‘युएपीए’ कायद्यामध्ये केलेल्या सुधारणेमुळे आतंकवाद नियंत्रणात आणता येईल ! – संजय बर्वे, पोलीस आयुक्त, मुंबई

मुंबई, ४ ऑगस्ट (वार्ता.) – ‘युएपीए’ कायद्यामध्ये केलेल्या सुधारणा संसदेच्या दोन्ही सभागृहांत संमत झाल्या आहेत. या कायद्यामुळे आतंकवाद नियंत्रणात आणता येईल, असे मत मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी ३ ऑगस्ट या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये वृत्तपत्र प्रतिनिधींशी वार्तालाप करतांना व्यक्त केले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, विश्‍वस्त अजय वैद्य, पत्रकार सुधाकर कश्यप उपस्थित होते.

या वेळी पत्रकारांशी वार्तालाप करतांना पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांवर उत्तर देतांना संजय बर्वे म्हणाले,

१. राज्यात पोलिसांच्या क्वार्टर्सचा प्रश्‍न आहे. जागेच्या अभावामुळे हा प्रश्‍न प्रलंबित आहे. मुंबईतील अनेक पोलीस डोंबिवली, ठाणे येथे रहातात. त्यामुळे प्रवासात अधिक वेळ जातो. याविषयी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. शासन याविषयी सकारात्मक आहे. हा प्रश्‍न लवकरच सुटेल, अशी आशा आहे.

२. पोलीस ठाण्यात ‘एफ्आयआर्’ नोंदवण्याविषयी यापूर्वी जी स्थिती होती त्यामध्ये पालट आहे. काही वर्षांत यामध्ये नक्कीच सुधारणा दिसून येईल.

३. मुंबईमध्ये मासाला २ सहस्रांहून अधिक गुन्ह्यांची नोंद होते. काही वर्षांतील आकडेवारी पहाता मुंबईमध्ये आर्थिक गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. येत्या काही वर्षांत हे प्रमाण वाढत जाण्याची शक्यता आहे.

४. सामाजिक माध्यमांवरील छायाचित्र, व्हिडिओ यांमुळे स्त्रियांकडे पहाण्याची दृष्टी पालटत आहे. यामुळे प्रत्येक स्त्रीकडे वाईट हेतूने पाहिले जाते. यामुळे महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे. जे समजुतदार आहेत त्यांच्यावर या माध्यमांचा परिणाम होत नाही; मात्र जे समजुतदार नाहीत ते याला बळी पडत आहेत.

५. शहरात सध्या ५ सहस्र ५०० ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ आहेत. अजून ५ सहस्र ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावण्यात येणार आहेत. यांमुळे गुन्ह्याला आळा बसेल.

६. गुन्हे रोखण्यासाठी युवकांचे समुपदेशन होणे आवश्यक आहे. पत्रकारिता, शैक्षणिक संस्था यांतून हे समुपदेशन होत असते. समुपदेशनासह युवकांनी स्वत: चांगल्या विचारांचा अवलंब करायला हवा.

७. हे सर्व गुन्हे रोखण्याचे दायित्व पोलिसांचे आहे. गुन्हे रोखण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग पोलिसांकडून करण्यात येत आहे.

आझाद मैदान दंगलीचा खटला चालू करण्याविषयी विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देण्याचे टाळले !

आझाद मैदानाच्या ठिकाणी झालेल्या दंगलीला ७ वर्षे व्हायला आली, तरी अद्याप खटला चालू झालेला नाही. ‘या दंगलीत महिला पोलिसांचा विनयभंग होऊनही खटला अजूनही का चालू होत नाही’, याविषयी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधींनी संजय बर्वे यांना विचारले असता त्यांनी ‘याविषयी आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून याविषयी माहिती घ्या’, असे सांगून उत्तर देणे टाळले. कार्यक्रम संपल्यानंतर दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत वाखारे यांची भेट घेऊन त्यांना याविषयी विचारले असता त्यांनी या प्रकरणी काही गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती देऊन अधिक माहिती देण्याचे टाळले.


Multi Language |Offline reading | PDF