(म्हणे) ‘काश्मीरप्रश्‍नी पंतप्रधान मोदी यांनी मध्यस्थी करण्याची मागणी केली होती !’

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासमवेतच्या भेटीत विधान

  • भारताने ट्रम्प यांचा दावा फेटाळला

भारतावर दबाव निर्माण करण्यासाठीच डोनाल्ड ट्रम्प उघड उघड खोटे बोलत आहेत, हेच स्पष्ट होते !

परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

वॉशिंग्टन / नवी देहली – दोन आठवड्यांपूर्वी मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो होतो. तेव्हा त्यांनी ‘काश्मीरच्या प्रश्‍नावर मध्यस्थी करणार का?’, अशी विचारणा केली होती. मी त्यांना ‘मध्यस्थी करू शकतो’, असे म्हटले होते, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. अमेरिकेच्या दौर्‍यावर असणारे पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. त्या वेळी ट्रम्प बोलत होते. भारताने मात्र ट्रम्प यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. ‘काश्मीरप्रश्‍नी पंतप्रधान मोदी यांनी कधीही ट्रम्प यांचे साहाय्य मागितलेले नाही’, असे स्पष्टीकरण भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहे. तसेच परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांचे खंडण केले. ‘अशा प्रकारची कोणतीही चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये झाली नाही’, असे त्यांनी राज्यसभेत सांगितले. काश्मीर प्रश्‍नी कोणत्याही तिसर्‍या पक्षाशी चर्चा केली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प खोटे बोलले आहेत, असे स्पष्ट होत आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्वीट करून म्हटले की, मोदी यांनी ट्रम्प यांना मध्यस्थी करण्याची विनंती केली होती, त्यात काही तथ्य नाही; कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारे कोणतेही साहाय्य मागितलेले नाही. पाकसमवेत काश्मीरप्रश्‍नी द्विपक्षीय चर्चा हेच भारताचे धोरण आहे; मात्र ही चर्चा चालू करायची असेल, तर सीमेवरचा आतंकवाद पाकिस्तानला थांबवावा लागेल.

काश्मीरचा प्रश्‍न हा भारत आणि पाक यांच्यातील द्विपक्षीय सूत्र ! – अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले की, काश्मीरचा प्रश्‍न भारत आणि पाक यांच्यातील द्विपक्षीय सूत्र आहे. त्यांनी एकत्र बसून यावर चर्चा करावी. याचे ट्रम्प सरकारही समर्थन करते आणि अमेरिका नेहमीच या दोन्ही देशांना साहाय्य करण्यास सिद्ध आहे. तसेच चर्चेद्वारे या दोन्ही देशांमधील तणाव न्यून करण्यासह अनुकूल वातावरण बनवण्यासाठी साहाय्य करत राहील.

ट्रम्प यांचे विधान बालिश आणि लज्जास्पद ! – अमेरिकेचे खासदार ब्रॅड शरमन यांचा घरचा अहेर

अमेरिकेचे डेमोक्रेटिक पक्षाचे खासदार ब्रॅड शरमन या घटनेवर म्हणाले की, ज्या कोणाला दक्षिण आशियाविषयीच्या परराष्ट्र धोरणाविषयीची माहिती आहे, त्याला हेही माहिती आहे की, भारत काश्मीरच्या प्रश्‍नावर नेहमीच मध्यस्थीचा विरोध करत आला आहे. प्रत्येकाला हे माहिती आहे की, पंतप्रधान मोदी कधीही अशी मागणी करणार नाहीत. ट्रम्प यांचे विधान बालिश, भ्रामक आणि लज्जास्पद आहे. मी त्यांच्या या विधानासाठी अमेरिकेतील भारताचे राजदूत हर्षवर्धन श्रुंगला यांची क्षमा मागितली आहे.

‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या वृत्तानुसार डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून १० सहस्र ७९६ वेळा खोटे बोलले !

वॉशिंग्टन – येथील वृत्तपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’नुसार डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून आतापर्यंत १० सहस्र ७९६ वेळा खोटे बोलले आहेत. ते प्रतिदिन १२ वेळा खोटे बोलत आले आहेत. जेव्हा ट्रम्प यांचे विधान संदिग्ध वाटले, तेव्हा त्याची पडताळणी केल्यावर बहुसंख्य वेळा ते खोटे असल्याचेच उघड झाले आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या खोट्या माहितीचा अनेकदा पुनरुच्चारही केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF