भक्तीमय गणेशोत्सवासाठी दिशादर्शक सदर : धर्मप्रबोधन !

केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील अनेक राज्यांमध्ये साजर्‍या केल्या जाणार्‍या गणेशोत्सवाचे सर्वांना वेध लागले आहेत. आपले आराध्य असलेल्या गणरायांचे आगमन अवघ्या ३ आठवड्यांवर येऊन ठेपले आहे. केवळ घरगुती स्तरावरच नाही, तर सामाजिक स्तरावरही मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार्‍या गणेशोत्सवाशी संबंधित गणेश मंडळांमध्येही लगबग चालू झाली आहे. या वर्षी वेगळे काय करावे, कोणत्या विषयावर आरास सिद्ध करायची, यांवर विचार-विनिमय होऊन गणेशमंडळांतील कार्यकर्ते कामालाही लागले असतील.
हिंदूंच्या उत्साहाचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवात मात्र अज्ञानापायी अथवा धर्मशिक्षणाच्या अभावी त्यांच्याकडून नकळत काही अयोग्य कृती घडतात. काही तथाकथित पर्यावरणवादी आणि पुरोगामी हे हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करतात नि हिंदूंचा बुद्धीभेद करण्याठीही प्रयत्नशील असतात. यासाठी हिंदूंच्या धर्मप्रबोधनासह हिंदुद्वेषी विचारांचे खंडण करणेही काळाची आवश्यकता आहे. या पार्श्‍वभूमीवर गणेशकृपेने आजपासून भक्तीमय गणेशोत्सवासाठी दिशादर्शक सदर : धर्मप्रबोधन ! हे रविवारचे विशेष सदर आरंभ करण्यात आम्हाला आनंद होत आहे.
या सदराच्या माध्यमातून गणेशोत्सवातील विविध विषय हाताळले जातील. धर्मदृष्टीने हिंदूंचे दिशादर्शन व्हावे, हे गणेशकृपेने आम्ही आमचे कर्तव्य किंबहुना आमच्या समष्टी साधनेचा भागच समजतो. या सदराच्या माध्यमातून हिंदूंना आध्यात्मिक स्तरावर लाभ होऊन त्यांच्याकडून गणेशोत्सव आध्यात्मिक स्तरावर साजरा केला जावो, अशी बुद्धीदात्या गणरायाच्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना !

कागदी लगद्याची श्री गणेशमूर्ती प्रदूषणकारी !

औद्योगिक वसाहतीतून नैसर्गिक जलस्रोतांमध्ये लाखो कोट्यवधी लिटर हानीकारक रसायनमिश्रित पाणी सोडण्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करणारे पर्यावरणवादी गणेशोत्सवात मात्र इको-फ्रेंडली गणेशाच्या नावाखाली धर्मशास्त्रविसंगत समाजप्रबोधन करण्यात व्यस्त असतात. त्यांच्याकडून कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तीचा पुरस्कार केला जातो. यासंदर्भात हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या पुढाकाराने झालेल्या अभ्यासातून पुढील निष्कर्ष समोर आले आहेत. यातून ढोंगी नि निसर्गद्रोही पर्यावरणवाद्यांचे बिंग फुटले.

१. मुंबईतील शासकीय रसायन तंत्रज्ञान संस्थेने (Institute of Chemical Technology, Mumbai) कागदी लगद्यापासून बनवलेल्या ४ मूर्ती घेऊन संशोधन केले. त्यांनी सांगितले, १० किलो कागदी मूर्तीमुळे १ सहस्र लिटर पाणी प्रदूषित होते. त्या पाण्यात झिंक, क्रोमियम, टायटॅनिअम ऑक्साईड, असे विषारी धातू आढळून आले.
२. सांगलीचे ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. सुब्बाराव यांच्या एन्व्हायरनमेंटल प्रोटेक्शन रिसर्च फाऊंडेशननेे कागद डिस्टील्ड वॉटरमध्ये टाकून संशोधन केले. कागद विरघळवलेल्या या पाण्यात ऑक्सिजनची मात्रा शून्यावर आल्याचे प्रयोगात स्पष्ट झाले. यातून कागदी लगदा किती हानीकारक आहे, हे आपल्या लक्षात येते.
३. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तत्कालीन महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने दिनांक ३.५.२०११ या दिवशी सणांचे पर्यावरणपूरक साजरीकरणासाठीच्या मार्गदर्शक सूचना या नावाने एक परिपत्रक काढले. यामध्ये कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तींना प्रोत्साहन मिळावे, तसेच कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींना विशेष सवलत द्यावी, असे नमूद केले होते. ही सूचना पर्यावरणाला घातक असल्याने या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी राष्ट्रीय हरित लवाद (नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल), पुणे यांनी या शासन निर्णयाला स्थगिती दिली.
लवादाने त्याच्या सुनावणीत स्पष्टपणे म्हटले आहे की, कागदाच्या लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देण्यापूर्वी शासनाने त्याचा पाण्यावर आणि पाण्यातील जिवांवर होणार्‍या परिणामांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. नागरिक शासनावर सर्वाधिक विश्‍वास ठेवतात; मात्र शासनाने बिनडोकपणे निर्णय घेतल्याने त्याचा घातक परिणाम होत असेल, तर शासनावरील नागरिकांचा विश्‍वास नाहीसा होतो. त्यासाठी शासनाने कोणताही अभ्यास न करता आणि परिणामांचा विचार न करता कागदाच्या लगद्याच्या मूर्ती बनवण्यास प्रोत्साहन देण्याचा घेतलेला निर्णय रहित करणे आवश्यक आहे.


Multi Language |Offline reading | PDF