नागांचे आध्यात्मिक महत्त्व आणि नागपंचमी

५ ऑगस्ट २०१९ या दिवशी असलेल्या नागपंचमीच्या निमित्ताने…

‘५.८.२०१९ या दिवशी ‘नागपंचमी’ आहे. त्या निमित्ताने आपण नागांचे आध्यात्मिक महत्त्व आणि नागपंचमीच्या दिवशी करावयाची नागांची उपासना यांविषयीची माहिती जाणून घेऊया.

१. नागांची निर्मिती

कश्यप ऋषि आणि कद्रू यांच्यापासून सर्व नागांची निर्मिती झाली.

२. नागांचे प्रकार

२ अ. तामसिक नाग : हे नाग प्रामुख्याने काळ्या रंगाचे असून ते पाताळातील नागलोकात निवास करतात. मोठ्या वाईट शक्ती या नागांचा सूक्ष्म युद्धामध्ये त्यांच्या शत्रूवर विषप्रयोग करण्यासाठी शस्त्राप्रमाणे वापर करतात. पाताळातील नाग हे पृथ्वीवरील नागांपेक्षा लक्ष पटींनी सामर्थ्यवान आणि सहस्र पटींनी विषारी असतात.

२ आ. राजसिक नाग : हे नाग पृथ्वीवर वास करतात. नागयोनीमध्ये जन्म मिळाल्यामुळे या नागांचे आचरण सर्वसामान्य नागांप्रमाणे असते. ते काळे, निळसर, तपकिरी, चॉकलेटी आदी रंगांचे असतात.

२ इ. सात्त्विक नाग : हे नाग दैवी असल्यामुळे ते शिवलोकाजवळील दैवी नागलोकात वास करतात. त्यांचा रंग पिवळसर असतो आणि त्यांच्या मस्तकावर लाल किंवा निळ्या रंगाचा नागमणी असतो. सात्त्विक नाग हे पाताळातील नागांच्या तुलनेत लक्ष पटींनी सामर्थ्यवान असतात. सात्त्विक नागांना विविध देवतांनी धारण केले आहे. शिवाच्या गळ्यात वासुकी असतो. गणपतीच्या पोटाला वेटोळे घातलेला जागृत विश्‍वकुंडलीनीचे प्रतीक असणारा पिवळा नाग पद्मनाभ आहे. श्रीविष्णू शेषनागाच्या शय्येवर पहुडतो. सात्त्विक नाग सिद्ध आणि ऋषिमुनी यांच्या आधीन असतात. ते त्यांच्या आज्ञेचे पालन करतात. पिवळे नाग उच्च देवतांचे उपासक असल्यामुळे त्यांच्याकडे दैवी बळ आहे. त्यामुळे त्यांना आशीर्वाद देण्याचे, म्हणजे संकल्पानुसार कार्य करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे.

३. पूर्वज आणि नाग यांचा परस्परांशी असणारा संबंध

भुवलोक आणि पितृलोक येथे अडकलेले पूर्वज बहुदा काळ्या नागांच्या रूपात वंशजांना दर्शन देतात. सात्त्विक पूर्वज पिवळ्या नागांच्या रूपात दर्शन आणि आशीर्वाद देतात. घर, संपत्ती आणि कुटुंबीय यांच्याविषयी पुष्कळ आसक्ती असणार्‍या पूर्वजांना पृथ्वीवर नागाच्या योनीत जन्म मिळतो. मनुष्य जन्मात इतरांना त्रास देऊन वाममार्गाने संपत्ती अर्जित केलेल्या पूर्वजांना पुढील जन्म पाताळातील काळ्या नागांच्या रूपाने मिळतो. देवकार्यात सहभागी असणारे आणि सज्जन प्रवृत्तीचे पूर्वज हे पितृलोकात निवास केल्यानंतर काही काळ शिवलोकाजवळील दैवी नागलोकात पिवळ्या नागांच्या रूपाने वास करतात.

४. कलियुगातील मनुष्याने नागांची स्थाने असणारी नागबने नष्ट केल्यामुळे मनुष्याला नागांचा उपद्रव होणे

कलियुगाच्या आरंभापर्यंत विविध ठिकाणच्या देवतांना त्यांचे स्वतंत्र स्थान दिले जायचे, उदा. स्थानदेवता, ग्रामदेवता, क्षेत्रपालदेवता इत्यादी. त्याप्रमाणे भारतातील प्रत्येक गावात नागांना रहाण्यासाठी नागबन होते. या ठिकाणी मोठमोठे दाट वृक्ष जवळ-जवळ असायचे आणि त्यांच्या बुंध्याच्या मुळाशी वारुळ असायचे. प्रत्येक गावातील नाग तेथे रहायचे. (अशी नागबने अजूनही कर्नाटक राज्यातील मुल्की, सुरतकल आदी ठिकाणी आपल्याला पहावयास मिळतात.) नागांना स्वतंत्र स्थान दिल्यामुळे ते मनुष्याला त्रास देत नसत आणि मनुष्य अन् त्याची संपत्ती यांचे रक्षण करायचे. विज्ञानयुगातील मानवाने भौतिक प्रगती करण्यासाठी गावोगावी असणारी नागबने नष्ट करून तेथे मोठमोठ्या इमारती बांधल्या. त्यामुळे मनुष्याला नागांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. – कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान)

‘केरळ राज्यातील काही ठिकाणी अशा प्रकारे नागबनांचा विध्वंस करून तेथे इमारती बांधल्यामुळे तेथील हिंदूंना नागदंश होणे, स्वप्नात नाग दिसणे, घरात सतत आजारपण असणे, यांसारखे त्रास होतात’, असे एका साधकाने मला काही वर्षांपूर्वी सांगितले.’

५. नागपंचमीचा इतिहास आणि पूजाविधी

५ अ. कालियामर्दनाची तिथी : श्रावण शुक्ल पक्ष पंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोकुळात असतांना यमुनेच्या डोहात उडी घेऊन कालिया नागाचे मर्दन केले.

५ अ १. सर्पयज्ञाच्या सांगतेचा दिवस : या दिवशी आस्तिक ऋषींच्या सांगण्यावरून जनमेजय राजाने सर्पयज्ञ करणे थांबवले आणि आस्तिक ऋषींनी विश्‍वातील सर्व नागांना अभय दिले.

५ आ. पूजनाचा विधी : या दिवशी गारुडी लोक नाग आणतात. त्याची पूजा करून त्याला दूध देतात. घरामध्ये लाकडी पाटावर गंध, हळद आणि कुंकू यांच्या मिश्रणाने पाच फण्यांचा नाग काढावा किंवा रक्तचंदनाने नऊ नागांच्या आकृत्या काढाव्यात. नागाची पूजा करतांना अनंत, वासुकी, शेष, पद्नाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या नऊ नागांची नावे घेऊन गंध, अक्षता अन् फुले वाहावीत. घरातील लोकांनी फुले, दूर्वा, लाह्या, हरभरे इत्यादी पदार्थ वाहावेत.

५ आ २. पूजनाची फलप्राप्ती : नऊ नागांचे पूजन केल्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होण्याचे संकट टळते.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.७.२०१७)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF