‘चंद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) – भारताचे बहुचर्चित ‘चंद्रयान-२’ हे चंद्रावर जाणारे अवकाश यान अखेर २२ जुलैला दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी अवकाशात यशस्वीरित्या झेपावले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून ‘चंद्रयान-२’चे प्रक्षेपण करण्यात आले. हे यान चंद्रावर पोचण्यासाठी ४८ ते ५२ दिवस लागणार आहेत. प्रक्षेपणानंतरचे २३ दिवस हे यान पृथ्वीच्या कक्षेतच असणार आहे. २५० वैज्ञानिक या यानावर लक्ष ठेवणार आहेत. हे यान चंद्रावर उतरल्यावर भारत जगातील असा चौथा देश ठरणार आहे. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीन यांनी चंद्रावर यान उतरवले आहे. काही तांत्रिक कारणामुळे १५ जुलै या दिवशी होणारे या यानाचे प्रक्षेपण रहित करण्यात आले होते. संपूर्ण भारतीय असलेले हे यान ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’च्या (इस्रोच्या) शास्त्रज्ञांनी निर्माण केले आहे. चंद्रापासून ३० कि.मी. अंतर राहिल्यानंतर ‘चंद्रयान-२’चा वेग न्यून करण्यात येणार आहे. ‘हे यान चंद्रावर उतरण्याच्या आधीची १५ मिनिटे महत्त्वाची आहेत’, असे इस्रोचे प्रमुख के. सिवन् यांनी म्हटले आहे. सिवन् यांनी काही दिवसांपूर्वीच तिरूपती बालाजी मंदिरात जाऊन चंद्रयान २ च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी प्रार्थना केली होती.

प्रत्येक भारतियासाठी अभिमानाचा क्षण ! – पंतप्रधान मोदी

चंद्रयान-२ चे प्रक्षेपण हा प्रत्येक भारतियासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. भारताने आज इतिहास रचला आहे. १३० कोटी भारतियांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळ्याच शास्त्रज्ञांनी हातभार लावला आहे, असे ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे कौतुक केले.

भारताच्या चंद्रावरील ऐतिहासिक प्रवासाला प्रारंभ ! – इस्रो प्रमुख के. सिवन्


समस्त भारतियांचे लक्ष लागलेल्या चंद्रयान-२ अभियानाला यशस्वी प्रारंभ झाला आहे. चंद्रयान-२ ला पृथ्वीच्या कक्षेत सोडल्याचे घोषित करतांना मला आनंद होत आहे. भारताच्या चंद्रावरील ऐतिहासिक प्रवासाला प्रारंभ झाला आहे. अज्ञात असलेल्या गोष्टी शोधून काढायच्या आहेत. आमचे कार्य संपलेले नाही. आता आम्ही पुढच्या अभियानावर काम चालू करणार आहोत. यावर्षी अनेक अभियान आहेत. हे ज्यांच्यामुळे शक्य झाले त्या सर्वांना माझा प्रणाम, अशा शब्दांत इस्रोचे अध्यक्ष के. सिवन् यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

चंद्रयान-२ चा चंद्रावरील प्रवास

पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील अंतर ३ लाख ८४ सहस्र किलोमीटर इतके आहे. ‘चंद्रयान-२’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. येथे आतापर्यंत कोणत्याही देशाचे यान गेलेले नाही. ‘चंद्रयान-२’द्वारे त्यातील लँडर ‘विक्रम’ आणि रोव्हर ‘प्रज्ञान’ चंद्रापर्यंत जातील. रोव्हर ‘प्रज्ञान’ म्हणजे संस्कृत भाषेत बुद्धीमत्ता. चंद्राच्या भूमीवर उतरण्यापूर्वी रोव्हर ‘विक्रम’ उतरण्याच्या भूमीची पाहणी करणे चालू करील. त्यानंतर लँडर ‘विक्रम’ यानापासून वेगळे होईल. त्यानंतर विक्रम चंद्राच्या भूमीच्या अगदी जवळ पोचेल. जिथे उतरायचे आहे, त्या भूमीचे स्कॅनिंग चालू होईल. त्यानंतर ६ किंवा ७ सप्टेंबर या दिवशी लँडिंगची प्रक्रिया चालू होईल. लँडिंगनंतर लँडर विक्रमचा दरवाजा उघडेल. त्यानंतर त्यामधील रोव्हर ‘प्रज्ञान’ बाहेर येईल. ‘प्रज्ञान’ बाहेर येण्यासाठी अनुमाने ४ घंटे लागतील. त्यानंतर तो वैज्ञानिक परीक्षणांसाठी चंद्राच्या भूमीवर चालू लागेल. नंतर पुढील १५ मिनिटांच्या आत इस्रोला लँडिगची छायाचित्रे मिळणे चालू होतील. हे यान चंद्रावरील माती, खनिज आणि अन्य गोष्टींचा शोध घेणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF