या मोहनदास गांधी यांनी भारत स्वतंत्र झाल्यावर देशात गोहत्याबंदी कायदा लागू करण्याची मागणी केली होती; पण काँग्रेसने ती पूर्णपणे धुडकावून लावली. उलट गोहत्या करणार्‍यांचीच मखलाशी केली. अस्तित्वात नसलेल्या भगव्या आतंकवादाचा बागुलबुवा निर्माण केला. सर्जिकल स्ट्राईकचेही तसेच ! काही काँग्रेसींनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले, तर काही जण आमच्या काळातही आम्ही तो केला होता, असे म्हणून बालिशपणा करत होते. राष्ट्रहितैषी धोरणे नसल्याचेच हे दुष्परिणाम होते, जे निवडणुकांमध्येही दिसून आले. ज्या पक्षाला वैचारिक अधिष्ठान नाही, तो पक्ष काही काळ फोफावला, तरी तग धरू शकत नाही.

त्यामुळे सोनियांना काँग्रेसला खरेच पुनरुज्जीवित करायचे असेल, तर वैचारिक परिवर्तन करून राष्ट्र आणि हिंदु धर्म हितैषी धोरणे आपलीशी करावी लागतील. देशातील जनता आता निर्बुद्ध नाही, यावर विश्‍वास ठेवावा लागेल. त्यामुळे काँग्रेस का हाथ, गरिबों के साथ वगैरे घोषणा देऊन जनतेच्या डोक्यावर टपली मारता येणार नाही, हे लक्षात घ्यावे लागेल. याच घोषणेचे आधुनिक रूप म्हणून वर्ष २०१९ च्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी प्रत्येकाच्या खात्यात ७२ सहस्र रुपये जमा करण्याचे आश्‍वासन दिले होते; पण जनता त्याला भुलली नाही. काँग्रेस आता अंतर्मुख होऊन काही पालट करेल, याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे अशा काँग्रेसचे विसर्जन करून गांधींचे स्वप्न साकार केले, तर किमान गांधींच्या आत्म्याला तरी समाधान लाभेल. त्यातच देशाचे हित आहे.


Multi Language |Offline reading | PDF