आध्यात्मिक संशोधन केंद्राच्या वास्तूमध्ये करण्यात आलेली श्री गणेशपूजा आणि पंचगव्य हवन यावेळी एस्.एस्.आर्.एफ्.चे सद्गुरु अन् साधक यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

रामनाथी आश्रम परिसरात बांधण्यात आलेल्या नूतन वास्तूमध्ये आध्यात्मिक संशोधन केंद्र चालू करण्यात आले आहे. या नूतन वास्तूमध्ये करण्यात आलेली गणेशपूजा आणि पंचगव्य होम या वेळी एस्.एस्.आर्.एफ्.चे संत आणि साधक यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

आध्यात्मिक संशोधन केंद्रातील वास्तूमध्ये पुरोहित श्री. अमर जोशी (उजवीकडे) यांनी पूजन केल्यावर श्री गणेशाला फूल वाहतांना सद्गुरु सिरियाक वाले

एस्.एस्.आर्.एफ्.चे सद्गुरु सिरियाक वाले यांना आलेल्या अनुभूती

सद्गुरु सिरियाक वाले

१. हवनाला आरंभ झाल्यावर आलेल्या अनुभूती

अ. श्री गणेशपूजा आणि पंचगव्य हवन करण्यात आले, त्या वेळी एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक आणि सद्गुरु (सौ.) बिंदाताई उपस्थित होत्या. हवनाला आरंभ झाल्यावर मी ध्यानावस्थेत गेलो आणि माझे स्थळ काळाचे भान हरपले.

आ. सद्गुरु बिंदाताईंना फुले वाहतांना पाहून परात्पर गुरुदेव साधकांना किती भरभरून देत आहेत, असा विचार मनात येऊन माझी भावजागृती झाली.

इ. या वास्तूमध्ये संपूर्ण जगातील साधक येतील. ही वास्तू त्यांच्या साधनेला मार्गदर्शन करणारे प्रमुख केंद्र बनेल. ते येथे साधना करून आध्यात्मिक उन्नती करून घेतील, संतपद प्राप्त करतील आणि भविष्यातील नवीन पिढ्यांसाठी ईश्वरी राज्याची स्थापना करण्यासाठी आपापल्या देशांत परत जातील.

ई. मला फुले वाहण्यासाठी बोलवण्यात आले, तेव्हा प्रार्थना करतांना मला या वास्तूने व्यापक रूप धारण केले असून ती सभोवतालच्या वातावरणात विलीन झाली आहे, असे दृश्य दिसले.

२. पूजेच्या मांडणीसमोर उभे असतांना स्थूलदेह चारही बाजूंनी व्यापक होत असून सर्वांमध्ये विलीन होत असल्याचे जाणवणे

पूजा झाल्यावर मी पूजेच्या मांडणी समोर उभा होतो. त्या वेळी मला पुढील अनुभूती आली. माझा स्थूलदेह पूजेच्या मांडणी समोर उभा आहे; मात्र तो देह चारही बाजूंनी व्यापक होत आहे आणि सर्वांमध्ये विलीन होत आहे. हे सर्व तो स्थूलदेह पहात आहे, म्हणजे माझा स्थूलदेह तेथे अस्तित्वात असला, तरी तो मी नव्हतो, कुणीतरी वेगळीच व्यक्ती होती. माझे अस्तित्व मला सभोवतालच्या वातावरणातच जाणवत होते. जणू माझे अस्तित्वच नाहीसे झाले होते.

– (सद्गुरु) श्री. सिरियाक वाले, युरोप (१.४.२०१९)

ऑस्ट्रिया, युरोप येथील साधिका पेट्रा स्टिच यांना आलेल्या अनुभूती

कु. पेट्रा स्टिच

१. गणेशपूजा आणि पंचगव्य हवन चालू होण्यापूर्वी आलेल्या अनुभूती

अ. नूतन वास्तूमध्ये गणेशपूजा आणि पंचगव्य हवन चालू होण्यापूर्वी मी येथील गच्चीत बसले होते. तेथे बसल्यावर माझे मन पुष्कळ शांत झाले. इतर साधकही नेहमीपेक्षा पुष्कळ शांत वाटत होते.

आ. माझा नामजप सहजतेने आणि श्वासाला जोडून होत होता. एरव्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करूनही असा नामजप करणे मला जमत नाही. माझा नामजप माझ्या अंतर्मनापर्यंत जात होता.

इ. मी सर्व साधकांशी सूक्ष्मातून जोडले गेले आहे, असे मला जाणवत होते.

२. हवनानंतर होमाच्या ज्वाळा पहातांना आलेल्या अनुभूती

अ. श्री गणेशपूजेनंतर होमाला आरंभ झाला. होमाच्या ज्वाळा पाहून मी भारावून गेले.

आ. या ज्वाळा सजीव, शुद्ध, सात्त्विक आणि पारदर्शक, म्हणजे निर्गुण स्तराच्या असल्याप्रमाणे दिसत होत्या.

इ. मला या ज्वाळांमध्ये देवतेचे अस्तित्व जाणवत होते.

ई. माझ्या मनात या होमातील समिधांप्रमाणे माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांचीही आहुती पडू दे, असा विचार येऊन माझी भावजागृती झाली.

३. मी एका प्राचीन आश्रमात बसले आहे, असे मला वाटत होते. पुरातन काळात ऋषिमुनी निसर्गाच्या सान्निध्यात पशू-पक्षी यांच्या समवेत आनंदाने रहात असत. त्या कथा आणि चित्रे माझ्या डोळ्यांसमोर येऊ लागली. या सुंदर वातावरणातच रहावे, याव्यतिरिक्त माझ्या मनात अन्य विचार किंवा इच्छा नव्हती. हे स्थान संपूर्ण विश्वाच्या अध्यात्मप्रसाराचे प्रमुख स्थान होईल, असे मला वाटते.

आम्ही श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गेलो. श्री गणेशाला नमस्कार करतांना माझे मन कृतज्ञतेने भरून आले. सर्व साधकांवर गुरुकृपा व्हावी, अशी प्रार्थना होत होती. ही प्रार्थना मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.

– कु. पेट्रा स्टिच, ऑस्ट्रिया, युरोप.

ऑस्ट्रिया, युरोप येथील श्री. ॲड्रियन डूर् यांना आलेल्या अनुभूती

पंचगव्य होमातील ज्वाळांकडे पहातांना मला पुढील अनुभूती आल्या.

श्री. ॲड्रियन डूर्

१. पंचगव्य होमातील ज्वाळांकडे पहातांना मला माझ्या आज्ञाचक्राच्या स्थानी पुष्कळ हलकेपणा आणि शीतलता जाणवत होती.

२. मला वाईट शक्तींचा म्हणजेच आध्यात्मिक त्रास असल्यामुळे मी सतत अस्वस्थ आणि ताणात असतो. होमातील ज्वाळांकडे पहात असतांना माझा हा त्रास पुष्कळ उणावला. मला होमातील ज्वाळांकडे पहात रहावे, असे वाटत होते.

३. या होमातील ज्वाळा तेजस्वी, पारदर्शक आणि अधिक प्रखर वाटत होत्या. या ज्वाळा सामान्य ज्वाळांपेक्षा अधिक उंचीवर जात होत्या.

मला आलेल्या या अनुभूतीसाठी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.

– श्री. ॲड्रियन डूर्, ऑस्ट्रिया (१.४.२०१९)

आध्यात्मिक संशोधन केंद्राच्या वास्तूमध्ये सेवा करू लागल्यापासून एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका श्रीमती अनु परशुराम यांना मनाच्या स्तरावर जाणवत असलेले पालट आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

आध्यात्मिक संशोधन केंद्राच्या वास्तूत आल्यावर मला पुढील वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आल्या. त्या समवतेच मनाच्या स्तरावर काही पालटही जाणवले. ते येथे देत आहे.

श्रीमती अनु परशुराम

१. या वास्तूत आल्यापासून मला पुष्कळ आनंदी, सकारात्मक आणि हलके वाटत आहे. या वास्तूमध्ये मला स्वतःच्या घरासारखे वाटत आहे. मला येथे येण्याची आणि येथे येऊन नामजप अन् सेवा करण्याची नेहमी उत्सुकता लागलेली असते.

२. मला साधकांविषयी जवळीक वाटत असून माझ्याकडून येथील साधकांप्रमाणे इतरांशी जवळीक साधण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत. मी येथे आल्यावर पूर्वीपेक्षा पुष्कळ मनमोकळेपणाने बोलू लागले आहे.

३. येथे आल्यापासून आम्हा सर्व साधकांमध्ये पालट होत असल्याचे मला लक्षात आले.

४. या वास्तूत आल्यावर आरंभी दोन दिवस मला परात्पर गुरुदेव आणि आश्रमातील इतर साधक या वास्तूत स्थुलातून नसल्याने त्यांची उणीव भासत होती; परंतु ते स्थुलातून येथे नसले, तरी मला सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत आहे. परात्पर गुरुदेवांचे निर्गुणतत्त्व येथील सर्व साधकांमध्ये कार्य करत असून ते (परात्पर गुरुदेव) आमच्या समवेत आहेत, असेही मला जाणवले.

५. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेनेच महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय आणि एस्.एस्.आर्.एफ्. यांना अलौकिक अशा चैतन्यमयी अन् निसर्गरम्य वातावरण असलेल्या या वास्तूचा लाभ झाला आहे. आकाश, टेकड्या, सूर्य, वारा आणि परात्पर गुरुदेवांमधील निर्गुणतत्त्व यांमुळे येथे साधकांवर पुष्कळ उपाय होतात.

६. या वास्तूतील वास्तव्याने मनाला उभारी आणि आनंद मिळतो.

परात्पर गुरु डॉक्टर, आम्हा सर्व साधकांकडून या वास्तूमधील चैतन्य टिकवून ठेवून त्यात वृद्धी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होऊ देत. तुमच्या कृपेने येथे संपूर्ण जगातून साधक साधना करण्यासाठी येतील. आम्हा सर्वांनाच तुमच्या कृपाछत्राखाली सामावून घ्या, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.

– अनु परशुराम, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.६.२०१९)

श्री. देवांग गडोया यांना आलेल्या अनुभूती

श्री. देवांग गडोया

१. वास्तूत प्रवेश केल्यावर पुष्कळ उत्साह आणि आनंद जाणवणे अन् आश्रम आणि साधक यांची कशी सेवा करू ? असा विचार मनात येणे

या वास्तूत आल्यावर नवीन वास्तूमध्ये यायला मिळाले, या विचाराने मला पुष्कळ उत्साह वाटून आनंद झाला. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने आम्हाला मिळालेल्या या आश्रमाची आणि साधकांची मी कशी सेवा करू ?, असा एकच विचार सातत्याने माझ्या मनात येत होता. त्यांच्या सेवेतूनच माझी साधना होणार आहे, असे वाटत होते. गेले काही मास हा विचार माझ्या मनात येत होता; पण पूजेच्या दिवशी माझ्या मनात हा विचार प्रकर्षाने आला अन् त्यामुळे मला पुष्कळ आनंद मिळाला.

२. विश्वातील प्रत्येक जीव सर्व विसरून पूजा पहात आहे, असे जाणवणे

पूजेला आरंभ झाल्यावर मला वेळेचे भान राहिले नाही. मला सर्वकाही स्थिर आणि स्तब्ध झाले आहे, असे वाटत होते. वास्तूच्या सभोवतालच्या निसर्गरम्य परिसरातून येणारा पक्ष्यांचा आणि झाडांमधून वहाणाऱ्या वाऱ्याचा आवाजही येत नव्हता.जणू विश्वातील प्रत्येक जीव इतर सर्व विसरून ही पूजा पहात आहे, असे मला जाणवले.

३. पंचगव्य हवनातील ज्वाळेला कोणताही रंग नसून ती स्तब्ध आणि पुष्कळ उंच असल्याचे जाणवणे

पुरोहितांनी मंत्रोच्चार करून हवनातील अग्नी प्रज्वलित केला. त्या वेळी ज्वाळेला कोणताही रंग नाही, असे माझ्या लक्षात आले. सामान्यतः ज्वाळेेचा रंग पिवळा किंवा नारिंगी असतो; पण मला या ज्वाळेला कोणताही रंग दिसत नव्हता. ज्वाळेची हालचाल न होता, ती सरळ (स्तब्ध) असल्याचे जाणवले, तसेच ज्वाळा आकाराने अरुंद असूनही त्यांची उंची खोलीच्या छतापर्यंत आहे, असे जाणवले.

४. ही पूजा पृथ्वीवर होत नसून कोणत्या तरी उच्च लोकात होत आहे, असे मला जाणवत होते.

– श्री. देवांग गडोया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.४.२०१९)

रामनाथी, गोवा येथे एस्.एस्.आर्.एफ्.च्या मार्गदर्शनाखाली साधना करणाऱ्या कु. अनिकेत धवस (वय १७ वर्षे) याला शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

कु. अनिकेत धवस

१. सतत साधकांचाच विचार करणाऱ्या परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे या नूतन वास्तूची निर्मिती झाली आहे, या विचाराने गुरुदेवांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटणे

श्री गणेश पूजेला आरंभ झाल्यावर आम्ही सर्व साधक संगणकीय प्रणालीद्वारे त्याचे थेट प्रक्षेपण पहात होतो. ते पहातांना मला साधक, संत आणि परात्पर गुरुदेव यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. परात्पर गुरुदेव साधकांचा सातत्याने विचार करतात. त्यांच्याच कृपेमुळे ही नवीन वास्तू उभी राहिली. परात्पर गुरुदेवांना प्रत्येक साधकाची काळजी वाटते. ते आम्हाला भरभरून देत आहेत; पण ते घेण्याची माझी क्षमता आणि योग्यता नाही, तरीही ते मला देतच आहेत, असे विचार माझ्या मनात येत होते.

२. ही नवीन वास्तू संपूर्ण जगात अध्यात्माचा प्रसार करण्याचे प्रमुख केंद्र बनणार असून जगभरातील साधक इथे येऊन साधना करून आध्यात्मिक प्रगती करणार, असे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगणे

या पूजेला सद्गुरु (सौ.) बिंदाताई उपस्थित होत्या. बाहेरच्या खोलीत बसून पूजेचे प्रक्षेपण पहाणाऱ्या साधकांसाठी त्यांनी एक निरोप पाठवला. त्या म्हणाल्या, ही नवीन वास्तू संपूर्ण जगात अध्यात्माचा प्रसार करण्याचे प्रमुख केंद्र बनेल. जगभरातील साधक येथे येतील आणि साधना करून स्वतःची आध्यात्मिक प्रगती करून घेतील अन् ते संत बनतील. हे ऐकून माझे मन कृतज्ञतेने भरून आले. ही कृतज्ञता मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.

३. नवीन वास्तूत सेवा करण्याची संधी मिळाल्याविषयी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होऊन वास्तूचा आध्यात्मिक स्तरावर अधिकाधिक लाभ करून घेण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी त्यांच्या चरणी प्रार्थना होणे

मी डोळे मिटून परात्पर गुरुदेवांशी सूक्ष्मातून बोलू लागलो. परात्पर गुरुदेव, या नवीन वास्तूमध्ये सेवा करण्याची माझी योग्यता नाही. माझ्याकडून पुष्कळ चुका होतात आणि मला योग्य विचारही करता येत नाही; पण तरीही मला येथे सेवा करण्याची संधी मिळत आहे. मी कोणत्या शब्दांत कृतज्ञता व्यक्त करू, हे मला कळत नाही. परात्पर गुरुदेव, तुमच्या कृपेने मला ही संधी मिळाली आहे. या वास्तूमध्ये सेवा करून तिचा आध्यात्मिक स्तरावर अधिकाअधिक लाभ करून घेण्याची क्षमता तुम्हीच माझ्यामध्ये निर्माण करा. तुमच्या अपेक्षेप्रमाणे साधना कशी करायची ?, हे मला समजत नाही. तुम्ही तुमच्या साधकांची जशी काळजी घेता, तशी मला घेता येत नाही. गुरुदेव, मला प्रत्येक क्षणी शिकण्याच्या स्थितीत ठेवा.

४. परात्पर गुरुदेवांच्या कार्यात अल्पसा वाटा उचलण्यासाठी त्यांना प्रार्थना होणे आणि परात्पर गुरुदेवांशी सूक्ष्मातून बोलतांना भाव जागृत होणे

गुरुदेव, या वास्तूमधील माझा प्रत्येक क्षण आनंदाने भरून जाऊ दे. आपले व्यापक कार्य समजून घेण्याची माझी क्षमता नाही. आपणच हे व्यापक कार्य विनासायास पुढे नेत आहात. मला या कार्यात अल्पसा वाटा उचलायचा आहे. त्यासाठी आपणच मला साहाय्य करा गुरुदेव ! मला आपली सेवा करतांना स्वतःला विसरून जायचे आहे आणि तुमच्याशी आणि तुमच्या प्रिय साधकांशी एकरूप व्हायचे आहे.

सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांशी बोलत असतांना माझा भाव जागृत झाला. परात्पर गुरुदेव माझ्याकडे पहात होते आणि त्या वेळी त्यांच्या मुखावर अतिशय सुंदर हास्य होते. मी यापूर्वी त्यांचे ते हास्य आणि तसे डोळे कधीही पाहिलेले नव्हते. मी माझी प्रत्येक कृती आणि प्रत्येक श्वास गुरुदेवांच्या चरणी समर्पित करतो.

प्रार्थना

परात्पर गुरुदेव, तुम्हीच माझ्याकडून साधना करून घ्या. तुम्हीच माझ्यात तुमची आणि तुमच्या समष्टी रूपाची सेवा करण्याची तळमळ वाढवा. तुम्ही आम्हाला दिलेली ही नवीन वास्तू समष्टीसाठी आहे, याचा मला विसर पडू देऊ नका. आपलेच एक रूप असलेल्या या वास्तूशी मी जोडलेला आहे, हे माझ्या नेहमीच स्मरणात राहू दे. माझ्याकडून सतत या वास्तूची सेवा घडू दे, हीच आपल्या चरणी नम्र प्रार्थना आहे.

– कु. अनिकेत धवस, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.४.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF