स्वातंत्र्यदिनावरील आतंकवादाचे सावट कधी हटणार ?

संपादकीय

१५ऑगस्टला स्वातंत्र्यदिनानिमित्त आतंकवादी देशात मोठा  घातपात घडवण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील १५ मोठ्या शहरांमध्ये अतीदक्षतेची चेतावणी (हाय अ‍ॅलर्ट) देण्यात आली आहे. आता ३७० कलम रहित होण्याचे कारण देण्यात येत आहे. ते एक कारण असले, तरी प्रतिवर्षी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन या वेळी अतीदक्षतेची चेतावणी देण्यात येतेच ! देशाचा स्वातंत्र्यदिन भयाच्या सावटाखाली जगातील कोणत्याही देशात साजरा केला जात नाही. सैन्याच्या कडक सुरक्षा व्यवस्थेत स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागत असेल, तर खरोखरच आपण ‘स्वतंत्र’ आहोत का ?, असा प्रश्‍न पडतो. १५ ऑगस्टला धमकावणारे कोण आहेत, हे सरकारला ठाऊक असते. काँग्रेसच्या सत्ताकाळात धमकावणार्‍यांवर कारवाई होण्याची सुतराम अपेक्षा नव्हती. आता केंद्रात नरेंद्र मोदींचे कणखर शासन सत्तेवर आहे. पाकिस्तानवर दोन वेळा ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून तेथील आतंकवाद्यांना चांगली अद्दलही घडवली आहे; मात्र शांत बसतील, ते आतंकवादी कसले ? त्यांच्या कुरापती अद्यापही चालूच आहेत. पंतप्रधान मोदी यांनी दुसर्‍या ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करतांना ‘हा आपला पायलट प्रोजेक्ट होता. यानंतर आपले असे प्रकल्प चालूच रहातील’, असे वक्तव्य केले होते. नरेंद्र मोदी यांनी ही संधी साधून आता कृती करावी आणि जनतेला भयमुक्त करून देशभर तिरंगा डौलाने फडकवू द्यावा, हीच अपेक्षा !


Multi Language |Offline reading | PDF